आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य कर्जबाजारी नाहीच; विरोधकांना पोटशूळ उठला; अर्थमंत्री मुनगंटीवार यांची बोचरी टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राज्य सरकार चार लाख कोटींनी कर्जबाजारी असल्याचा खोटा प्रचार विरोधक करत आहेत. जे त्यांना ४७ वर्षांत जमले नाही ते आम्ही चार वर्षांत करून दाखवल्याने त्यांना पोटशूळ उठला आहे, अशी बोचरी टीका वनमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली. 


राज्यात १३ कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प सरकारने घेतला आहे. नवा संकल्प आणि गेल्या दोन वर्षांत वृक्ष लागवडीचे पूर्ण केलेले उद्दिष्ट याची आढावा बैठक त्यांनी विभागीय आयुक्तालयात घेतली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी उशिरा कांचनवाडीतील वाल्मी केंद्रात पत्रकारांशी संवाद साधला. 


काँग्रेस पक्षाने ४७ वर्षे ४ महिने आणि १ दिवस सत्ता उपभोगली. पण त्यांना राज्याचा विकास करता आला नाही. आता तेच काम आम्ही चार वर्षांत करून दाखवत आहोत. त्यामुळे राज्य कर्जात बुडाल्याचे ते सांगत फिरत आहेत, असाही दावा त्यांनी केला.


शेतकऱ्यांना कर्जवाटपासाठी यंत्रणा बळकट करणार
पावसाळा सुरू झाला तरीही राज्यात फक्त ९ टक्के शेतकऱ्यांना कर्ज वाटप झाले? या प्रश्नावर ते म्हणाले, मुख्यमंत्री विदेशातून आल्यानंतर धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. कर्ज वाटपाची प्रक्रिया गतिमान करण्यात येईल. राज्यातील ज्या जिल्हा बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत, त्यांना वठणीवर आणण्यात येईल, असा टोलाही त्यांनी लगावला. 


दरडोई उत्पन्न, विकास दर वाढला 
मुनगंटीवार हे वृक्ष लागवडीवर भरभरून बोलत होते. पण त्यांना राज्य कर्जबाजारी आहे, त्यातून वाट कशी काढणार, असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, राज्याचा जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पन्न) वाढला आहे. ऋणभार कमी झाला आहे. दरडोई उत्पन्नही वाढले आहे. विकास दर ५.८ वरून ८.५ टक्क्यांवर गेला आहे. 

बातम्या आणखी आहेत...