आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

500 मुलांना मायेची ‘सावली’ देणारा बाप; आई नसलेल्या नितेशने सावरले शेकडो संसार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -   नितेश बनसोडे. चाळिशीच्या आतला. कुटुंबप्रमुखही. त्याचे कुटुंब म्हणाल, तर आजवर सांभाळलेली ५०० मुले. आजघडीला ५५ मुला-मुलींचा तो आई, बाप, पालक सबकुछ आहे. अनाथ, गरीब, कुटुंबासाठी आेझे असणारी मुले सांभाळायची आणि त्यांना त्यांच्या पायांवर उभे करायचे हे त्याचे काम. ‘माझी ३५० मुले कमावती आहेत’, हे सांगताना त्याच्या डोळ्यात संकल्पपूर्तीला अानंद स्पष्ट दिसतो. 

 

मूळ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील नितेश ७ वर्षांचा असताना त्याची आई जग सोडून गेली. नंतर वडिलांनी शेवगाव तालुक्यात पाठवले. एक पालकत्व असलेल्या मुलांच्या वाट्याला येणाऱ्या वेदना त्याने सोसल्या आणि १८ वर्षे वय असल्यापासून अनाथ, गरीब मुलांसाठी आयुष्य खर्ची घालण्याचा निश्चय त्याने केला. असाध्य आजार झालेल्या पालकांच्या तीन मुलांना त्याने सांभाळले. तेथूनच समाजसेवेचे व्रत सुरू झाले.

 

पाथर्डी तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या आणखी तीन मुलांना सांभाळणे सुरू केले. २००१ मध्ये ‘सावली’ नावाने सुरू झालेला माणुसकीचा हा ‘प्रपंच’ भाडोत्री खोली, रो-हाउसिंग असा सुरू झाला. २००४-०५ मध्ये एका कार्यक्रमात गीतकार प्रवीण दवणे यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी नितेशचा प्रवास ऐकला आणि एक हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन ‘आयुष्यभर तुझ्यासाठी काम करेन...’ असा शब्द दिला. एका दैनिकात त्याच्यावर लेखही छापून आला आणि तेथून नितेशची आेळख महाराष्ट्राला झाली, आर्थिक मदत मिळू लागली. सदाशिव अमरापूरकर,उत्तरा केळकर, अनिल काळे अशा दिग्गजांनी मदतीचा हात दिला. दोन लाख रुपये जमा झाले. तेच पैसे सांभाळून ठेवत त्याने २००७ मध्ये केडगाव (अहमदनगर) येथे दोन गुंठे जागा घेतली.  

 

कसे चालते काम?

सावली संस्थेला राज्यभरातील सुमारे ५० हून अधिक युवक मदत करतात.  ‘सावली’त ६ ते १८ वयोगटातील सर्व जाती-धर्माची मुले आहेत. अनाथ, गरीब, आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या मुलांना सावलीत आणले जाते. वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत शिक्षण, व्यवसायाभिमुख कौशल्य त्यांना शिकवले जातात. गेल्या १८ वर्षांच्या काळात सावलीतून बाहेर पडलेली सुमारे ३५० मुले-मुली सध्या स्वत:चा व्यवसाय करतात. कुणी वायरमन, तर कुणी  सीए व अकाउंटंटही आहे. काहींनी सावलीला आर्थिक हातभारही लावला आहे.    


बहिणीच्या लग्नाची कमाई

सावली परिवारातील शेखर डांगे या विद्यार्थ्याने वयाची अठरा वर्षे पूर्ण केल्यानंतर ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून शहरात काम सुरू केले. त्याची छोटी बहीणही सावलीमध्येच आहे. तिने वयाची १८ वर्षे पूर्ण करेपर्यंत शेखरने तिच्या लग्नासाठी तीन लाख रुपये जमवले. सावलीतच गेल्या महिन्यात १२ तारखेला तिचे लग्न लावण्यात आले.

 

पाचशे मुले दत्तक 

नितेशने सावलीचा व्याप सांभाळून पुण्याजवळील शिरूरमध्ये ‘माझी जीवनशाळा’ सुरू केली आहे. तेथे झोपडपट्टीतील १२० मुलांना तो संस्कार आणि व्यवसाय शिक्षण देतो. याबरोबरच अकोले तालुक्यातील पांजरे, घाटघर या दुर्गम आदिवासी भागातील ५०० मुलांचे शैक्षणिक पालकत्वही त्याने घेतले आहे.

 

१० मुली, २ मुले अन् ८ नातवंडं
‘सावली’त वाढलेल्या १० मुली आणि दोन मुलांचा विवाह नितेशने लावला. ‘वयाची चाळिशीही नाही, मात्र मला आठ नातूही आहेत,’ असे नितेश अभिमानाने सांगतो. नितेशचे काम पाहून चार्टर्ड अकाउंटंट यशोधरा बऱ्हाटेने त्याच्याशी विवाह केला. पुण्यातील पाच लाखांचे पॅकेज सोडून ती सावलीत दाखल झाली. तिने पुढे बीए, कायद्याची पदवी आणि पीएचडीही केली. 

 

बातम्या आणखी आहेत...