आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया सुरू; जातवैधता प्रमाणपत्र नसेल तर घ्यावा लागेल खुल्या प्रवर्गातून प्रवेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- यंदा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक बनले आहे. एससी, व्हीजेएनटी, एनटी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडे प्रवेशनिश्चितीपूर्वी हे प्रमाणपत्र नसेल तर त्यांचे प्रवेश हे खुल्या वर्गातून गृहीत धरले जाणार आहेत. हा नवा बदल सीईटी सेलद्वारे जाहीर केलेल्या वेळापत्रकात नमूद करण्यात आला आहे. बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर होताच पदवी आणि पदवीच्या इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. गुरुवारपासून बीई, बीटेक पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, यंदा २०१८-१९ या शैक्षणिक सत्रातील प्रवेश हे mahacet.org.in आणि dtemaharashtr.gov.in या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागातील डॉ.गोविंद संघवई यांनी दिली.


४ जुलैपर्यंत पहिली फेरी 
पहिल्या फेरीसाठी ७ ते १९ जून पर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी करायची असून ७ ते १९ जूनदरम्यान अर्ज पडताळणी केली जाणार आहे. तात्पूर्ती २१ जून रोजी ऑनलाइन गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. कागदपत्रातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी २२ ते २३ जून अशी मुदत असून या फेरीसाठीची अंतिम गुणवत्ता यादी २४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांच्या लॉग इनमधून विकल्प अर्ज भरण्याची मुदत २५ ते २८ जून असेल. २९ जून रोजी जागांचे वाटप होणार असून ३० जून ते ४ जुलैपर्यंत केंद्रात जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. 


प्रवेश प्रक्रियेत झाले तीन महत्त्वाचे बदल 
१ विद्यार्थ्यांकडे जातवैधता प्रमाणपत्र असणे महत्त्वाचे बनले आहे. राज्यभरातून जवळपास ५० टक्के विद्यार्थी हे विविध प्रवर्गातील राखीव जागेतून प्रवेश घेतात. त्यांच्यासाठी हा नियम अत्यंत महत्त्वाचा असून जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागेल. 
२ प्रवेशावेळी विद्यार्थ्यांनी सुविधा केंद्रात मूळ कागदपत्रे दाखवून त्यांच्या झेरॉक्स प्रती (दोन सेट) सोबत ठेवायच्या आहेत. झेरॉक्सची प्रत्येकी एक प्रत एआरसी सेंटर आणि प्रवेश निश्चितीच्या वेळी केंद्रात दाखवून जिथे प्रवेश घेणार तिथे जमा करायची आहे. 
३ आतापर्यंत पहिल्या फेरीत प्रवेश राहिला असेल तर शेवटी ते प्रवेश घ्यावा लागत असे. परंतु यंदापासून पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेले विद्यार्थी ३० जून ते २२ जुलैपर्यंत संस्थेत जाऊन प्रवेश घेऊ शकतील.दुसऱ्या फेरीतील १० ते २२ जुलै आणि १८ ते २२ जुलैदरम्यान तिसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चित करता येतील. 


वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेलाही सुरुवात 
'नीट' आणि 'एमएचटी-सीईटी'चा निकाल जाहीर झाल्यानंतर सीईटी सेलने वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार वैद्यकीयसाठी ७ ते १७ जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. याच कार्यकाळात कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल. ऑनलाइन चालान भरण्याची तारीख १८ जून आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी १९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येईल. कागदपत्रांची पडताळणी २१ ते २५ जून दरम्यान होईल. अंतिम गुणवत्ता यादी २६ जून रोजी जाहीर करण्यात येईल. विकल्प अर्ज भरण्याची प्रक्रिया २६ ते २९ जून दरम्यान होईल. पहिल्या फेरीसाठी निवड झालेल्यांची यादी २ जुलै रोजी प्रसिद्ध होईल. यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी १२ जुलै रोजी निवड झालेल्या कॉलेजांमध्ये प्रवेश निश्चित करायचे आहेत. 

बातम्या आणखी आहेत...