आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अावारामध्ये शिवसेनेने फेकला कचरा; राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कचरा मुक्तीसाठी ८९ कोटी दिले. पण त्याचा तुम्ही उपयोग करत नाही. आता जास्त दिरंगाई केली तर मनपा बरखास्त करेन, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (१८ जुलै) दुपारी तीन वाजेच्या सुमारास दिला. तो गांभीर्याने घेऊन मनपात सत्तेत असलेली शिवसेना गांभीर्याने आत्मचिंतन करेल. काही आराखडा तयार होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात सेनेने जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयात ट्रक, ट्रॅक्टरमधील कचरा टाकला. त्याची दुर्गंधी इतकी भयंकर पसरली होती की, दानवे यांनी दुसरा टेम्पो रिकामा करू नका, असे सांगितले. पण इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या फुटेजसाठी कचरा ओतण्यात आला. 


दरम्यान, शिवसेनेचे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे. १५ लाख औरंगाबादकरांना कचऱ्यातून मुक्त करण्यापेक्षा समांतरच्या वाटाघाटीतच शिवसेनेला स्वारस्य आहे, असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी केला. तर सेनेचे हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी केली. दुसरीकडे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनीही या आंदोलनावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. राष्ट्रध्वजाचा अवमान केला, असे सांगत गुन्हे दाखल करण्याचे आदेशही दिले. त्याची तत्काळ अंमलबजावणीही झाली. तर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर म्हणाले की, कचरा उचलण्याचे काम मनपाचे आहे. संनियंत्रण समितीचे नाही. 


कचरा कोंडीविषयी बुधवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी बोलावलेल्या बैठकीस शिवसेना पदाधिकारी यांनी दांडी मारली. ते मुंबईत समांतर जलवाहिनी योजनेचे ठेकेदार औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटले. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मनपा बरखास्तीचा इशारा दिला. 


रात्रीच ठरले नियोजन
याचे वृत्त कानावर पडताच मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्याला सेना स्टाइलने प्रत्युत्तर द्या, असे आदेश वरिष्ठांनी दिले. त्यानुसार रात्री उशिरा बैठक होऊन राज्य सरकारचे प्रतिनिधी असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कचरा टाकण्याचे ठरले. मात्र, सकाळी १० वाजता पोहोचा, असे निरोप शिवसैनिकांना देण्यात आले होते. कशासाठी यायचे, याची माहिती अतिशय मोजक्या पदाधिकाऱ्यांना होती. त्यामुळे शिवसैनिक जमा झाले तरीही पोलिसांना याची खबर लागली नव्हती. 


एक ट्रक केला रिकामा 
पावणे अकरा वाजता जिल्हाप्रमुख दानवे कचऱ्याचा एक ट्रक, एक टेम्पो आणि एक ट्रॅक्टर घेऊन दाखल झाले. 'मनपा बरखास्तीची धमकी देणाऱ्या सरकारचा निषेध असो', कचरा उठावो' अशा घोषणा देत ट्रक, टेम्पो रिकामा करण्यात आला. 


महापौरांसह पदाधिकारी गायब

संघटनेचा कोणताही कार्यक्रम असला की महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य, स्थायी समितीचे सभापती विकास जैन ही मंडळी मनपाचे कामकाज सोडून जातात. पण ते आंदोलनाकडे फिरकले नाही. ते संघटनेचे आंदोलन होते, अशी मखलाशी त्यांनी केली. 


