आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री म्हणाले, खदानी शोधा; नागरिकांनी खदानीपर्यंत पोहोचूही दिले नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खदानींची पाहणी करण्यासाठी पथक येत असल्याचे कळताच नागरिकांनी ट्रॅक्टर आडवे लावून रस्ता रोखला. छाया : मनोज पराती - Divya Marathi
खदानींची पाहणी करण्यासाठी पथक येत असल्याचे कळताच नागरिकांनी ट्रॅक्टर आडवे लावून रस्ता रोखला. छाया : मनोज पराती

पाहणी पथकासोबत ‘दिव्य मराठी’चा वार्ताहर
> सकाळी ११.३० ते सायं. ६.००  
औरंगाबाद शहरात दररोज निर्माण होणारा कचरा टाकण्यासाठी  तात्पुरता उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराजवळच्या खदानी शोधा, अशी सूचना बुधवारी सायंकाळी केली. त्यानुसार गुरुवारी (८ मार्च) सकाळी ११ वाजता महापौर बंगल्यावरून महापालिकेचे पथक खदानी पाहणीसाठी निघणार होते. खासदार चंद्रकांत खैरे स्वत: या पथकात असणार, असा निरोप असल्याने मी १२ वाजता पोहोचण्याचे ठरवले होते. परंतु खैरे सव्वाअकरा वाजताच महापौर बंगल्यावर आल्याचे समजल्यानंतर  साडेअकराच्या ठोक्याला महापौरांच्या ‘रायगड’ बंगल्यावर पोहोचलो. तेव्हा खैरे महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, सभागृह नेते विकास जैन, माजी सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, आयुक्त दीपक मुगळीकर यांच्यासोबत चर्चा करत बसले होते.  पत्रकार आल्याचे समजताच घोडेले बाहेर आले अन् दुसऱ्या दालनात पत्रकारांच्या बसण्याची तसेच चहापानाची व्यवस्था केली. दरम्यान, ११.३० वाजता एक ठेकेदार चर्चा करण्यासाठी बंगल्यावर पोहोचला. खैरे त्याला आणखी एका वेगळ्या दालनात घेऊन गेले व त्याच्याशी बोलू लागले, तर मुगळीकर पत्रकारांकडे आले. आता काय करायचे, खदानींकडे काय स्थिती असेल, अशी चर्चा सुरू असतानाच सावंगी येथील टोल नाक्यावर पोलिस पथक महापालिका पथकाची प्रतीक्षा करत असल्याचा निरोप आला. मात्र, खैरे आणि ठेकेदाराची आत चर्चा सुरू होती. माझ्या मालकीच्या जमिनीतच कचरा टाकावा, असा ठेकेदाराचा आग्रह असल्याचे सांगण्यात आले.   


दीड तास ठेकेदारासोबत
एक वाजला तरी खैरे-.ठेकेदाराची चर्चा संपेना. स्वत: आयुक्तांनी महापौरांकडे साहेब, ११ ची वेळ होती, आणखी किती वेळ चालेल खैरे साहेबांची चर्चा, अशी विचारणा केली. तेव्हा घोडेले यांनी ‘माजी आमदार प्रदीप जैस्वाल व आमदार संजय शिरसाट तिसगाव येथे चर्चा करण्यासाठी गेले आहेत. ते आले की निघू. फक्त पाचच मिनिटे थांबा.’ असे म्हटले. उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार रमेश मुनलोड हेही अधूनमधून खोलीत डोकावत अन् बाहेर लॉनवर जाऊन बसत. नियोजन बिघडत चालल्याने वैतागलेले शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली आपापल्या मोबाइलमध्ये व्यग्र झाले होते.  

 

एक वाजून ५० मिनिटे
जैस्वाल व शिरसाट आले अन् बरोबर दोन वाजता ११ मोटारींचा ताफा खदान पाहणीसाठी निघाला. त्या वेळी पत्रकारांनी सोबत येऊ नये, अशी माझी इच्छा असल्याचे खैरे म्हणाले. ‘तुमच्यामुळेच हा खेळ पेटला आहे. तुम्हीच बदनामी केली’ असे म्हणून ते मोटारीत बसले. इकडे विकास जैन यांनी पत्रकारांनी माझ्या मोटारीत यावे, असे आधीच सांगितले होते. परंतु खैरेंनी पत्रकारांना सोबत घेण्यास विरोध केल्याने ‘आता माझी अडचण होईल’ असे ते हळू आवाजात म्हणाले. पत्रकारही काय समजायचे ते समजले आणि सभापती बारवालांच्या मोटारीत बसले.  

