आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यंदा दर्जेदार बीजोत्पादन करण्याचा निर्धार; शेतकऱ्यांना कृ़षी विभागाकडून मार्गदर्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्यात बीज उत्पादनाचे क्षेत्र नाममात्र आहे. त्यामध्ये वाढ करून शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ करणे आणि दर्जेदार बियाणे निर्मितीवर भर दिला जाणार आहे. गुणवत्तापूर्ण बियाणे शेतकऱ्यांनीच निर्मिती करून बीज उत्पादक उद्योजक व्हावे. तसेच उत्पादित बियाणे प्रक्रिया करून वापरण्यास प्राधान्य दिल्यास अपेक्षित उत्पादनात वाढ करता येते. किफायतशीर दरात शेतकऱ्यांना बियाणे मिळेल. या सर्व बाबींचा विचार करून यंदा बीजोत्पादन क्षेत्रात वाढ करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने हाती घेतले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.    


जमीन, मशागत, हवामान, पाणी, खते आणि वापरण्यात येणारे बियाण्यावर शेतीचे उत्पादन अवलंबून आहे.  बियाणे शुद्ध आणि चांगल्या प्रतीचे असल्याशिवाय खते, पाणी, मशागतीला काहीच अर्थ उरत नाही.   बियाणे उत्पादनात आपण अजूनही खूप मागे आहोत. 


बदलत्या हवामानात तग 
धरणाऱ्या वाणाचा अभाव आहे. गहू बियाण्याची ३.१२ दशलक्ष टन आवश्यकता आहे. त्यापैकी ९ टक्के बियाणे उत्पादित केले जाते व ते वापरलेही जाते. उर्वरित ९१ टक्के गव्हाचे बियाणे शेतकरी स्वत:चे वापरतात. 


भाताचे १.३ दशलक्ष टन बियाणे आवश्यक असताना केवळ २ लाख टन म्हणजे केवळ १५ टक्के बियाणे वापरले जाते, अशी नोंद राहुरी कृषी विद्यापीठाने घेतली आहे. मका, ज्वारी, बाजरी, फुले, भाजीपाला, मूग, उडीद, जवस, सूर्यफूल, कांदा, मिरची यासह ३० पेक्षा अधिक पिकांचे बीज उत्पादन अत्यल्प होते. परिणामी बाजारात १०० ग्रॅम, ४५० ग्रॅमसाठी शेतकऱ्यांना एक हजार रुपयांपर्यंत किंमत मोजावी लागते. 


एवढे पैसे मोजूनही बियाण्यांची मागणी जास्त असल्याने निकृष्ट दर्जाचे, भेसळयुक्त बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे प्रकार वाढले आहेत. बीटी कपाशी बियाणे गुलाबी बोंडअळी पुढे अपयशी ठरत आहे. यामुळे शेती तोट्यातून जाऊन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळत आहे. राज्य राष्ट्रीय उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होत आहे. याकडे सर्वांनी गांभीर्याने बघून बीजोत्पादन क्षेत्रात वाढ करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी कृषी विभागाने विशेष काम करावे, असे आदेश राज्य कृषी विभागाचे अपर सचिव विजय कुमार यांनी दिले आहेत.  

बातम्या आणखी आहेत...