आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री म्हणाले- ६ हजार टन कचऱ्याची विल्हेवाट, प्रत्यक्षात ६.५ हजार टन कचरा तसाच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -शहरातील ७६ टक्के म्हणजे सुमारे सहा हजार टन कचऱ्याची विल्हेवाट लावल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (१४ मार्च) विधानसभेत दिली. प्रत्यक्षात, गल्लीबोळांमध्ये ढिगारे कायम असून २२ मोठ्या वसाहतींजवळ किमान साडेसहा हजार टन कचरा पडून असल्याचे 'दिव्य मराठी' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत समोर आले. नगरविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी ९ मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार कचरा रिचवण्यासाठी विशेष अधिकारी नियुक्त झाले. पण ते पहिले दोन दिवस बैठकांत अडकले. नंतर त्यांना खत निर्मितीसाठी योग्य जागा सापडेनात. दुसरीकडे रोजचा कचरा पडतच आहे. मनपाकडून सोयीनुसार कुठेही कचरा टाकून अघोषित डेपो केले जात असल्याने नागरिक तो पेटवून देत आहेत. यामुळे प्रदूषण वाढत आहे. 

 

कचरा प्रक्रियेसाठी मनपाच्या जागा वापरू द्या, त्रास झाल्यास जबाबदारी माझी : राम 
शहरात रोज निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर आम्ही आता प्रक्रिया करून खत निर्माण करतोय. प्रक्रिया होत असताना दुर्गंधी येणार नाही. जर कोणाला त्रास झाला तर ती पूर्णत: माझी जबाबदारी असेल. नागरिकांनी परंपरागत मानसिकता बदलून महापालिका व शासकीय जागा या प्रक्रिया प्रकल्पांसाठी वापरण्यास विरोध करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त एन. के. राम यांनी केले. 
शनिवारी त्यांनी मनपा व सरकारी १०२ जागांची यादी तयार केली. त्याची प्रत्यक्ष पाहणी केल्यावर त्यातून काही जागांची ते प्रक्रिया प्रकल्पासाठी निवड करणार आहेत. नारेगावकरांच्या आंदोलनाचे कौतुक करत ते म्हणाले, जर हे आंदोलन झाले नसते तर कदाचित कचरा पुन्हा तसाच डम्प होत राहिला असता. या आंदोलनाचेे कचऱ्यावर प्रक्रियेची क्रांती होणार आहे. त्याचे स्वागतच केले पाहिजे. 


आमदार इम्तियाज यांचे दिले उदाहरण : सकाळी राम यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. तेव्हा काही नागरिकांनी कचरा टाकल्यानंतर दुर्गंधी पसरत नाही, असे एखादे तरी ठिकाण सांगा, असे विचारले. तेव्हा त्यांनी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानाचे उदाहरण दिले. इम्तियाज यांच्या घरापासून ५० फूट अंतरावर कचऱ्यावर प्रक्रिया होते. आमदारांना दुर्गंधी येत तर नाहीच, उलट नागरिक तेथे बसून जेवतातही, असे त्यांनी सांगितले. 
८५ टेम्पो भाड्याने लावणार : दररोज कचरा उचलला जात नसल्याने छोटे हॉटेल चालक, व्यापारी सायंकाळी दुभाजकावर कचरा टाकत आहेत. म्हणून सोमवारपासून ८५ टेम्पो भाड्याने लावून कचरा उचलला जाईल, असेही राम म्हणाले. 


शहरात साचलेल्या ७६ टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावल्याचा दावा महापालिकेने दिलेल्या माहितीआधारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असला तरी वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. शहरातील गल्लीबोळात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचून आहेत. आकाशवाणीलगतच्या जवाहर कॉलनी रोडचे हे दृश्य त्याचाच पुरावा. छाया : रवी खंडाळकर 
एकेकाळच्या कचरा कुंडीचा आता झाला डेपो 


'दिव्य मराठी' प्रतिनिधीने शनिवारी पाहणी केली असता आकाशवाणी चौकातील बिगबाजारच्या बाजूला पूर्वी एक कचरा कुंडी होती. आजघडीला तेथे किमान २००० टन कचरा आहे. बारुदगर नाला येथेही ५० टनांपेक्षा अधिक कचरा आहे. औरंगपुरा भाजी मंडई, सेंट्रल नाका, मध्यवर्ती बसस्थानकासमोर तसेच बुढीलेन, शहागंज, कबाडीपुरा, किलेअर्क, भोईवाडा, पदमपुरा, एमजीएम ते सेंट्रल नाका रोड, रोशन गेट येथेही कचऱ्याचे मोठे ढिगारे आहेत. एकुणात साडेसहा हजार टन कचरा सध्या पडलेला असावा, असे मनपाच्या अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. 


