आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा आयुक्त मुगळीकर यांना बदलीची बक्षिसी, शहर वाऱ्यावर; आवडीच्या पदावर रुजू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कचराकोंडीच्या प्रकरणात मिटमिटा येथील लाठीमार प्रकरणी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना गुरुवारी एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यानंतर मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांच्यावर काय कारवाई होणार याबाबत चर्चा सुरू असतानाच कचऱ्याच्या संकटातून मुक्ती मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मुगळीकरांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी सकाळी येऊन धडकले. त्यांची कचराकोंडीतून मुक्तता झाली. 


मुगळीकर यांनी सायंकाळी मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव म्हणून पदभारही स्वीकारला. पालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार  जिल्हाधिकारी एन. के. राम यांच्याकडे सोपवण्यात आला असून त्यांनी शहरात पाहणी करण्याबरोबरच सायंकाळी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कचरा विल्हेवाटीचे  नियोजन सुरू केले आहे.  शहरात सध्या पोलिस व पालिका आयुक्तही प्रभारीच असल्याने सरकारने औरंगाबाद शहराला वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. मुगळीकर यांची बदली निश्चित होती. मात्र, एप्रिल महिन्यात इतर अधिकाऱ्यांबरोबर हे आदेश येतील, अशी अटकळ होती. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन नगर विकास विभागाने त्यांची तातडीने बदली केली. आयुक्तपदावर पूर्णवेळ अधिकारी नक्की होत नसल्याने नवीन अधिकारी येईपर्यंत जिल्हाधिकारी राम यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. यापूर्वी मुगळीकर जेव्हा प्रशिक्षणासाठी गेले होते तेव्हाही पदभार राम यांच्याकडेच देण्यात आला होता.  कचऱ्याचे गंभीर संकट  लक्षात घेता सरकारकडून कायम आयुक्ताची नियुक्ती अपेक्षित होती. प्रत्यक्षात तसे झाले नाही. केंद्रीय भारत स्वच्छता अभियानाचे उपसचिव निपुण विनायक नवे आयुक्त असतील आणि ते एप्रिलमध्ये कार्यभार स्वीकारतील अशी चर्चा आहे. मात्र, निपुण यांच्या नियुक्तीचे आदेश निघालेले नाहीत. ते औरंगाबादेत येण्यास तयार नाहीत, असेही सांगण्यात येत असल्याने औरंगाबाद शहराकडे गंभीरपणे पाहण्यास सरकार तयारच नसल्याचा सूर व्यक्त होत आहे.


निरोप आला अन् मागे वळली गाडी

मुगळीकर यांना आपली बदली इतक्यात होईल हे अपेक्षित नव्हते. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी सकाळी सावंगी येथील एका जागेची पाहणी केली. त्यानंतर ते महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासोबत वाळूज येथे कचरा विल्हेवाट यंत्र पाहण्यासाठी निघाले होते. मात्र रस्त्यातच त्यांना बदलीचा निरोप आला. त्यांनी वाळूजकडे जाणारी मोटार मागे फिरवली. तेथून बंगल्यावर येऊन त्यांनी महापौर, उपमहापौर विजय औताडे, सभागृहनेते विकास जैन यांच्यासमवेत त्यांनी चर्चा केली आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार देत असल्याचे सांगितले. गेल्या एक महिन्यापासून मुगळीकर मुख्यालयी आले नव्हते. आता पदभार सोपवण्यासाठी तरी ते येतील, अशी अधिकाऱ्यांची अटकळ होती. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयातच त्यांनी पदभार राम यांच्याकडे सोपवला.

 

 

शहरात पोलिस व पालिका आयुक्त दोघेही प्रभारीच

मुगळीकर रुजू झाले तेव्हा धार्मिक स्थळाचे प्रकरण समोर आले. नंतर कचराकोंडी झाली. पदाधिकारी, नगरसेवकांशी वाद झाले की ‘मी बदली करून घेतो’ अशी धमकी ते देत. कचराकोंडीतही त्यांची भूमिका अशीच होती. बुधवारी मुगळीकरांनी नगरविकासच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेऊन बदलीची मागणी केली. त्यानंतर स्थानिक आमदारांशी बोलताना म्हैसकर यांनी ‘तुमचे आयुक्त फारच फ्रस्टेड वाटताहेत’ असे वक्तव्य केले होते. नंतर लगेच बदली करून त्यांची या कांेडीतून सुटका केल्याचे समजते.

 

१८ नंतर ११ महिन्यांचा कालावधी

यापूर्वीचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांचा कार्यकाळ १८ महिन्यांचा राहिला. त्यानंतर गतवर्षी २४ एप्रिलला मुगळीकर यांची येथे बदली झाली. येथे ११ महिने पूर्ण होण्यापूर्वीच मुगळीकरांची बदली झाली. म्हणजे २९ महिन्यांत दोन आयुक्त बदलून गेले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा.... मिटमिटा मारहाण भोवले, पोलिस आयुक्त यशस्वी यादव 30 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर

बातम्या आणखी आहेत...