आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्याभरापासून आयुक्त महापालिकेकडे फिरकेना, शासकीय बंगल्यात बसून कारभार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- 16 फेब्रुवारीपासून महापालिकेची कचरा कोंडी झाली अन तेव्हापासून सर्वसाधारण सभेचा अपवाद वगळता आयुक्त दीपक मुगळीकर मुख्यालयाकडे फिरकलेच नाहीत. ‘जलश्री’ या शासकीय बंगल्यात बसून ते कारभार चालवतात. अर्थात तेथे सामान्यांना प्रवेश नाही. त्यामुळे ज्यांच्या काही तक्रारी आहेत, अशा अभ्यागतांनी जायचे कोठे, हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर देण्यासाठीही ते उपलब्ध होत नाहीत. कचरा कोंडी सुरू होण्याच्या चार दिवस आधीपासून ते मुख्यालयात आलेले नाहीत.

 

मुख्यालयातील कार्यालयात बसले तर भेटणाऱ्यांची संख्या जास्त होते. त्यामुळे फायलींचा निपटारा करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे फायलींचा निपटारा करण्यासाठी आयुक्त तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी कधी कधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राचा सहारा घेतात. तर आयुक्त कधीकधी शासकीय बंगल्यावरच अधिकाऱ्यांना बोलावून फायली तपासतात. असे असले तरी हे अधिकारी सायंकाळी 3 ते 5 या वेळात कार्यालयात उपस्थित असणे अपेक्षित आहे. कारण शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची ही वेळ अभ्यागतांसाठी राखीव असते. अभ्यागतांना याच वेळेत अधिकाऱ्यांना भेटीसाठी येणे अपेक्षित आहे.

 

मुगळीकर पूर्वी या वेळेत आठवड्यातून तीन दिवस तरी अभ्यागतांसाठी उपलब्ध असत. कधी कधी तर सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत कार्यालयात बसून कामकाज करत. मात्र कचरा कोंडीत आयुक्तांचीही कोंडी झाली अन त्यांनी कार्यालयाकडे तोंडच फिरवले. मंत्र्यांचे दौरे, बैठका यातच ते व्यस्त झाले. जागांचा शोध घेण्यासाठी ते अधिकारी, पदाधिकाऱ्यांबरोबर फिरले. त्यात यश आले नाही. त्यातच जबरदस्तीने कचरा टाकण्याचा प्रयत्न केला म्हणून खासदार चंद्रकांत खैरे व महापौर नंदकुमार घोडेले यांनी त्यांना धारेवर धरल्याने ते काहीसे नाराज झाले. कचरा कोंडीवर चर्चा करण्यासाठी गत सोमवारी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यासाठी आयुक्त मुख्यालयात आले होते. परंतु सभा संपल्यानंतर ते  लगेच बाहेर पडले. 

 

त्यानंतर आजतागायत ते मुख्यालयात आले नाहीत. परिणामी अभ्यागतांना आयुक्त गेल्या महिन्याभरात भेटलेले नाहीत. ज्यांना अधिकाऱ्यांच्या विरोधात आयुक्तांकडे तक्रार करायची आहे, अशांनी जायचे कोठे? हा प्रश्न कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...