मुख्यमंत्र्यांकडे मनपा बरखास्तीची मागणी करणार : तनवाणी 
भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी म्हणाले की, रस्ते, कचरा कोंडीसाठी कोट्यवधी रुपये देऊनही प्रगती नसल्याने मनपा बरखास्त करून किमान दोन वर्षे प्रशासक नेमावा, अशी मागणी भाजप मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. या वेळी माजी महापौर भगवान घडमोडे, माजी सभापती दिलीप थोरातही उपस्थित होते. समांतर, भूमिगत गटार योजना रखडल्याने शहराचे नुकसान होत असल्याचेही ते म्हणाले. बरखास्तीची मागणी करण्यापेक्षा भाजपचे नगरसेवक राजीनामे देणार का, असा प्रश्न केला असता, ते म्हणाले की तसे केले तर शिवसेनेला शह देता येणार नाही. ही मागणी नेमकी कधी, कशी करणार या प्रश्नावर त्यांनी आधी लवकरच, मग काही दिवसांनी, मग १५ दिवसांनी सर्वांच्या सह्यांचे पत्र देऊ असे म्हटले. 


येथे भाजपचीही सत्ता : घोडेले 
येथे फक्त शिवसेनेची नव्हे भाजपचीही सत्ता आहे. त्यामुळे भाजपने मनपा बरखास्तीऐवजी प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले. 


दोन तासात उचलला कचरा
एवढे मोठे आंदोलन सुरू असताना त्याची माहिती पोलिसांकडे नव्हती. आंदोलन संपल्यावर दंगा काबू पथकाचे १६ जवान आले होते. पोलिस उशिरा का पोहोचले, याची चौकशी होईल, असे जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले. आंदोलक निघून गेल्यावर दोन तासांनी म्हणजे साडेबाराच्या सुमारास जेसीबीच्या मदतीने कचरा उचलण्यात आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याची फवारणी केली. 


राष्ट्रध्वजाचा अवमान : सुमारे १२५ जणांवर गुन्हा दाखल
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तहसीलदार संतोष अनर्थे यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. कलम १४३ बेकायदेशीर जमावाचा सदस्य असणे, १४९ समान उद्दिष्ट साधण्यासाठी केलेल्या अपराधाबद्दल बेकायदेशीर जमावाचा प्रत्येक सदस्य, २६९ निष्काळजीपणाने दुसऱ्याच्या प्रकृतीस हानी पोहाेचवण्याचा प्रयत्न करणे , २७० , १३५ महाराष्ट्र पोलिस कायदा, कलम ३ महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५, कलम २, १५ पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६, कलम ७ क्रिमिनल लॉ अॅमीटमेंट अॅक्ट, कलम २ राष्ट्र सन्मानाच्या अप्रतिष्ठेस प्रतिबंध अधिनियम १९७१ अशी कलमे लावण्यात आली. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, संतोष जेजूरकर, अनिल पोलकर, गोपाळ कुलकर्णी, विश्वनाथ स्वामी, संतोष खडके, अनिल जैस्वाल, राजेंद्र दानवे, सचिन खैरे, किशोर नागरे, मोहन मेघावाले, बंटी जैस्वाल, विजय वाघचौरे, चंद्रकांत इंगळे, संजय बारवाल व इतर १०० ते १२५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे पुढील तपास करत आहेत. रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. 


कचराकोंडीवर राजकारण 
मुख्यमंत्र्यांच्या मनपा बरखास्तीच्या इशाऱ्याला २० तासांत दिले दुर्गंधीयुक्त प्रत्युत्तर, हे तर कचरा करणारे सैनिक म्हणूनच नागपुरात बैठकीला आले नाहीत: भाजपचा आरोप 


राज्य सरकारला गांभीर्य कळावे म्हणून : दानवे 
भाजपचा महापौर होता तेव्हा नारेगावात मुदतवाढ दिली. परंतु शिवसेनेचा महापौर होताच डेपो बंद झाला. संनियंत्रण समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर भाजपच्या इशाऱ्यावरून काम करतात. महापौरांच्या मर्यादा माहिती असूनही मुख्यमंत्री मनपा बरखास्तीचा इशारा देतात. म्हणून सरकारच्या विरोधात आंदोलन केले. तिरंग्यापासून ५० फुटांवर कचरा टाकला. अवमान केला नाही, असे जिल्हाप्रमुख दानवे यांनी सांगितले. 


