आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुभाजकाला लागून रस्त्यांची उजवी बाजू 'इमर्जन्सी लेन'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील वाहतुकीच्या कोंडीमुळे अनेकदा अॅम्ब्युलन्स, अग्निशमन बंबास रस्ता मिळत नाही. यावर उपाय म्हणून आता आंतरराष्ट्रीय नियमानुसार रस्त्याची उजवी बाजू (लेन) आता 'इमर्जन्सी लेन' म्हणून वापरण्यात येणार आहे. आपत्कालीन घटनांमध्ये जाणाऱ्या अॅम्ब्युलन्स आणि अग्निशमन बंब दुभाजकाच्या जवळील लेनवरून जातील. या अनुषंगाने वाहतूक पोलिस, बंब व अॅम्ब्युलन्स चालकांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.


वाहतूक संरक्षण जनजागृती पंधरवड्यांतर्गत प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी शहरातील वाहतूक नियमनात बदल करण्याचे सूतोवाच केले होते. 'इमर्जन्सी लेन'च्या मदतीसाठी रुग्णालयांना पुढे येण्याचे आवाहन वाहतूक पोलिस विभागाकडून करण्यात आले होते. मागील आठवड्यात शहरातील सात रुग्णालयांनी या लेनसाठी फलक बसवून देण्यासाठी पुढाकार घेतला. बुधवारी याचे काम सुरू झाले असून लवकरच शहरातील प्रमुख मार्गांवर हे फलक बसवण्यात येतील. जालना रस्त्यावरील दुभाजकावर हे फलक बसवण्यात आले असून गारखेडा, क्रांती चौक, रेल्वेस्थानक, जळगाव रस्ता, जिल्हाधिकारी कार्यालय, पैठण रस्ता आदी प्रमुख मार्गांवर लवकरच फलक बसवले जातील. यासाठी अॅम्ब्युलन्स व अग्निशमन बंब चालकासह वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात येत आहे. बंब किंवा अॅम्ब्युलन्स आल्यास इमर्जन्सी लेन मोकळी कशी करायची, मार्ग कसा तयार करायचा याची माहिती दिली जात आहे. 


नागरिकांमध्ये जनजागृती करू 
सामान्य नागरिकांना ही संकल्पना माहीत होण्यास व रुजण्यास वेळ लागेल. यासाठी जनजागृती करू. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार इमर्जन्सी लेनची संकल्पना असून अडथळ्याशिवाय अॅम्ब्युलन्स, बंब घटनास्थळी पोहोचतील. 
-डॉ. दीपाली धाटे-घाडगे, पोलिस उपायुक्त, मुख्यालय. 


१५० फलक बसवले 
सहा ते सात रुग्णालयांनी पुढाकार घेतला आहे. बुधवारपासून याचे काम सुरू झाले असून १५० ठिकाणी इमर्जन्सी लेनचे फलक व जागा ठरवण्यात आल्या आहेत. 
- मधुकर सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक. 


दंड भरण्यासाठी आलेल्यांचे अर्धा तास समुपदेशन 
रेल्वेस्टेशन, शहागंज, सिटी चौक, राजाबाजार, बसस्थानक, पैठण गेट या ठिकाणी वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. मोंढा नाका येथील वाहतूक विभागात १२७ जणांना दंड भरण्यासाठी बोलावले. एका हॉलमध्ये बसवून त्यांना वाहतूक नियम, नियम मोडण्याचे दुष्परिणाम यावर अर्धा तास मार्गदर्शन केले. व्हिडिओ क्लिप दाखवल्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...