आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या वाघाची अाधी शेळी, नंतर ससा आणि आता कासव झाला अाहे : अजित पवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- हल्लाबोल मोर्चादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्य आणि केंद्र सरकारांवर जोरदार टीका केली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सत्तेत असूनही सरकारला लटका विरोध करणारी शिवसेना खरी शिवसेना राहिलेली नाही. शिवसेनेचा वाघ कधीच पळालाय. त्याची आधी शेळी झाली. शेळीचा ससा झाला आणि आता सशाचे कासव झाले आहे. 


अजित पवार म्हणाले की, भाजप नुसतेच आश्वासनांचे गाजर दाखवत आहे. त्या गाजरालाही आता त्याची लाज वाटत आहे. गाजर म्हणते शिवसेना-भाजपने माझे नाव खराब केले. एकीकडे हे थापाडे, फसवणूक करणारे, फेकू सरकार आहे, तर त्यांचा जोडीदार शिवसेनेला सत्तेत आहोत की विरोधात हे समजत नाही. शिवसेनेचा वाघ कधीच पळालाय. त्याची आता शेळी झालीय. शेळीचा ससा झाला आणि आता सशाचा कासव झाला. सरकारवर विद्यार्थी, एसटी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, शेतकरी व जनता नाराज असून सरकार उलथून टाकण्याची वेळ आली अाहे. 


महाराष्ट्राला पवारांशिवाय पर्याय नाही : सुनील तटकरे 
देश बदलतोय की नाही सांगता येणार नाही. पण महाराष्ट्र नक्कीच बदलतोय. भाजप-शिवसेनेला निवडून दिल्याबद्दल लोकांना आता पश्चात्ताप वाटतोय. हल्लाबोल यात्रेनिमित्त २७ ठिकाणी घेतलेल्या सभांतून हे दिसून आले. राज्यातील शिवसेना-भाजप सरकारवर लोक प्रचंड नाराज आहेत. सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी शरद पवारांशिवाय पर्याय नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. यामुळे राज्यात परत राष्ट्रवादीचे सरकार येणार आहे. 


विचार थांबवू शकत नाही : जितेंद्र आव्हाड 
ऐन सभा सुरू होत असतानाच या भागातील इंटरनेट बंद करण्यात आले. हे काम शासन किंवा प्रशासन करू शकते. जॅमर लावल्याशिवाय हे शक्य नाही. पण इंटरनेट बंद करा किंवा काहीही करा, आमचे विचार पोहोचवण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. 


खोटे बोलण्याचा विक्रम : राजेश टोपे 
भाजप सरकार लोकांना सातत्याने धोका देत आहे. लोकांची फसवणूक करतेय. पंतप्रधान तर एवढ्या थापा मारताहेत की खोटे बोलण्याची जागतिक स्पर्धा घेतली तर गिनीज रेकॉर्डमध्ये या सरकारचे नाव येईल. हे जातीयवादी, धर्मवादी, दोन समाजात भांडणे लावणारे, संवेदनाहीन सरकार आहे. ते उलथून टाका. 


कोठे नेऊन ठेवलाय शेतकरी माझा : चिकटगावकर 
फडणवीस सरकारने सत्तेवर येताना कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा प्रश्न विचारला होता. आज राज्याची स्थिती पाहता कोठे नेऊन ठेवलाय शेतकरी माझा, सामान्य माणूस माझा, असा प्रश्न पडतोय. आज शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्याचे काम सरकार नाही किंवा पंढरपूरचा पांडुरंग करत नाही. शेतकऱ्यांसाठी एकच दरवाजा उघडा आहे, तो म्हणजे शरद पवारांचा, अन्य सर्व दरवाजे बंद झाले आहेत. 


लोकांना चूक लक्षात आली : फौजिया खान 
भाजप सरकारमध्ये जनता परेशान आहे. त्यांना निवडून आणल्याची चूक लोकांच्या लक्षात येत आहे. समाजातील एकही घटक आज सुखी नाही. महिला, युवक, कामगार, बँक कर्मचारी, मुस्लिम समाज या सरकारवर नाराज आहे. 


प्रफुल्ल पटेल...
केंद्र सरकारने जनधन खात्यात १५ लाख कोटी रुपये टाकण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनापोटी लोकांनी बँकेसमोर रांगा लावून खाती उघडली. पण त्या खात्याचे आता ठणठण खाते झाले आहे. सरकारच्या पेट्रोलियम कंपन्या वर्षाला ५ लाख कोटींचा नफा कमवतात. पण पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. या सरकारच्या काळात ४० रुपयांवरून ८० रुपयांवर पेट्रोल गेले. सरकार रोजगार द्यायचे सोडून स्किल डेव्हलपमेंटच्या गप्पा मारतेय. पण आता महाराष्ट्रात बदल होत आहे. राज्यात परत राष्ट्रवादीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही. 

