आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे बीड जि.प चे 6 सदस्य अपात्रच, पंकजा मुंडेंचा आदेश खंडपीठाने ठरवला रद्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बीड जिल्हा परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत पक्षाचा व्हीप डावलून मतदान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना अपात्र ठरवणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशास ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्थगिती दिली होती. ग्रामविकासमंत्र्यांचा हा निर्णय  उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी रद्द ठरवला.

 

त्यामुळे राष्ट्रवादीचे ५ सदस्य व आघाडीतील एका सदस्य महिलेस आता आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानात सहभागी हाेता येणार नाही. दरम्यान, हे प्रकरण पुन्हा मंत्र्यांकडेच वर्ग करण्यात आले असून १५ मे रोजी यावर सुनावणी घ्यावी, असे निर्देशही न्या. पी. आर. बोरा यांनी दिले. या सदस्यांना बैठकीला उपस्थित राहता येईल, परंतु मतदानात सहभागी होता येणार नाही.


जिल्हा परिषदेमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते बजरंग सोनवणे,  मंगला प्रकाश सोळंके आणि अजय मुंडे यांनी खंडपीठात यासंबंधी याचिका दाखल केली होती. राष्ट्रवादीचे शिवाजी पवार, प्रकाश कवठेकर, अश्विनी जरांगे, संगीता महारनोर, मंगला डोईफोडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच सदस्य आणि अश्विनी निंबाळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये सहभाग होता. त्यांच्या गटाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यताही दिलेली होती.  


जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीकरिता आघाडीचे गटनेता बजरंग सोनवणे यांनी २५ मार्च २०१७ ला व्हीप जारी केला होता. मात्र व्हीप डावलून ५ जणांनी भाजपला मतदान केले, तर मंगला डोईफोडे गैरहजर राहिल्या. व्हीप डावलल्याने या सदस्यांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज गटनेते सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला तेव्हा जिल्हाधिकारी देवेंद्रकुमार यांनी १६ ऑक्टोबर २०१७ रोजी या सहा सदस्यांना अपात्र ठरवले. या निर्णयाविरुद्ध या ६ सदस्यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे अपील केले.

 

यावर सुनावणी न घेता अपिलाच्या निकालापर्यंत अपात्रतेला मंत्र्यांनी स्थगिती दिली. याप्रकरणी याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. एन. एल. जाधव, अॅड. कानेटकर, प्रतिवादींतर्फे अॅड. व्ही. डी. साळुंके, अॅड. गिरीश थिगळे, शासनातर्फे अॅड. अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहिले.
  

बातम्या आणखी आहेत...