आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांनी ऊस लागवड वाढवू नये ही साखर उद्योगांचीच इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाड- बंपर उत्पादनामुळे देशात गडगडत असलेले साखरेचे भाव आणि त्यातच दरवर्षी उसाचे वाढत चाललेले क्षेत्र यामुळे साखर कारखानदारांना एफआरपीप्रमाणे दर देणेही परवडत नाही. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांनी उसाचे क्षेत्र वाढवू नये, अशी साखर कारखानदारांचीच इच्छा आहे. तथापि, खिशात अजून एफआरपीप्रमाणे पूर्ण पैसे पडले नसले तरी शाश्वत दर मिळत असल्याने शेतकरी उसाचे क्षेत्र वाढवत असल्याने पुढील हंगामात साखर कारखान्यांसमोर ऊस गाळपाबरोबरच शेतकऱ्यांची देणी देण्याचे मोठे आव्हान असेल. 


उसाला शाश्वत दर मिळत असल्याने अनेक शेतकरी ऊस लागवडीकडे वळत आहेत. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यात साडेचार ते पाच हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड वाढली आहे. राज्यात पुढील हंगामात (२०१८-१९) १०७१ लाख टन उस उपलब्ध होण्याचा अंदाज असून संपणाऱ्या उस गाळप हंगाम (२०१७-१८) पेक्षा पुढील वर्षी तब्बल १२० लाख टनांनी उसाची उपलब्धता वाढण्याचा अंदाज आहे. यातून उच्चांकी म्हणजे ११० लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील १०१ सहकारी व ८६ खासगी अशा एकूण १८७ साखर कारखान्यांसमोर उस गाळपाचे आव्हान असणार आहे. 


२०१७-१८ च्या गळीत हंगामात छत्रपती संभाजी राजे औरंगाबाद, मुक्तेश्वर शुगर मिल गंगापूर, बारामती अॅग्रो शुगर मिल कन्नड, संत एकनाथ (अतुल शुगर मिल) पैठण, समृद्धी शुगर (घृष्णेश्वर) खुलताबाद आणि विहामांडवा (पैठण) येथील शरद सहकारी साखर कारखान्याने एप्रिल २०१८ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उस गाळप केले. मागच्या वर्षी जिल्ह्यात २१ ते ३० हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उभा होता. कृषी विभागाने हेक्टरी ५५ टन उस उत्पादन गृहीत धरले होते. त्यानुसार २०१७-१८ हा गळीत हंगामात १६ लाख ३१ हजार ५८० टन उसाचे गाळप करून १६ लाख ५० हजार ६०७ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. शेवटच्या सत्रात साखर उतारा ९.५६ टक्के आला आहे. २०१६-१७ च्या गळीत हंगामात केवळ २ लाख ७९ हजार १५५ टन उसाचे गाळप होऊन २ लाख ४४ हजार १८१ क्विंटल पोत्यांचे उत्पादन झाले हाेते. 


पैसे अडकले 
राज्यातील १८७ साखर कारखान्यांनी ९५२.४७ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून १०७०.८८ लाख क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. तर २०१६-१७ च्या हंगामात ८८ सहकारी व ६२ खासगी अशा १५० साखर कारखान्यांनी ३७३.१३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४२०.०१ लाख क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले होते. २०१६-१७ पेक्षा २०१७-१८ मध्ये अंदाजे सरासरी अडीच पट जास्तीचे उत्पादन झाले आहे. हिच स्थिती संपूर्ण देशात अाहे. 


केंद्राच्या घोषणेची अंमलबजावणी नाही 
केंद्र सरकारने खरिपातील १४ पिकांना उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमी भावाची घोषणा केली आहे. परंतु अद्याप अंमलबजावणी नाही. २०१५-१६ मध्ये तूर, हरभरा, मूग,उडदाला चांगला भाव होता. त्यामुळे २०१६-१७ च्या हंगामात शेतकऱ्यांनी डाळवर्गीय पिकाचे क्षेत्र वाढवले. चार पैसे मिळण्याच्या अपेक्षेने पीक संरक्षणासाठी महागडी कीटकनाशक फवारली दर एकरी उत्पादनात दुप्पट वाढ झाली. पण तूर, उडीद बाजारात येताच भाव घसरले. शेकडो क्विंटल तुरी शेतकऱ्यांच्या घरातच राहिल्या. बोंडअळीने कपाशीचे पीक खाल्ले. त्यामुळे उसाला शाश्वत दर मिळत असल्याने शेतकरी उस लागवडीकडे वळू लागला आहे. 


औरंगाबाद जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र वाढले 
औरंगाबाद जिल्ह्यात २०१७-१८ साली १६ लाख टन उस साखर कारखान्यांना उपलब्ध झाला होता. पुढील हंगामात १९ ते २० लाख टन उस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. कारण गंगापूर, पैठण या गोदाक्षेत्रात पाच हजार हेक्टर उसाची जास्तीची लागवड झाली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने साखर उद्योगासाठी शाश्वत धोरण आखण्याची गरज असल्याचे साखर उत्पादक सांगत आहेत. पुढील वर्षी उसाला जास्त दर देता येणार नाही, असे आवाहन करणारे पत्र उत्तर प्रदेशातील १६२ साखर कारखान्यांनी सुमारे ४० लाख उस उत्पादकांना पाठवले आहे. हाच कित्ता महाराष्ट्रातील साखर कारखाने गिरवण्याच्या तयारीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...