आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या ७० जणांनी अडीच तासात बांधला गॅबियन बंधारा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एकत्र आलेले संवेदनशील तरुण ग्रामीण भागात श्रमदान करून पाणीटंचाई िनवारणाची कामे करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील गिधाडा गावात शुक्रवारी ७० जणांनी अडीच तास श्रमदान करून गोल्डी नदीवर गॅबियन बंधारा बांधला. 


मकरंद अनासपुरेंची नाम संस्था, अामिर खानच्या पाणी फाउंडेशनद्वारे राज्यभरात लोकसहभागातून अनेक कामे सुरू आहेत. नामवंत अभिनेते श्रमदान करताना पाहून शहरातील तरुणही ग्रामीण भागात जाऊन साधारण चार ते पाच तास श्रमदानाची कामे करत आहेत. जलदूतच्या माध्यमातून आतापर्यंत बारा वेळा असे उपक्रम राबवण्यात आले आहेत. 


तालासुरात बांधला बंधारा

कोरड्या पडलेल्या गोल्डी नदीच्या काठावर सकाळी आठच्या सुमारास तबला-पेटीचे सूर आणि सोबतीला गाणे अशा धुंदफुंद वातावरणात शहरातील ७० जण दगड उचलत श्रमदान करत होते. त्यांच्यासाठी हा वेगळा अनुभव होता. निमित्त होते गोल्डी नदीवर गिधाडा गावात गॅबियन बंधारा बांधण्याचे. अवघ्या अडीच तासांत दगडावर थर रचत विद्यार्थी, प्राध्यापक, शेतकरी, जलदूतच्या सहकाऱ्यांनी बंधारा बांधला. या भागातल्या दीड किमी परिसरात जलदूतच्या वतीने काम करण्यात येत असून गेल्या वर्षी दोन सिमेंट बंधारे बांधल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला होता. आता या बंधाऱ्यामुळे चारशे गावच्या लोकसंख्या असलेल्या गावात ७० लाख लिटर पाणी साचणार आहे. 


दगड रचून बनवला बंधारा 
किशोर शितोळे यांनी शुक्रवारी दोन तास गोल्डी नदीवर श्रमदान करण्यासाठी यावे, असे आवाहन केल्यानंतर जवळपास ७० लोक या ठिकाणी आले होते. यात प्राध्यापक, शिक्षक, एमआयडीसीचे अधिकारी, विद्यापीठातील विद्यार्थी यांचा समावेश होता. शितोळे यांच्या घरून पैठण तालुक्यातील गिधाडा गावात सर्वजण श्रमदानासाठी जमले होते. त्यात प्राध्यापक प्रेम खडकीकर आणि पैठण तालुक्यात प्राचार्य असलेली त्यांची पत्नी यांनी दुचाकीवर प्रवास करत यामध्ये सहभाग घेतला. शेतकऱ्याच्या विहिरीत निघालेले दगड जमा करत हा बंधारा बांधला. या श्रमदानात शेतकरीही सहभागी झाले होते. 


पाणीपातळी वाढेल 
गेल्या वर्षी या नदीवर बंधारा बांधल्यामुळे आजूबाजूच्या विहिरींना पाणी आले होते. या बंधाऱ्यामुळे पाण्याची पातळी वाढेल. 
- सय्यद सलीम, शेतकरी, गिधाडा 


असा बांधला गॅबियन बंधारा 
सुरुवातीला पात्रात लोखंडी जाळी अंथरली. दोन्ही बाजूंनी किमान पंधरा लोकांनी रांगेत उभे राहून दगड गोळा करून त्यावर रचले. त्यानंतर पुन्हा लोखंडी जाळी अंथरूण त्यात दगड गुंडाळले. त्यामुळे दगडाचे बांधकाम पक्के झाले. आता या दगडासमोर वाळूच्या गोण्या भरून त्याचा थर रचण्यात येईल. त्यामुळे पावसात आलेले नदीचे पाणी या ठिकाणी साचेल. पाण्यासोबत आलेला गाळ, पालापाचोळा दगडाच्या फटीत जाऊन बसेल. 


१६ गावांत १८ बंधारे बांधले 
श्रमदानासाठी दोन तास द्या, असे आवाहन केले होते. अनेकांनी प्रतिसाद दिला. कमी खर्चात हा बंधारा पूर्ण झाला. पैठण आणि फुलंब्रीतील १६ गावांत १८ बंधारे बांधले. 
- किशोर शितोळे, जलदूतचे अध्यक्ष 


रविवारी केले वृक्षारोपण 
रविवारी गिधाडा गावात ६० जणांनी एकत्र येत ज्ञानेश देशपांडे यांच्या शेतात एक हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात ३२५ झाडे लावली. त्यासाठी अगोदरच नारळाचा भुसा, गांडूळ खत टाकून बेड तयार केले होते. या वेळी खैर, पिंपळ, उंबर, मेंदी, हिरडा, कवठ, वड, बेहडा, पळस, बाभूळ अशी झाडे लावण्यात आली. यासाठी पुण्यातून आयटीची सहा मुले सहकुटुंब आली होती. 


पहिल्यांदाच काम केले 
पाणी वाचवणे काळाची गरज आहे. श्रमदान करण्यासाठी मी पत्नीसह येथे आलो. प्रत्येकाने चार तास श्रमदानासाठी दिले तर पाणी अडवले जाऊ शकते. 
- प्रेम खडकीकर, प्राध्यापक, बीजीपीएस कॉलेज ऑफ एज्युकेशन 

बातम्या आणखी आहेत...