आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाैरंगाबादेत ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ ग्रंथलेखनाची सुरुवात, पोलिस अॅक्शनपूर्वी सरदार पटेल येऊन भेटले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर व औरंगाबाद शहराचे विशेष नाते आहे. हैदराबाद संस्थान भारतात विलीन करून घेण्याची कारवाई करण्यापूर्वी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल औरंगाबादमध्ये येऊन बाबासाहेबांना भेटले होते. नेहरूंच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा महत्त्वाचा निर्णय बाबासाहेबांनी येथेच घेतला व राजीनाम्याचा मसुदाही औरंगाबादमध्येच लिहिला. फाळणीचे वारे वाहत असताना डॉ. आंबेडकरांनी ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा पाकिस्तान निर्मितीविषयी अतिशय मूलग्राही चिकित्सा करणारा ग्रंथ लिहिला. सर्वत्र खळबळ उडवून देणाऱ्या या ऐतिहासिक ग्रंथाचे चिंतन बाबासाहेबांनी औरंगाबादेतच केले. इतकेच नव्हे तर त्याची पहिली दहा पानेही येथेच लिहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र विचारांचे अभ्यासक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या अभ्यासातून ही माहिती पुढे आली.

 

१९४२ मध्ये डाॅ. बाबासाहेब अांबेडकर औरंगाबादेत मुक्कामी होते. त्या वेळी त्यांनी येथेच ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ या त्यांच्या अतिशय गाजलेल्या ग्रंथाचे विचारमंथन सुरू केले. एवढेच नव्हे तर त्यातील पहिली ८-१० पाने औरंगाबादेतच लिहिली. पुढे भेटणाऱ्यांची प्रचंड गर्दी होऊ लागल्याने ते अहमदनगर येथील पाटील यांच्याकडे मुक्कामी गेले आणि तेथे २७ दिवसांत ग्रंथ पूर्ण केला. या ग्रंथाने जगभरात खळबळ उडाली. कारण त्यात भारताची फाळणी करून पाकिस्तान नावाचे नवे राष्ट्र निर्माण करण्याविषयी अतिशय चिंतनशील मते बाबासाहेबांनी मांडली होती.   


१९४८ मध्ये घटनेचा मसुदा तयार करण्याचे काम जोरात सुरू होते. त्या वेळी बाबासाहेब काही काळ विश्रांतीसाठी औरंगाबादला होते. तेव्हा जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यापूर्वी म्हणजे महात्मा गांधी यांची हत्या होण्यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्या भेटीत हैदराबाद संस्थान खालसा करण्यासाठी पोलिस अॅक्शनविषयी त्यांच्यात खोलवर चर्चा झाली असावी. कारण नंतरच्या सप्टेंबरमध्येच पाेलिस अॅक्शन झाली. 


मराठवाडा प्रांत हैदराबादमधून महाराष्ट्रात विलीन करण्याच्या व्यूहरचनेवर बाबासाहेबांच्या सूचना पटेलांनी जाणून घेतल्या असाव्यात, असा अंदाज आहे. संस्थान विलीनीकरणाची कारवाई लष्करी असली तरी तिला पोलिस अॅक्शन असेच नाव द्यावे. म्हणजे निझाम गाफील राहील, असे बाबासाहेबांनीच म्हटले होते. ते पुढे मान्यही झाले.   


१९५१ मध्ये मदनमोहन मालवीयही येथे बनारस हिंदू विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण घेऊन आले होते. ते बाबासाहेबांनी स्वीकारले होते. राजकीय भूमिकांबद्दल एकमेकांबद्दल कठोर हल्ले करताना त्याचा समाजावर विपरीत परिणाम होणार नाही,  उलट माणुसकीच जपली जाईल, असा प्रयत्न त्या काळातील नेते करत होते. तर त्या वेळी मालवीय यांच्याकडेच नेहरू मंत्रिमंडळात मला काम करू देत नाहीत, अशी तक्रार बाबासाहेबांनी केली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे २७ सप्टेंबर १९५१ रोजी बाबासाहेबांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. त्याचा मसुदा त्यांनी औरंगाबादेतच तयार केला. त्या वेळचे  त्यांचे लेखनिक शेखलाल पटेल यांनी तो ड्राफ्ट केला होता.   


