आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटकोपर स्फोट: आरोपीला १६ वर्षांनी औरंगाबादेत अटक; गुजरात ATSची मुंबई गुन्हे शाखेसह कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- घाटकोपर येथे डिसेंबर २००२ मध्ये बेस्ट बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयित फरार आरोपी याह्या अब्दुल रहेमान शेख (४३, कैसर काॅलनी, मिनार मशीद जिन्सी, औरंगाबाद) याच्या मुसक्या बांधण्यात यश आले आहे. त्याला मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास औरंगाबादच्या सिग्मा हॉस्पिटल परिसरातून अटक करण्यात आली. 


गुजरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. तो गेल्या १६ वर्षांपासून फरार होता. विशेष म्हणजे १९ फेब्रुवारी २००६ रोजी अहमदाबादच्या रेल्वे स्टेशनवर झालेल्या बॉम्बस्फोटातही शेख याह्याचा समावेश असल्याचे तपासात समोर आले होते. गेल्या १६ वर्षांपासून तो सौदी अरेबियातील रियाधमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. बुधवारी सत्र न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला मुंबई येथे नेण्यात आले आहे. गेल्या १६ वर्षांपासून देशातील एटीएस आणि मुंबई गुन्हे शाखा याह्याचा शोध घेत होते. मात्र तो परदेशात असल्यामुळे सापडत नव्हता. या कारवाईची कल्पना याह्याच्या ७५ वर्षीय वडिलांनाही देण्यात आली होती. शहर पोलिस दलातील एटीसी पथकाचे उपनिरीक्षक योगेश धोंडे या पथकात सहभाग होता. जवाहरनगर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. 


आरोपीला ट्रान्झिट कोठडी
याह्या शेखला अटकेनंतर न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी सांगितले की, राज्यात मराठा आंदोलन सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र आरोपीला अटक करणे गरजेचे होते. तसेच अटक करुन २४ तासात न्यायालयात हजर करण्यासाठी बाधा येण्याची शक्यता होती. त्यामुळे अटकेनंतर कायदेशीर पूर्ततेसाठी आरोपीला औरंगाबाद जिल्हा न्यायालयात हजर करून ट्रान्झिट पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के.के.कुरुंदळे यांनी ती मान्य केली. गुरुवारी ९ ऑगस्टला आरोपीला संबंधित न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले.


पत्नीच्या उपचारासाठी भारतात, हॉस्पिटल परिसरातच अटक 
1 याह्या मंगळवारी त्याच्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी औरंगाबादला येणार असल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळाली. त्यानुसार मुंबई गुन्हे शाखा, शहर पोलिस दलातील एटीसी पथकाने सापळा रचला. 
2 मंगळवारी दुपारी १ वाजता याह्या पत्नीला युनायटेड सिग्मा हाॅस्पिटलमध्ये घेऊन आला होता. किरकोळ उपचारानंतर त्याच्या पत्नीने मेडिकलमधून औषधी खरेदी केली. 
3 एटीएसने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. औषधांचे प्रिस्क्रिप्शनही जप्त केले. मंगळवारी दुपारी ३ वाजता शेख याह्याला ताब्यात घेऊन चौकशीनंतर न्यायालयात हजर करण्यात आले. 
4 याह्या शेखचा २००२ मध्ये औरंगाबादेत एक कारखाना होता. स्फोटानंतर त्याच्या कारखान्यावरील धाडीत इंडियन मुजाहिदीन व जैश-ए-मोहंमद या अतिरेकी संस्थांचे व्हिडिओ व साहित्य सापडले होते. 


स्लीपर सेल म्हणून काम 
उच्चशिक्षित तरुणांवर संशय येत नाही म्हणून याह्या शेखला स्लीपर सेलमध्ये घेतले होते. स्फोटासाठी जागा हेरून रेकी करायची, घटनेच्या दिवशी बॉम्ब ठेवून द्यायचे काम या सेलकडे होते. काम झाल्यानंतर स्लीपर सेलमधील तरुणांना परदेशात स्थायिक करून दिले जायचे. 


२ स्फोटांत सहभाग...
घाटकोपरमध्ये २००२ मध्ये झालेल्या बाॅम्बस्फोटात २ ठार व ५० जखमी झाले होते. २००६ मध्ये अहमदाबादेत रेल्वे बाॅम्बस्फोटात शेकडो जखमी झाले होते. यातील प्रमुख फरार आरोपीला याह्याने बाॅॅम्ब तयार करण्यासाठी मदत केल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. ़


खटल्यातील सर्व आरोपी सुटले! 
घाटकोपर खटल्यातील सर्व आरोपींना सबळ पुराव्याअभावी सोडून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे औरंगाबादेतून मेमध्ये पकडलेल्या इरफान कुरैशी यालाही ७ ऑगस्टलाच सबळ पुराव्यांअभावी सोडून दिले आहे. 


मेमध्येही एकाला केली अटक 
मेमध्ये घाटकोपर प्रकरणातच रेल्वेस्टेशन परिसरातून गुजरातच्याच एटीएसने इरफान अहमद कुरेशीला अटक केली होती. ओमानमध्ये राहत असलेला कुरैशी भावाला भेटण्यासाठी आला होता. तो याह्या शेखसोबत काम करत असल्याचे तपासात समोर आले. 

बातम्या आणखी आहेत...