आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 महिन्यांत विभागनिहाय निधी वाटपासाठी सुधारणा कराव्यात, राज्‍यपालांचे आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्यातील वैधानिक विकास मंडळांनी अधिक सक्षमपणे काम करण्याची  गरज अाहे. या मंडळांना आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी नियोजन विभागाने कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, अशा सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी साेमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दिल्या. तसेच काही भागांत अनुशेष दूर करण्यासाठी निधीचे समान वाटपाचे जे सूत्र आहे ते बदलण्याची गरज असून विभागनिहाय निधी वाटपासाठी आवश्यक त्या सुधारणा नियोजन विभागाने येत्या तीन महिन्यांत कराव्यात, अशा सूचनाही केल्या.  


राज्यातील विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ यांची संयुक्त बैठक साेमवारी राजभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत  पार पडली.  दोन तास ही बैठक पार पडली. या वेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्यासह विकास मंडळांचे अध्यक्ष, सचिव, सदस्य उपस्थित होते.   


मराठवाडा विकास मंडळातर्फे सुरुवातीला विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी मराठवाड्याची सद्य:स्थिती मांडली, तर मुकुंद कुलकर्णी यांनी आरोग्य शिक्षण  आणि उद्योगाच्या बाबतीत सादरीकरण केले. या वेळी मराठवाड्यात रुग्णालयांची कमतरता तसेच डॉक्टरांच्या संख्येबद्दल त्यांनी सादरीकरण केले. त्यानंतर  शंकरराव नागरे यांनी सिंचनाच्या प्रश्नावर सादरीकरण केले. यामध्ये अमरावतीला २०१० ते २०१८ दरम्यान  अनुशेष दूर करण्यासाठी ६१४८ कोटींचा निधी दिला आहे. यातून त्याचे ६९ हजार हेक्टर सिंचन झाले असून अजून एक लाख ८३ हजार हेक्टर बाकी आहे. अमरावतीच्या धर्तीवर मराठवाड्याला ५० टक्के निधी देण्यात यावा तसेच अनुशेषाच्या बाबतीत तज्ज्ञांच्या माध्यमातून समिती नेमून निधीच्या वाटपाबाबत उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली. त्या सूचनेवर राज्यपालांनी नियोजन विभागाच्या माध्यमातून तीन महिन्यांत बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कोकण, नागपूरच्या प्राणहिता नदी तसेच कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्याला दीडशे टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरे यांनी केली.   


सक्षमपणे काम करण्याची गरज   
‘विकास मंडळांनी कार्यक्षमता वाढवून कालबद्ध पद्धतीने या तिन्ही विभागांचा विकास अधिक होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तिन्ही विकास मंडळांनी केंद्र व राज्य शासनाचे जे महत्त्वाकांक्षी प्रकल्प, योजना आहेत त्या राबवण्यासाठी अधिक भर दिला पाहिजे. आदिवासी भागातील मुले शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी,’ असे राज्यपालांनी सांगितले. या वेळी नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी लोणार सरोवराच्या स्वच्छतेसाठी आणि पर्यटनाला चालना मिळावी यासाठी हाती घेतलेल्या ‘मी लोणारकर’ मोहिमेविषयी सांगितले. त्याचा राज्यपालांनी आपल्या भाषणात विशेष उल्लेख करून या उपक्रमाचे कौतुक करत  प्रभावीपणे हा उपक्रम राबवण्याचे आवाहन केले.   

 

समन्वय समितीची गरज  

मुख्यमंत्री म्हणाले,  विदर्भ, मराठवाडा भागातील सिंचन, आरोग्य, शिक्षण, कृषीच्या विकासासाठी विकास मंडळांनी लक्ष केंद्रित करून काम करण्याची गरज आहे. तिन्ही विकास मंडळांनी केलेल्या सूचनांच्या समन्वयासाठी एक समिती असणे आवश्यक आहे. विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंपांना वीज जोडणी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.

बातम्या आणखी आहेत...