आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला काटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखली/औरंगाबाद- आपल्या आतेभावासोबत असलेल्या अनैतिक संबंधाची कुणकुण पतीला लागल्याची माहिती मिळताच पत्नीने प्रियकर असलेल्या आतेभावाच्या मदतीने पतीचा खून केला. त्यानंतर पतीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा देखावा निर्माण करून हा खून पचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा हा प्रयत्न ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या हुशारीने हाणून पाडला. या खुन प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 72 तासात तपास करून आरोपींना गजाआड केले आहे.

 

या बाबत मिळालेली माहिती अशी कि, स्थानिक संभाजीनगर भागात संजय शंकर देव्हरे (वय-27) हा आपली पत्नी संगीता संजय देव्हरे (वय-25) व तीन वर्षाची मुलगी वैष्णवी यांच्यासोबत मागील तीन महिन्यांपासून किरण तुकाराम मोरे यांच्या खोलीमध्ये भाड्याने राहत होता. मात्र मागील दिवाळी सणापासून संगीताचे आपला आतेभाऊ सुनील जानकीराम हुंड्यार (वय- 27, रा. पुंडलिक नगर, औरंगाबाद) याच्यासोबत सूत जुळले. त्यामुळे त्याचे अधून मधून चिखलीला येणे जाणे सुरु झाले. मात्र त्याचे असे वारंवार येणे संजयला खटकू लागल्याने त्या दोघा पती पत्नी मध्ये खटके उडू लागले. तेव्हा आपल्या प्रेम सबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या पतीलाच कायमचे संपवायचे असा विचार सौ संगीता व सुनील यांच्या मनात पंधरा दिवसापुर्वी आला.

 

दरम्यान 16 जानेवारी रोजी प्रियकर सुनील हा चिखली येथे आला. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास संजय व सुनिलने मनसोक्त मद्यपान केले. त्यानंतर रात्री दोघांनी मटनावर ताव मारला. तत्पुर्वी सुनिलने प्रेमात अडसर ठरलेल्या संजयला दारूमध्ये झोपेच्या गोळया दिल्या. त्यानंतर झोपेतच संगीता व सुनिलने संजयचे हात पाय साडीने बांधून व दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जानेवारी रोजी सकाळी पाच वाजता सुनील हा संजयचा काटा काढून पुन्हा औरंगाबाद येथे निघून गेला. त्यानंतर सौ संगीता हिने आपले सासरे शंकर मनिराम देव्हरे यांना सकाळी फोन करून संजयची तब्येत अचानक खराब झाली असून लवकरात लवकर खोलीवर येण्यास सांगितले.

 

संजयचे वडील घरी पोहचल्यावर त्यांना संजय मृतावस्थेत दिसून आला. त्यावेळी त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली. त्यानंतर ठाणेदार महेंद्र देशमुख व पीएसआय सुधाकर गवारगुरु यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी अनुभवी ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या नजरेत मृतक संजयच्या गळ्यावर असलेले व्रण घातपाताचा संशय निर्माण करून गेले. शव विच्छेदन अहवालात गळा आवळून खून झाल्याचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांचा संशय खरा ठरला. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकुमार मीना, अप्परपोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी शाम महामुनी यांना दिली. त्यानंतर पीएसआय मोहन पाटील, तायडे, सोनकाबळे, गजानन वाघ या पोलिस कर्मचाऱ्यांना औरंगाबाद येथे पाठवून आरोपी सुनील हुंड्यार यास अटक केली. पोलिसी खाक्या दाखविता दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबुल केला. प्रकरणी पोलिसांनी प्रियकर व प्रेयशी  विरोधात गुन्हा दाखल केला.

 

18 जानेवारी रोजी आरोपी प्रियकरांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 22 जानेवारी पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुधाकर गवारगुरु व उमेश शेगोकार करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...