आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचराकोंडी: मुदतीतील 45 पैकी 32 दिवस संपले तरी 40% कचरा पडूनच!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना ४५ दिवसांची मुदत दिली होती. त्या मुदतीतले ३२ दिवस गुरुवारी संपले. मात्र, अद्यापही कचराकोंडी कायम आहे. शहराच्या विविध भागांत ४० टक्के ओला- सुका कचरा एकत्रच पडून असल्याचे खुद्द भापकरांनीच कबूल केले. त्यांनी मनपा अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन शुक्रवारपासूनच १०० टक्के वर्गीकरणाचा कचरा गोळा करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी तंबी दिली.


दरम्यान, घनकचरा व्यवस्थापनासाठी सात जागा निश्चित केल्या आहेत. अजून तीन जागांचे प्रस्ताव आले असल्याचे भापकरांनी सांगितले.
नारेगावकरांनी नाक दाबल्यामुळे निर्माण झालेली कचराकोंडी फोडण्यासाठी म्हैसकरांनी बैठक घेऊन पाच कलमी कार्यक्रम दिला होता. त्यानुसार कचऱ्याचे ९० वॉर्डांत वर्गीकरण करण्यात येईल, असे महापालिकेने न्यायालयात सांगितले होते. त्यानंतर २८ मार्च रोजी दिलेल्या शपथपत्रात ९१ वॉर्डांत कचऱ्याचे वर्गीकरण सुरू असून उर्वरित वॉर्डांत चार दिवसांत वर्गीकरण करण्यात येईल, असे न्यायालयास सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष दोनच प्रभागांत म्हणजे ३० वॉर्डांतच कचऱ्याचे १०० टक्के वर्गीकरण होत आहे. उर्वरित चार प्रभागांत म्हणजे १२० वॉर्डांत अद्यापही कचऱ्याचे वर्गीकरणच होत नसल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने भापकर चांगलेच संतापले आहेत.

 

ओला- सुका कचरा एकत्र दिल्यास आजपासून दंड आकारणार
उर्वरित प्रभागांत कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी कडक मोहीम राबवा. चुकी करणाऱ्यांना माफी नाही. लोकांकडून शुक्रवारपासून वर्गीकरण केलेला कचराच घ्या. अन्यथा दंड आकारा. रस्त्यावर कचरा येऊ नये म्हणून घरोघरी जाऊन कचरा उचला. ही जबाबदारी मनपा अधिकारी- कर्मचाऱ्यांची आहे. मिश्र कचरा घेतला तर आपल्यावरही कारवाई होईल. शुक्रवारपासून जे नागरिक मिश्र कचरा देतील, त्यांना दंड आकारा आणि प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश भापकरांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले.

 

कचराकोंडीस आपण जबाबदार, आपण निस्तरू
कचराकोंडीस आपणच जबाबदार असून ही कोंडी आपणालाच फोडावी लागेल. वर्गीकृत कचरा संकलनासाठी ६५ गाड्या दिल्या आहेत. कांचनवाडीत सुक्या कचऱ्यासाठी ३० लाखांची तरतूद करून जागा आरक्षित केली आहे. ११ कोटी रुपये खर्चून बंद स्वरूपात कचरा वाहतूक आणि अत्याधुनिक सुविधा असलेल्या गाड्या सात दिवसांत खरेदी होतील, असे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले.

 

४३६ कंपोस्टिंग पीट तयार
कचऱ्याच्या कंपोस्टिंगसाठी विभागीय आयुक्तांच्या समितीकडे ७ जागांचे प्रस्ताव आले आहेत. त्या जागांवर ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होईल. सुका कचरा वेगळा केला जाईल. आतापर्यंत ४३६ कंपोस्टिंग पीट तयार केले आहेत. विकेंद्रीकरण पद्धतीने कंपोस्टिंग होणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून जागा निश्चित केल्या जातील. स्वच्छता निरीक्षकांनी नीट काम केले नाही तर त्यांच्यावर कारवाई होईल, असे विभागीय आयुक्त डॉ. भापकर म्हणाले.

 

कंपोस्टिंगसाठीच्या ७ जागा अशा : चिकलठाणा (५ एकर), रमानगर (२ एकर), पडेगाव (५ एकर), कांचनवाडी (५ एकर), नारेगाव (५ एकर), हर्सूल (२ एकर), मिटमिटा (५ एकर).

बातम्या आणखी आहेत...