आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील भारतीय शास्त्रज्ञाने तयार केला कागदापासून मायक्रोस्कोप, संशोधनासाठी औरंगाबादच्या 2 प्राध्यापकांना १६ लाखांचे अनुदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अमेरिकेतील भारतीय वंशाच्या एका तरुण संशोधक तथा सहायक प्राध्यापकाने जगातील पहिले कागदाचे सूक्ष्मदर्शक (मायक्रोस्कोप) तयार केले अाहे. ते संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी किंवा अगदी मनपाचा कर्मचारीही खिशात घेऊन फिरू शकतो. या सूक्ष्मदर्शकाचा वापर वाढावा व त्यावर अधिक संशोधन व्हावे, यासाठी औरंगाबादच्या विवेकानंद महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांना सोळा लाखांचे संशोधन अनुदान दिले आहे. 


आपण शाळेपासून एक लोखंडी मजबूत असे सूक्ष्मदर्शक पाहत आलो आहोत. गेल्या शंभर वर्षांपासून हे सूक्ष्मदर्शक परंपरेने जगभरात वापरले जात आहे. ते महाग असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या प्रयोगासाठीच वापरले जाते. शिवाय त्याच्या अवजड संरचनेमुळे ते प्रयोगशाळेबाहेर नेले जात नाही. ही अडचण अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील भौतिकशास्त्रज्ञ डॉ. मनू प्रकाश यांच्या लक्षात आली. तसेच विकसनशील देशांमधील सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या आजाराच्या निदानाला लागणारा वेळ का लागतो हे त्यांना समजले. त्यामुळे त्यांनी ए-फोर आकाराच्या कागदाच्या शीटवर जगातील पहिला अतिशय स्वस्त असा सूक्ष्मदर्शक (मायक्रोस्कोप) तयार केला. लहान मुलांच्या कागदी गेमप्रमाणे कागदाचे कपटे जोडून त्याची जोडणी केली की तयार होतो मायक्रोस्कोप. 


जगातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या खिशात हवा मायक्रोस्कोप 
जगभरातील विद्यार्थ्यांसह सामान्य माणसाच्या खिशात मायक्रोस्कोप दिला तर लहान मुलांना सूक्ष्मजीवांपासून होणारे आजार शोधण्यास मदत होईल. शिवाय संशोधक विद्यार्थ्यासह सामान्य नागरिकांना सूक्ष्मजीवांचे विश्व न्याहाळता येईल असा त्यांचा उद्देश होता. २०१२ मध्ये अमेरिकेतील प्लस वन नावाच्या जागतिक दर्जाच्या जर्नलमध्ये त्यांचे संशोधन प्रसिद्ध झाले. 

 

विद्यार्थी करताहेत वापर 
प्रा. अनिरुद्ध जाधव यांनी फोल्डस्कोपची माहिती दिली. ते म्हणाले, पिण्याच्या पाण्यात जे आदिजीव व जिवाणू असतात त्याला विशिष्ट आकार व संरचना असते. त्यामुळे ते मायक्रोस्कोप खाली बघितल्यावरच सूक्ष्मजीव कोणता हे समजते. आता हा कागदी मायक्रोस्कोप खिशातून काढून जागेवरच तो सूक्ष्मजीव कोणता हे पाहता येईल. शिवाय विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकही हा मायक्रोस्कोप खिशात बाळगून पाणी, वनस्पती, कीटकांचा अभ्यास करू शकतील. 


मोबाइलला जोडता येतो 
हा कागदी मायक्रोस्कोप अवघ्या १२० रुपयांत मिळतो. इंटरनेटवरूनही तो मागवता येतो. यात कागदी मायक्रोस्कोपसोबत स्लाइड आणि पांढराशुभ्र असा छोटा लाइट दिलेला आहे. छोट्याशा पाऊचमध्ये ही सर्व सामग्री मिळते. डॉ. अधापुरे यांनी सांगितले की, हा मायक्रोस्कोप मोबाइलला जोडता येतो. त्यामुळे सूक्ष्मजीव मोबाइलच्या स्क्रीनवर आणखी स्पष्ट आणि मोठा दिसतो. 


संशोधनासह करणार प्रचार 
डॉ. अधापुरे यांनी सांगितले की, आम्हाला मिळालेले संशोधन अनुदान एक वर्षासाठी अाहे. मी व प्रा. जाधव वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करणार आहोत. त्यासाठी आम्ही चार संशोधक विद्यार्थी नेमलेले आहेत. प्रयोगशाळेतील संशोधनासोबतच आम्ही फोल्डस्कोपचा प्रचार व प्रसारही करत आहोत. 

बातम्या आणखी आहेत...