 

हर्सूल जेलकडे  
नियोजनानुसार पथक आधी सावंगी येथील खदानी पाहण्यासाठी जाणार होते. परंतु ताफा हर्सूल जेल येथून तलावाकडे वळला. तेव्हा समजले की आधी तलावासमोरील गोल्फ कोर्टची पाहणी होणार आहे. तेथे पाहणीसाठी  ताफा थांबला. पथकातील अधिकाऱ्यांनी मोबाइलवरून काही माहिती घेतली. दहा मिनिटांनंतर म्हणजे अडीचच्या सुमारास गाड्या सावंगीकडे रवाना झाल्या.

 

खदानीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दगड
जळगाव रोडवरून खदानीकडे रस्ता जातो तेथे आम्ही पोहोचलो तर गाड्या रोडवरच थांबवाव्या लागल्या. खाली उतरून बघितले तर खदानीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दगड टाकण्यात आले होते. काट्यांच्या फासाट्या होत्या अन् एक ट्रॅक्टर, एक टिप्पर आडवे लावण्यात आले होते. लगेच नागरिक जमा झाले. तरुण उभ्या ट्रॅक्टरवर चढले.

 

तरुणांची घोषणाबाजी  
आंदोलकांशी बोलण्यासाठी सर्वप्रथम महापौर पुढे झाले. पाठोपाठ पानझडे व नंतर आयुक्त मुगळीकरही पोहोचले. तरुणांनी ‘कचरा टाकू देणार नाही’ अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यांना शांत करताना महापौरांनी ‘सहकार्य करावे लागेल. असा विरोध करून कसे चालेल?’ अशी सुरुवात केली. तोपर्यंत जैस्वालही आले. विरोध करणाऱ्यांमध्ये एक जैस्वाल यांचा कट्टर समर्थक होता. त्याने जमावातून बाहेर येत शिवसेना स्टाइलने जैस्वाल यांचे आशीर्वाद घेतले.

 

तरुणांचा आवाज चढला
मग खैरेही आले आणि बोलण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा ‘आम्ही कचरा टाकू देणार नाही, तुमच्या शहरातील कचरा आमच्या गावात कशापायी, आमच्या गावाला येथून पिण्याचे पाणी जाते’, असे नागरिक म्हणू लागले.  खैरेंनी ‘काही दिवसांचा अवधी द्या, मार्ग निघेल’, अशी विनंती केली. परंतु नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हतेच. महापालिकेचे अपयश आमच्या माथी नकोच, असे ते ठामपणे म्हणत होते. नंतर तरुणांचा आवाज वाढला, घोषणाबाजीही वाढली. मध्येच पथकातील एकाने म्हटले, चला ट्राफिक जाम होत आहे. त्याचे म्हणणे म्हणजे पडत्या फळाची आज्ञा मानून सर्व जण मोटारींकडे वळले. साधारण पंधरा मिनिटांत इथला प्रकार संपला.

 

तुम्ही डन करा, आम्ही एनओसी देतो  
आयुक्तांची मोटार जळगावच्या दिशेने निघाली तर खैरे, आमदार शिरसाट, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे परतीच्या दिशेने निघाले. आयुक्त कोठे जाताहेत ही उत्सुकता आम्हाला होती. आम्ही त्यांच्या पाठीमागेच होतो. तर चौका घाटाच्या अलीकडील स्टेपिंग स्टोन शाळेच्या प्रांगणात आयुक्तांची मोटार शिरली. शाळेच्या मैदानावर मोटारी थांबल्या. तेथून आयुक्तांनी खदानी दाखवल्या. ‘येथे कचरा टाकण्यास लोकांना काय प्रॉब्लेम आहे?’ असा प्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारला. आजूबाजुला गाव नाही, तरीही विरोध होतोच, असे स्वत:च म्हणत त्यांनी हाच प्रश्न पुन्हा अधिकाऱ्याला विचारला, ‘पानझडे, येथे कचरा टाकायला काय प्रॉब्लेम?’ पानझडे म्हणाले ‘काहीच नाही, फक्त जायला मार्ग हवा.’ नंतर उपजिल्हाधिकारी हदगल यांना त्यांनी तोच प्रश्न केला. हदगल लगेच म्हणाले, काहीच प्रॉब्लेम नाही, साहेब, तुम्ही डन करा, मी तुम्हाला लगेच एनओसी देतो. ते ऐकून आयुक्तांना हायसे वाटले. तेथून मोटारी निघाल्या.

 

शुगर पेशंट असल्याने वेळेत जेवण  
परतीच्या वाटेवर भाजप नगरसेवक पूनम बमणे यांचा प्रसिद्ध ढाबा लागतो. तेथे महापौर, सभापतींच्या मोटारी थांबल्या. आयुक्त म्हणाले, खैरे साहेब पुढे जाऊन थांबले आहेत. म्हणून मी इथे जेवणार नाही, तुम्हीही चला. परंतु महापौर म्हणाले, मी शुगर पेशंट आहे. वेळेत जेवावे लागेल. मग आयुक्त  रवाना झाले.  जेवणासाठी तीन मोटारींतील सदस्य थांबले.

