आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचा कचरा प्रश्न भडकला; मिटमिट्यात दगडफेक, सात वाहने जाळली,100 फोडली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कचराकोंडीच्या २० व्या दिवशी कचरा टाकण्याच्या मुुद्द्यावरून मिटमिटा परिसरात प्रचंड तणाव पसरला. अप्पावाडी भागात कचरा घेऊन निघालेले दोन ट्रक गावकऱ्यांनी जाळले. शिवाय, या वेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक केली. दिवसभर या भागात गावकरी आणि पोलिसांत धुमश्चक्री सुरू होती. शेवटी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. अखेर सायंकाळी कडेकोट पोलिस बंदोबस्तात कचऱ्याचे चार ट्रक अप्पावाडी शिवारात असलेल्या जागेत रिकामे करण्यात आले. 

 

 

> ०२ हजार लोकांचा जमाव मिटमिट्यात प्रचंड आक्रमक

> ०५ तास महामार्ग बंद, अश्रुधुराच्या ३० नळकांड्या फोडल्या

> २६ महिला आणि ९ पुरुषांसह एकूण ३५ जणांना अटक

> ५०० पोलिस तैनात, एसआरपीच्या ३ तुकड्या मार्गावर होत्या सज्ज...

 

दगडफेक करणारे घरात घुसून पकडले 
आपल्या भागात कचरा टाकण्यास विरोध करणाऱ्या नागरिकांनी कचऱ्याचे ट्रक अडवण्यासाठी मार्गावर मोठमोठे दगड टाकले, टायर जाळले. सुमारे दोन तास नागरिक रस्त्यावर होते. परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेल्यामुळे अखेर महिलांवरदेखील लाठीमार करावा लागला. सीआरपीएफ जवानांनी घरात घुसून दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतले. 

 

वाहतुकीची प्रचंड कोंडी 
नागरिक रस्त्यावर उतरून दगडफेक करू लागल्याने मिटमिटा मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहने थंाबली. दुसरीकडे नागरिक पोलिसांवर तर काही पोलिस नागरिकांवर दगड फेकताना दिसत होते. काही नागरिक लपून पोलिसांवर दगडफेक करत होते. 

 

मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेतील परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा होईपर्यंत तिसगाव, सावंगी, आडगाव, गांधेली येथील खदानींमध्ये कचरा टाकावा, अशी सूचना केली आहे. या चारही गावांजवळ सुमारे ४० खदानी असून त्यातील दोन खदानींचा वापर होऊ शकतो. मात्र, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी एन. के. राम, मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांच्यासोबत फक्त आढावा बैठक झाली. उद्याची व्यूहरचना ठरली नसल्याचे ते म्हणाले.

 

नवी दिल्ली: कचऱ्याचा अणुबॉम्ब : काेर्ट
घनकचरा व्यवस्थापनाकडे डोळेझाक केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने बुधवारी सर्वच राज्यांना फटकारले. तुम्ही कचऱ्याचा अणुबॉम्ब फुटण्याची वाट पाहत आहात का,  अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने सुनावले. सुनावणीदरम्यान दिल्ली वगळता एकाही राज्याचा वकील कोर्टात आला नाही. 

 

मुंबई: खदान भागात कचरा टाका, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
औरंगाबाद येथील खदान परिसरात तात्पुरता कचरा टाकण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून पोलिसांनाही संयमाने प्रकरण हाताळण्यासाठी सांगितले असल्याची माहिती शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. बुधवारी रात्री आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद कचरा प्रश्नी शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. बैठकीला शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते उपस्थित होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... औरंगाबादेतील जाळपोळ. आणि दगडफेकीचे फोटो...

 

हेही वाचा,

- अख्खे मिटमिटा गाव उतरले रस्त्यावर; 3 तास चालली जाळपोळ, दगडफेक

- इकडे आयुक्त दावे करत होते अन् तिकडे कचरा गाड्यांना आग लावली जात होती

बातम्या आणखी आहेत...