आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढत्या भारामुळे 286 दिवसांत जळाली पाच हजार 818 रोहित्रे; 28.16 कोटींचा चुराडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वीज चोरी, गळतीमुळे वाढत असलेल्या अनधिकृत भारामुळे (लोड) औरंगाबाद, जळगाव, लातूर आणि नांदेड परिमंडळात  २८६ दिवसांत ५ हजार ८१८ रोहित्रे जळाली आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी २८ कोटी १६ लाख रुपये खर्च झाले. दुसरीकडे कृषी पंप, उद्योग, व्यवसायाला वीज मिळत नसल्याने होणारे नुकसान अतोनात आहे. 


औरंगाबाद प्रादेशिक विभागात ४७ लाख ९० हजार ४१४ वीज ग्राहक आहेत. दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढत आहे. एका रोहित्रावर क्षमतेपेक्षा भार वाढत आहे. त्यात आकडे टाकून सर्रास वीज चोरीली जाते. चोरी व गळतीचे प्रमाण २५ टक्क्यांवर आहे. 


सूत्रांनी सांगितले की, कृषी पंप ग्राहक स्टार्टरच्या बटणावर पट्टी चढवतात. ऑटोस्विच बसवण्याचे प्रमाणही अधिक असल्याने थेट पुरवठ्यावर परिणाम होतो. दाब वाढून रोहित्रे जळून खाक होत आहेत.  १ एप्रिल ते १६ नोव्हेंबर दरम्यान २८६ दिवसांत ५ हजार ८१८ रोहित्रे जळाली आहेत. दुरुस्तीसाठी २८ कोटी १६ लाख रूपये खर्च झाला आहे.शिवाय विजेअभावी शेतमालाचेे नुकसान होतच आहे. रोहित्राबरोबरच कृषी पंप, स्टार्टर्स, वायर जळण्याचे प्रमाण मोठे आहे. 


त्याचे सर्वेक्षण होत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्योग-व्यवसायालाही मोठा फटका बसत आहे. दरवर्षी अब्जावधींचे नुकसान होत आहे. याचा थेट संबंध राष्ट्रीय उत्पादन वाढीशी असल्याने महावितरण प्रशासनाने  वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे वीज ग्राहक सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली. 

 

रोहित्र जळण्याची कारणे काय आहेत?
 अनधिकृत लोड , तीन एचपीच्या पंपाची मान्यता व प्रत्यक्षात साडेसात एचपीचे पंप चालवले जातात. त्यात चोरून वीज वापरणाऱ्यांची मोठी भरत पडते.  लोड एकदम वाढतो व रोहित्राचे महत्त्वाचे भाग जळतात. 

 

रोहित्र जळण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी काय करत आहात?
गावोगावी दर्शनी ठिकाणी जागरुकतेविषयी पोस्टर्स लावले आहेत. शिवाय एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत १००९.९० किमी एअरबंच केबल व ३९४ किमी हाय होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम अंतर्गत ३९४ रोहित्र, दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत ३७०६५ व एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत २३५० रोहित्रे डिसेंबर २०१८ पर्यंत बसवली जाणार आहेत.


ग्राहकांनी काय करायला हवे
वीजपंपावर ऑटोस्विच बसू नये. त्याऐवजी कपॅसिटर लावावेत.यामुळे ३ एचपी क्षमता असलेल्या कृषी पंपाचा भार एकने तर  पाचचा दोनने, साडेसातच्या पंपाचा तीनने आणि साडेबाराच्या पंपाचा तब्बल पाचने भार कमी होण्यास मदत मिळेल. १३ लाख  ८२ हजार कृषी वीज ग्राहकांपैकी जो पर्यंत ७० टक्के ग्राहक कपॅसिटर बसवत नाहीत. वीज बिलाचा भरणा करत नाहीत तोवर नादुरुस्त रोहित्र बदलून मिळणार नाही. आकडे टाकून वीज चोरी रोखावी. क्षमतेपेक्षा अधिक भाराचे पंप चालवू नये. नियमित वीज बिलाचा भरणा करावा. रोहित्राचे पालकत्व स्वीकारून सुरक्षा व संवर्धन करावे.

 

भरपाईबाबत ग्राहक अनभिज्ञ
राज्य वीज नियामक आयोगाने २० जानेवारी २००५  रोजी तयार केलेल्या मानकांनुसार शहरात रोहित्र जळाल्यास , बिघडल्यास २४ तास, ग्रामीण भागासाठी ४८ तासांच्या आत ते महावितरणने दुरुस्त करून देणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास प्रतितास ५० रुपयांप्रमाणे नुकसान भरपाईची तरतूद आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी  ग्रामस्थ वर्गणीद्वारे दुरुस्ती करून घेतात. अशा प्रकारची नुकसान भरपाई एकही ग्राहक घेत नाही. 

 

पुढील स्‍लाइडवा पाहा, रोहित्रे जळाल्याचा तपशील...  

बातम्या आणखी आहेत...