आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार शिरसाटांनी स्वत:हून निर्माण केला संभ्रम, शिवसेना सोडून भाजपवासी होणार अशी चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात औरंगाबाद पश्चिमचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी व्यासपीठावर येण्यास नकार दिला. व्यासपीठावरील दोन नेत्यांनी विचारणा करून, महापौरांनी हात धरून वर नेण्याचा प्रयत्न करूनही ते व्यासपीठावर गेले नाहीत. अंतर्गत वादामुळे ते व्यासपीठावर आले नसले तरी त्यांच्या या आणि अलीकडच्या वागण्याने ते शिवसेना सोडून भाजपवासी होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. स्थापनेपासूनचा हा शिवसैनिक सहजासहजी पक्ष सोडणार नाही, असे अनेकांना वाटत असले तरी संभ्रम मात्र निर्माण झाला आहे. त्यामुळे ते शिवसेनेतच राहणार किंवा भाजपमध्ये नक्कीच जाणार, असे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही.

 

गेल्या काही महिन्यांपासून शिरसाट यांचा संघटनात्मक बैठकांतील वावरही कमी झाल्याचे दिसते. दुसरीकडे त्यांचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी पुन्हा-पुन्हा फाटतच आहे. यापूर्वी त्यांचे खैरे यांच्यासोबत अनेक वेळा वाजले आहे. परंतु त्यांनी थेट व्यासपीठावर न येण्याची कृती केली नव्हती. या वेळी त्यांनी हे धाडस का बरे दाखवले, यावरून संभ्रम वाढला आहे. त्याचे दुसरेही एक कारण आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला आयते उमेदवार हवे आहेत आणि त्या समीकरणात शिरसाट फिट बसतात. यामुळेच ते भाजपमध्ये जाणार असे शिवसैनिक बोलू लागले आहेत.


 
भाजपची दारे बंद?
पश्चिम मतदारसंघासाठी भाजपकडे इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. तेव्हा बाहेरच्या उमेदवाराला का बरे घ्यायचे, असा युक्तिवाद भाजपमध्ये आहे. २०१४ च्या निवडणुकीत ऐनवेळी युती तुटली. पश्चिम मतदारसंघात भाजप आतापर्यंत कधी लढली नव्हती. तरीही त्यांच्या उमेदवाराने शिरसाट यांच्या नाकी दम आणला होता. या वेळी पक्षाला वेळ मिळाला आहे. राजू शिंदे, बाळासाहेब गायकवाड, जालिंदर शेंडगे, चंद्रकांत हिवराळे असे चेहरे भाजपकडून सज्ज आहेत. इतक्या भाऊगर्दीत बाहेरचा उमेदवार कसा चालेल, असाही प्रश्न आहे.

 

उमेदवारी नक्की, पण ..
शिरसाट यांचे खासदार खैरे यांच्यासमवेत कितीही वाद झाले तरी पुढील निवडणुकीत सेनेकडून तेच उमेदवार असतील हे मात्र पक्के आहे. मात्र गतवेळी घटलेले मताधिक्य, नंतरच्या काळात वाढती नाराजी यामुळे येथून निर्विवाद विजयाबाबत त्यांनाही शंका उपस्थित होऊ लागली आहे. त्यामुळेच ते भाजपचा विचार करत असावेत.

बातम्या आणखी आहेत...