 

देवळाईतही विरोध  
महापौरांचे जेवण होईपर्यंत खैरे व आयुक्त देवळाईला खासगी खदानीवर पोहोचले होते. केंब्रिज मार्गे महापौरांसह पथक तेथे पोहोचले. तेथे बघतो तर काय, आधीच जमाव जमलेला. नागरिक पदाधिकाऱ्यांना काहीच बोलले नाहीत. पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले, तुम्हीच बघा समोर तलाव आहे, तलावाच्या बाजूला कचरा कसा टाकू देऊ आम्ही?  

 
सिंदोन-भिंदोनच्या डोंगरावरील जागा  
अवघ्या दहा मिनिटांत साधारण साडेचारच्या सुमारास मोटारींचा ताफा तेथून निघाला. खैरेंनी आयुक्त व महापौरांना  ‘डेक्कनवर या’ असा निरोप दिला. महापौर डेक्कनकडे रवाना झाले, तर आयुक्तांची मोटार एमआयटी कॉलेजजवळून साताऱ्याकडे वळली. मागे आम्ही पत्रकार. एक इमारत निरीक्षक त्यांना दिशा दाखवत होता. आयुक्तांची मोटार थेट सिंदोन-भिंदोनच्या डोंगरावर पोहोचली. तेथे स्थानिक रहिवासी करीम पटेल त्यांचीच वाट बघत होते. पठारावर माझी जमीन आहे, तेथे कोणी विरोध करणार नाही. तेथे लोकही राहत नाहीत, असे त्यांनी सांगितले. बाजूला राजकारण्यांच्या शेकडो एकर जमिनी असल्याचेही त्यांनी सांगितले.  

 

जमीन पाहून खुश झालेले आयुक्त म्हणाले,  ‘मस्त जागा आहे. उद्याच निर्णय घेऊ. शुक्रवारी नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसेकर येत आहेत. त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवू’ आणि तेही डेक्कनकडे निघाले. तेव्हा सायंकाळचे सहा वाजले होते. वेळेत बातम्या द्यायच्या म्हणून आम्ही कार्यालयाकडे निघालो.

 

खासदार खैरेंचा माध्यमांवर आरोप
कचरा कोंडीला माध्यमेच जबाबदार असल्याचा आरोप खासदार खैरे यांनी केला. त्यामुळे खदानी पाहणीसाठी कोणीही पत्रकारांनी सोबत येऊ नये, असे त्यांचे म्हणणे होते. माध्यमांनी चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्याने नागरिक कचरा टाकू देत नाहीत, असा शोध त्यांनी लावला.

 

नगरसेवक बमणे म्हणाले, जागाही देतो, विरोधही होणार नाही  
दरम्यान, मी महापालिकेला जागा देतो आणि विरोध होणार नाही याचीही खबरदारी घेतो, असा प्रस्ताव भाजप नगरसेवक पूनम बमणे यांनी महापौर घोडेले यांच्यासमोर ठेवला. परंतु आज फक्त खदानीच बघायच्या असल्याने बमणे यांच्या प्रस्तावावर तूर्तास विचार होऊ शकलेला नाही.


मनपा बरखास्त करा
कचरा प्रश्नामुळे शहरात अराजक निर्माण झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकावर आरोप करत आहेत. मात्र, कचऱ्याच्या प्रश्नाकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमावा, अशी मागणी गब्बर अॅक्शन कमिटीने केली आहे. या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्तालयातील नगरपालिका प्रशासनाच्या संचालक रिता मैत्रेवार यांना निवेदन देण्यात आले. मनपा दहा दिवसांत बरखास्त न केल्यास महापालिकेचे आवार व सभागृहात कचरा फेकण्याचा इशारा कमिटीने दिला आहे. या वेळी कार्याध्यक्ष इम्रान पठाण, हाफीज अली, प्रवीण बुरांडे, शेख मुख्तार, अब्दुल कय्युम, हसन शहा, वाजेद कुरेशी, अंकुश गायके, अजमत पठाण, इसा यासीन, कचरू गोरक्षक, विकास खरात उपस्थित होते.


शेतकऱ्यांना आवाहन
दरम्यान, मनपा फक्त नि फक्त ओलाच कचरा गोळा करत असून शेतकऱ्यांनी तो खत निर्मितीसाठी घेऊन जावा, असे आवाहन मनपाने केले. मांडकीचे पांडुरंग मांडकीकर यांनी ओल्या कचऱ्याची मागणी केली होती. हा कचरा मनपाने आणून द्यावा, अशी त्यांची विनंती होती. खदानी दौऱ्याच्या व्यापात गुरुवारी मांडकीकर यांना ओला कचरा देता आला नाही. शुक्रवारी तो दिला जाईल, असे घोडेले यांनी सांगितले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...