 

सुप्रिया सुळे...
यंदाचा अर्थसंकल्प इतिहासातील सर्वात वाईट अर्थसंकल्प होता. यात कोणाच्याही वाट्याला काहीही आलेले नाही. सरकार ट्रिपल तलाकच्या मागे लागले आहे. आमचा ट्रिपल तलाक बंदीला विरोध नाही, तो बंद झालाच पाहिजे. पण आपल्या पतीला जेलमध्ये पाठवणे कोणत्या महिलेला आवडेल? यामुळे महिला, मुस्लिम धर्मगुरूंना विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. जिजाऊ जयंतीला ३ वर्षांपूर्वी मुख्यमंत्री आणि गडकरी दोन हेलिकॉप्टरने सिंदखेडराजा येथे आले होते. त्यांनी सिंदखेडराजाच्या विकासासाठी ३५० कोटी रुपयांची घोषणा केली होती. 


धनंजय मुंडे...
सभेसाठी आयुक्त कार्यालयाने परवानगी नाकारली. त्याच आयुक्त कार्यालयात ही सभा घ्यायची राष्ट्रवादीची हिंमत आहे. या सभेचे थेट प्रक्षेपण होऊ नये म्हणून इंटरनेट बंद केले. पण आम आदमीचा आवाज तुम्ही बंद करू शकणार नाही. तो मतपेटीचे बटण दाबून आवाज दाखवून देईल. काळा पैसा, महिलांवरील अत्याचार, महागाई, बेरोजगारी, मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण देण्याची पोकळ आश्वासने देत सरकारने सर्वसामान्यांची फसवणू्क केली. त्यामुळेच हे फसवणीस सरकार आहे. 


मोर्चा आणि सभेवर होती ड्रोनची नजर 
मोर्चाच्या मार्गावर चौका-चौकात वाहतूक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सभा सुरू होण्यापूर्वी सकाळी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी बंदोबस्ताचा आढावा घेऊन सभेच्या ठिकाणी पाहणी केली. क्रांती चौक येथे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक पोलिस आयुक्त नागनाथ कोडे, रामचंद्र गायकवाड, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, फहीम हश्मी, शेषराव उदार, उपनिरीक्षक गोरख चव्हाण यांच्याकडे जवाबदारी होती तर दिल्ली गेट सभेच्या ठिकाणची जबाबदारी उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात, गोवर्धन कोळेकर, पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे, श्रीपाद परोपकारी , हेमंत कदम, राजश्री आढे यांच्याकडे होती. संपूर्ण मोर्चा आणि सभेवर पोलिसांच्या ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात आली होती. पोलिस उपनिरीक्षक हेमंत तोडकर आणि चार कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी देण्यात आली होती. 

 

शेतकरी आत्महत्येचा देखावा 
हल्लाबोल माेर्चाच्या मध्यभागी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता, तो शेतकरी आत्महत्येचा देखावा. यात थर्माकोलचे झाड आणि गळफास घेतलेला शेतकरी याची प्रतिकृती हुबेहूब साकारली होती. त्याभोवती देवगिरी महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी शोकसभा घेत होते. विभागप्रमुख अनिलकुमार साळवे यांच्या संकल्पनेतून परमेश्वर कोकाटे, अभिजित काळे, स्वप्निल साेळंके, हृषीकेश देशमुख, ऊर्मिला सत्कार, मंगेश तुसे, राहुल कांबळे यांनी हा देखावा रंगवला. प्रखर उन्हातही हे विद्यार्थी तब्बल ६ तास यात सहभागी झाले होते. 


विद्यार्थी, कर्मचारी सहभागी
माेर्चात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. संस्थेचे अध्यक्ष आमदार सतीश चव्हाण यांच्या नावाचे टी-शर्ट परिधान केलेले विद्यार्थी, कार्यकर्ते जागोजागी दिसत होते. राजेश टोपे यांच्या मत्स्योदरी महाविद्यालयातील विद्यार्थी गणवेशात होते. 


पाण्यासाठी भटकंती 
उन्हाचा पारा ३२ अंशांवर पोहोचल्यामुळे अंगाची लाहीलाही होत होती. क्रांती चौकात सर्वजण आले; पण नेत्यांना यायला उशीर होता. त्यामुळे कार्यकर्त्यांची पावले पाण्याच्या शोधात निघाली. यामुळे सभास्थानापर्यंतच्या हॉटेल, रसवंतिगृहांत गर्दी झाली होती. 


महिलांचा अपूर्व उत्साह
उन्हामुळे कार्यकर्ते हैराण झाले होते. सकाळी ११ वाजता निघणारा मोर्चा तब्बल अडीच तास उशिरा म्हणजे दुपारी दीड वाजता निघाला. तरीही महिला कार्यकर्त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. महिला कार्यकर्त्या तळपत्या उन्हात नृत्य करत होत्या. 


राष्ट्रवादीची दिल्लीस्वारी 
क्रांती चौकात जळगाव जिल्ह्यातील मडगाव येथील माउली भजनी बँड पार्टीचे श्रीराम महाराज यांचे गायन लक्षवेधी ठरले. लाेकसभेची करू तयारी, चला कामाला लागा चला, राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू, दिल्लीमधी जाऊ चला, या त्यांच्या गीतांना लोकांची पसंती मिळाली. 


तुळजापूर मंदिरातून अाले संबळकरी 
हल्लाबोल मोर्चात सहभागी होण्यासाठी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील १८ संबळकरी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. मोर्चात सर्वाधिक लक्ष वेधले ते या संबळकरांनी. 

बातम्या आणखी आहेत...