मानसिकता बदला 
पूर्वी घरात शौचालयांना विरोध होता. आता घरातच शौचालये आहेत. कारण मानसिकता बदलली आहे. कचरा प्रकल्पांसाठीही मानसिकता बदलावी, असे आवाहन राम यांनी केले. 


जिल्हाधिकाऱ्यांकडे आज बैठक 
कचऱ्यावर तातडीने प्रक्रिया करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती तसेच खासगी संस्था यांच्यासमवेत प्रभारी आयुक्त एन. के. राम यांनी रविवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली आहे. प्रबोधनाऐवजी प्रत्यक्ष कृतीचा योग्य पर्याय देणाऱ्यांना तातडीने काम दिले जाणार आहे. 


विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांच्या कल्पनेतून 'स्वच्छता हीच सेवा' मोहीम 
दोन हजार कर्मचाऱ्यांनी अडीच तासांत गोळा केला दुर्गंधीतून १ लाख ४४ हजारांचा कचरा 
कचराकोंडीतून बाहेर पडण्याचा एक पर्याय म्हणून विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सुका कचरा वेगळा करण्यासाठी शनिवारी 'स्वच्छता हीच सेवा' मोहीम शासकीय कर्मचारी, पोलिस दलामार्फत राबवली. त्यात २ हजार कर्मचाऱ्यांनी सकाळी ७ ते ९ या दोन तासांत १८ टन कचरा गोळा केला. तो विकल्यास त्यातून १ लाख ४४ हजार रुपये जमा होतात. 
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार आजघडीला रस्त्यावर १८२९ टन कचरा पडून आहे. त्यातील निम्म्या म्हणजे ९०० टन सुक्या कचऱ्यात ७२ लाख रुपये दडलेले आहे. डॉ. भापकरांप्रमाणे नागरिक हा कचरा उचलणार नाही. परंतु यापुढे जर सुका कचरा वेगळा केला तर ते पैसे कमावू शकतात, असे या मोहिमेतून स्पष्ट झाले. दोन हजार कर्मचाऱ्यांनी दोन तास दिले. परंतु कचरा साठवून तो भंगारवाल्याला दिला तर तेवढे श्रमही करावे लागणार नाहीत. डॉ. भापकर यांनी रस्त्यावर पडून दुर्गंधीयुक्त कचऱ्यातून फक्त सुका कचरा ओला करण्याचे आवाहन केले होते. पोलिसांनी थेट वर्दीवरच कचरा गोळा करावा, अशी सूचना प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केली होती. त्याचे पालन पोलिसांनी केले. 
सायंकाळी झालेल्या मोजणीत १८ टन कचरा गोळा झाल्याचे समोर आले. यात कागदी पुठ्ठे, प्लास्टिक, बाटल्या तसेच फायबर, थर्माकोल याचा समावेश आहे. पुठ्ठे ६ रुपये दराने, तर बाटल्या नि फायबर १५ रुपये दराने विकले जाते. सरासरी ८ रुपये असा दर या कचऱ्याला पडतो. त्यानुसार १८ टनांतून १ लाख ४४ हजार रुपये संबंधिताला मिळतील. मात्र ३० हजार जणांमार्फत ३० टन कचरा गोळा झाल्याचा दावा भापकरांनी केला. 

पोलिसांनी वेधले लक्ष : प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलिसांना योग्य रीतीने जबाबदारी वाटून दिली होती. उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे यांनी विद्यापीठ परिसरातून स्वच्छतेला सुरुवात केली. 
सुरुवात सर्वांनीच करावी : मोहिमेतील सहभागामुळे गेल्या काही दिवसांत पोलिसांविषयी निर्माण झालेला रोष नक्कीच कमी होईल. नागरिकांनी आपापल्या परिसरातील शक्य तितका सुका कचरा वेगळा करून त्याची विल्हेवाट लावावी, असे भारंबे म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...