मराठवाडा, विशेषत: औरंगाबाद हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत आवडते शहर होते. कारण अजिंठा आणि वेरूळ ही दोन्ही ठिकाणे बौद्ध संस्कृतीचा विकास सांगणारी ठिकाणे आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. अजिंठ्यात त्या काळी एक हजार िभक्खूंचा निवास होता, हेही त्यांना माहिती होते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मराठवाडा हा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रदेश आहे. येथे दलितांच्या शिक्षणाची अवस्था प्रचंड बिकट आहेच, शिवाय इतर समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची फार मोठी संधी नाही, हे त्यांनी त्या वेळीच जाणले होते. त्यामुळे भाऊसाहेब मोरे यांनी १९३८ मध्ये मक्रणपूर (ता. कन्नड) येथे परिषदेसाठी  निमंत्रण दिले. तेव्हा त्यांनी ते स्वीकारले आणि त्यानंतरच्या काळात ते वारंवार येथे येत गेले. मुक्कामी राहिले. १९४४ मध्ये ते औरंगाबादेत ते सलग तीन आठवडे मुक्कामी होते. या काळात त्यांनी त्यांचा जो स्वतंत्र मजूर पक्ष होता, त्याची ध्येयधोरणे राबवण्याचे काम येथूनच केले.   


याच काळात काँग्रेसचे त्या काळातील दिग्गज नेते म्हणून परिचित असलेेले गोविंद वल्लभ पंत औरंगाबादेत डॉ. बाबासाहेबांना भेटण्यासाठी आले होते. 


ब्रिटिश सरकार त्या वेळी शिक्षण नीती आखत होते. त्यातील धोरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि ब्रिटिशांकडून शिक्षण नीतीतून काय करून घेता येईल, याविषयी त्यांनी चर्चा केल्याची नोंद आहे. याशिवाय सी. राजगोपालाचारी डॉ. बाबासाहेबांना छावणीतील निझाम बंगला क्रमांक ९ मध्ये भेटले. त्यांच्यात नेमकी कशावर चर्चा झाली, याची माहिती नाही.   


१९५० नंतर बाबासाहेब मिलिंद महाविद्यालयाच्या उभारणीसाठी येथे ठाण मांडून होते. त्या काळात कर्पुरी ठाकूर हा त्या काळचा तरुण वक्ता त्यांना भेटल्याची नोंद आहे. याशिवाय डाव्या चळवळीतील सहस्रबुद्धे नावाचे नेतेही बाबासाहेबांना भेटले.    


१९५४ मध्ये औरंगाबादेत असतानाच बाबासाहेबांनी नागपूर येथील धर्मांतर सोहळ्याच्या नियोजनाविषयी तीन अत्यंत महत्त्वाची पत्रे नागपूरचे वामनराव गोडबोले यांना लिहिली. सोहळ्याविषयीच्या सर्व अपेक्षा, आराखडा, नियोजन असा तपशील त्यांनी त्या पत्रात नमूद केला. १९५४ च्या अखेरीस औरंगाबादेतच त्यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाच्या बरखास्तीची खूणगाठ पक्की केली होती. त्या वेळी त्यांच्यासोबत म. भि. चिटणीस, मधू दंडवते, अनंत काणेकर, आचार्य दोंदे, दादासाहेब गायकवाड, पतितपावन दास अशी अनेक मंडळी येते होती.


 आपला पक्ष व्यापक असला पाहिजे, जातिनिरपेक्ष उपेक्षितांना, वंचितांना त्यांचे हक्क मिळवून देणारा पक्ष असला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती.

बातम्या आणखी आहेत...