आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राच्या साखरपुड्याचा आनंद अपघाताने मातममध्ये बदलला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बालपणीचा जिवलग मित्र बोहल्यावर चढणार होता. घरात आनंदाचे वातावरण होते. मित्र परिवार त्याची फिरकी घेत होता. या आनंदातच शहजाद आणि त्याचे मित्र सोमवारी सकाळी १० वाजता साखरपुड्यासाठी परभणीकडे निघाले. सकाळी अकराच्या सुमारास करमाडजवळ कारचा भीषण अपघात होऊन आनंदाचे वातावरण क्षणात मातममध्ये बदलले. उशीर झाला म्हणून त्यांची गाडी वेगाने अंतर कापत होती. मात्र, हाच वेग त्यांच्या जिवावर उठला आणि चार जिवलग मित्रांचा करुण अंत झाला. 


बायजीपुरा आणि दिल्ली गेट भागातील मित्र परभणी येथे जात होते. सोमवारी सकाळी ११ वाजता करमाडपासून दोन किलोमीटर अंतरावर सटाणा फाट्याजवळ कारचा अपघात झाला. यात भावी नवरदेव शहजाद युनूस शेख, तबरेज खान राजू खान, शेख मुझफ्फरोद्दीन वैजोद्दीन शेख, अबुदबीन हसनबीन समेदा यांचा जागीच मृत्यू झाला, तर शफी खान सलीम खान व उमर हसनबीन समेदा हे दोघे गंभीर जखमी झाले. हे चौघेही लहानपणापासून जिवलग मित्र होते. मित्र परिवारात सुख, दु:खाच्या क्षणात ते कायम मदतीसाठी तत्पर असायचे. दोन महिन्यांपूर्वीच मुझफ्फर याचे लग्न झाले होते. तर शहेजादचा साखरपुडा सोमवारी होणार होता. शहेजादचे शहागंज परिसरात फळांचे दुकान आहे. मुझफ्फर हा किराणा दुकान चालवतो. आबुदचे चारचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. तबरेज आणि शेख मुजफ्फरोद्दीन हे दोघे वर्कशॉपला कामाला जातात. हा अपघात झाला तेव्हा शहेजादचे आई-वडील, भाऊ हे जिंतूरपर्यंत पोहोचले होते. अपघात झाल्याचे कळताच त्यांनी लगेच गाडी वळवली आणि थेट घाटीत पोहोचले. काही दिवसांतच सेहरा बांधणाऱ्या तरुण मुलाच्या अंगावर कफन पाहून ते घाटीत ओक्साबोक्शी रडायला लागले. बायजीपुरा आणि दिल्ली गेट परिसरातील हजारपेक्षा जास्त तरुण आणि नातेवाईक घाटीतील शवविच्छेदन विभागात आले होते. माजी खासदार उत्तमसिंह पवार, माजी महापौर बापू घडमोडे, संजय केणेकर, नगरसेवक रफिक पठाण हेदेखील घाटीत कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आले होते. 
चौघे होते जिवलग मित्र, सुख-दु:खाच्या क्षणात नेहमी असायचे सोबत 


वरात निघणाऱ्या घरातून निघाला जनाजा 
ज्या घरातून लग्नाची वरात निघणार होती, त्याच घरातून शहेजादचा जनाजा निघाल्याचे पाहून दिल्ली गेट परिसरातील अनेकांचे डोळे पाणावले. बायजीपुऱ्यात तीन तरुणांचा रात्री इशाच्या नमाजानंतर नमाजे जनाजा अदा करण्यात येऊन दफनविधी करण्यात आला. 


टॅक्सीसाठी ८० किमीची वेगमर्यादा 
टॅक्सी परमिट कारसाठी ८० किमीची वेगमर्यादा ठेवण्यात आली आहे. यासाठी कारमध्ये स्पीड गव्हर्नर बसवण्यात येते. त्याशिवाय कारला फिटनेस सर्टिफिकेट मिळत नाही. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा नियम आहे. त्याचे पालन होणे आवश्यक आहे, अशी माहिती मोटार वाहन निरीक्षक सुमंत पाटील यांनी दिली. 


दोन महिन्यांपूर्वीच झाले होते मुझफ्फरचे लग्न 
दोन महिन्यापूर्वीच मुझफ्फरचे लग्न झाले होते, तर अबुद आई-वडिलांना एकुलता एक होता. शहेजाद याला एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. या चाैघांची मैत्री अतिशय घट्ट होती. अबोद रविवारपर्यंत हैदराबादला होता. शहेजादच्या साखरपुड्याला जायचे म्हणून तो रात्रभर प्रवास करून शहरात आला होता. 

बातम्या आणखी आहेत...