केवळ राजकारणासाठी कचरा टाकला : तनवाणी 
शिवसेनेने केवळ राजकारणासाठी कचरा टाकला. तिरंग्याचाही मान ठेवला नाही. सरकार सर्वप्रकारे मदत करत असतानाही सरकारचा निषेध करणे चुकीचे आहे. कचरा प्रश्न भाजप दीड महिन्यात सोडवेल, असे भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी म्हणाले. खासदार चंद्रकांत खैरेंनी मनपातील हस्तक्षेप कमी केला तर कचरा प्रश्न लवकर सुटेल, असेही तनवाणी म्हणाले. 


शिवसैनिकांच्या घरासमोर कचरा टाकणार : पवार 
२७ वर्षांपासून सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेनेच जिल्हाधिकारी कचेरीवर कचरा टाकणे हा प्रकार चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार म्हणाले. आम्ही त्यांना जाब विचारू. लोकांच्या घरासमोर सडत पडलेला कचरा त्यांच्या घरासमोर टाकू, असा इशाराही पवार यांनी दिला. 


दुर्गंधीमुळे अनेकांना ओकाऱ्या 
कचरा पडताच इतकी भयंकर दुर्गंधी पसरली की अनेकांना तेथेच उलट्या झाल्या. निम्मे आंदोलक लगेच बाजूला झाले. बाकीच्यांनी खांद्यावरील भगवा नाकाला बांधला. ते पाहून टेम्पोतील कचरा रिकामा करू नका, असे दानवेंनी सांगितले. परंतु इलेक्ट्राॅनिक माध्यमांचे काही प्रतिनिधी उशिरा पोहोचले. त्यांच्यासाठी टेम्पोतील कचरा ओतण्यात आला. 


दुर्गंधीमुळे लोकांचे काय हाल होताहेत, हे आता तरी कळले ना? 
जिल्हाधिकारी कार्यालयात कचरा टाकून आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावून घोषणाबाजी केली. काही मिनिटांच्या आंदोलनात दुर्गंधीमुळे उबगणाऱ्या सत्ताधारी शिवसैनिकांना लोकांचे रोज काय हाल होत असतील, याची आता तरी जाणीव झालीच असेल. 


त्यांची पातळी कळली : जिल्हाधिकारी 
जिल्हाधिकारी उदय चौधरी पावणेदोनच्या सुमारास कार्यालयात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यातून आंदोलकांची वैचारिक पातळी लक्षात येतेे. जिल्हाधिकारी कार्यालयात कचरा टाकून काय साधले?, असा सवाल करत कचरा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला. 


दुर्गंधीमुक्तीचे रसायन गेले कुठे? 
कचऱ्याचे ढिगारे दुर्गंधीमुक्त करण्यासाठी मनपाने दहा लाखांची रसायन खरेदी केली होती. कचरा कितीही दिवस साचला तर त्यातून दुर्गंधी निघणार नाही, असा दावा केला होता. पण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात टाकलेल्या कचऱ्यातून भयंकर दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे दुर्गंधीमुक्तीचे रसायन गेले कुठे, असा सवाल शिवसेनेचे पदाधिकारीच नंतर करत होते. 


ते काम आम्ही करायचे का? : भापकर 
दानवेंच्या आरोपावर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर म्हणाले की, मनपा कचरा उचलत नाही. हे काम आता सनियंत्रण समितीने करायचे का? माझ्यामुळे प्रश्न सुटत नाही, असे म्हणणे ही निव्वळ बकवास आहे. केवळ तीन दिवसांत शहर स्वच्छ होऊ शकते. मला राजकारणात का ओढता? कचरा टाकण्यास होणारा विरोध पोलिसांच्या मदतीने मोडून काढा, असे मी वारंवार सांगितले आहे. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयात टाकलेल्या कचर्‍याचे फोटो आणि व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...