आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराची कचराकुंडी, आठ दिवस उलटूनही म्हैसकरांच्या सूचनांची अंमलबजावणी नाहीच !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरात ठिकठिकाणी साठलेल्या ९ हजार टन कचऱ्याची शहरातच विल्हेवाट लावा, असे आदेश नगरविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी ९ मार्च रोजी दिले होते. त्यास आठ दिवस झाल्यावर नेमकी काय स्थिती आहे, याची तपासणी दिव्य मराठी प्रतिनिधीने केली असता ६ हजार टन कचऱ्याची विल्हेवाट लावल्याचा दावा मनपातर्फे करण्यात आला. अनेक ठिकाणी नाल्यालगत, गटारींमध्येही कचरा टाकला जात आहे. प्लास्टिक बंदीची फक्त घोषणा झाली असून बाजारात सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे दिसून आले. जुन्या शहरात खुली जागाच नसल्याने तेथे ढिगारे कायम आहेत. नगरविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवांच्या आदेशाचीही मनपा अंमलबजावणी करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. 

 

मनपा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार प्रभाग एकमध्ये १३०, दोनमध्ये ३००, तीनमध्ये ८००, पाचमध्ये चार, सहामध्ये १२, सातमध्ये २३०, नऊ ११० टन कचरा शिल्लक आहे. मिटमिट्यात ५०, कांचनवाडीत १५००, गोलटगावला १७००, मांडकी शिवारात १००, हर्सूल जांभूळवनात १५०, बाभूळगावात २५, बीड बायपासला १६००, बेगमपुरा स्मशानभूमी ८०, नारेगाव स्मशानभूमी १०, रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाजवळील खुली जागा ५ टन, एन १२ सत्यविष्णू हॉस्पिटलसमोर ७०, गरवारे स्टेडियम बाजूला १०० असा सुमारे सहा हजार टन कचरा खड्ड्यात टाकण्यात आला. दरम्यान, नारेगाव येथे कचऱ्यापासून खताऐवजी वीज निर्मिती प्रकल्पाला प्राधान्य असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. ते म्हणाले की, यासाठी प्रस्ताव दाखल करण्याची मुदत १९ मार्च आहे. 


वॉर्ड अधिकाऱ्यांना ३ लाख रुपये खर्चाचा अधिकार 
प्रभारी मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी शुक्रवारी सायंकाळी मनपात बैठक घेतली. त्यात वॉर्ड अधिकाऱ्यांना तीन लाखांपर्यंतच्या कामाचा अधिकार दिला. या वेळी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त वसंत निकम, रवींद्र निकम, शहर अभियंता सखाराम पानझडे, उदय टेकाळे, घनकचरा विभाग प्रमुख डॉ. डी.पी. कुलकर्णी, सर्व वॉर्ड अधिकारी, उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी वॉर्डात कचरा प्रक्रियेसाठी जागा शोधाव्यात. अतिरिक्त रिक्षा उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी सांगितले. 

 

राम आज जागांची पाहणी करणार 
जिल्हाधिकारी एन. के. राम महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच कामाला सुरुवात केली आहे. शनिवारी सकाळीच शहरात खुल्या जागांचा शोध घेणार आहेत. कचरा समस्या ४५ दिवसांत सुटेल अशा पद्धतीने कालबद्ध कार्यक्रम जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

पालकमंत्री घेणार आज बैठक 
शहरातील कचराकोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत शनिवारी शहरात येत असून दुपारी २ वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतील. या वेळी विभागीय आयुक्तांपासून जिल्हाधिकारी तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...