आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरमध्ये बंदला हिंसक वळण..महापालिका आयुक्तांची गाडी फोडली, आमदारांच्या गाडीवर दगडफेक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला गुरूवारी लातूर जिल्ह्यात हिंसक वळण लागले. आंदोलकांनी अनेक सरकारी आणि खासगी गाड्यांची तोडफोड केली. लातूर शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील मुख्य चौकांमध्ये ठिय्या आंदोलन करतानाच आंदोलकांनी जुने टायर्स जाळले.

 

मराठा क्रांती मोर्चाने शांततेत आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. परंतु गुरूवारी पहाटेपासूनच सुरू झालेल्या या आंदोलनावर कुणाचेच नियंत्रण नव्हते. सकाळी सहा वाजल्यापासूनच आंदोलनाला सुरूवात झाली. लातूर - बार्शी रस्त्यावरील साखरा येथे टायर जाळून रस्ता बंद केला. त्यामुळे पहाटे पुण्याहून येणाऱ्या गाड्या तेथेच अडकून पडल्या. लातूर शहरातील नवीन रेणापूर नाका, पीव्हीआर चौक, राजीव गांधी चौक, बसवेश्वर चौक, अशोक हाटेल चौक, हनुमान चौक या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जुने टायर जाळून आंदोलनाला प्रारंभ केला. दुपारपर्यंत तेथे टायर जळत होते. केवळ रूग्णवाहिका वगळल्या, तर शहरात एकही वाहन आले नाही. शहरात तरूणांचे जथ्थेच्या जथ्थे दुचाकीवरून घोषणाबाजी करत फिरत होते. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प होती. ग्रामीण भागातही तीव्र स्वरूपाचे आंदोलन झाले. किल्लारीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. ती जाळण्यात आली. जिल्ह्याच्या सर्वच भागात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत रस्ते बंद पाडले.

 

महापालिकेवर दगडफेक, आयुक्तांची गाडी फोडली
लातूर महापालिकेच्या आवाराचे लोखंडी गेट बंद असतानाही काही आंदोलकांनी गेटवरून चढून आत प्रवेश केला. तेथे उभ्या असलेल्या आयुक्तांच्या इनोव्हा गाडीसह इतर चार वाहनांवर दगडफेक करून गाड्यांच्या काच फोडण्यात आल्या. त्याचबरोबर काही आंदोलकांनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या आयुक्तांच्या कार्यालवर दगडफेक करून त्यांच्या दालनाच्या काचा फोडल्या. तर अहमदपूर नगर पालिकेच्या अग्नीशमन गाडीवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या.

 

आमदारांच्या गाडीवर दगडफेक
लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भिसे आपल्या मतदारसंघात होत असलेल्या आंदोलनासाठी रेणापूरकडे गेले होते. त्यांची गाडी रेणापूरच्या पिंपळफाटा येथे पोहचताच तेथे उपस्थित आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. त्यांच्या सुरक्षारक्षकांनी तसेच काहींनी त्यांना बाजूला नेल्यामुळे ते बचावले.

 

पालकमंत्री निलंगेकर, आमदार देशमुखांचा सहभाग
निलंग्यात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शिवाजी चौकात सुरू असलेल्या आंदोलनाला भेट दिली. तेथे आंदोलकांची भेट घेऊन त्यांनी निवेदन स्विकारले. पालकमंत्री या नात्याने नव्हे, तर समाजातील एक कार्यकर्ता या नात्याने आंदोलनस्थळी आलो असून आरक्षणाचा निर्णय पुढे रेटण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. दुसरीकडे लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांनी औसा रस्त्यावरील वासनगाव फाटा येथे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. आपल्या समर्थकांसह रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या अमित देशमुखांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करीत तातडीने आरक्षण देण्याची मागणी केली.

 

तहानलेल्या पोलिसांची उपासमार
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. महिला पोलिसांचीही मोठी संख्या होती. मात्र सकाळपासून कडकडीत बंद असल्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना साधे पिण्याचे पाणीही मिळाले नाही. ज्यांनी घरून एखादी बाटली आणली होती. त्यावरच तहान भागवावी लागली. त्याचबरोबर चहा, नास्ताही मिळाला नाही. त्यामुळे उपाशी राहूनच पोलिसांनी बंदोबस्त केला.

 

रक्तदान करून आंदोलन
दरम्यान, एकीकडे तोडफोड, जाळपोळ सुरू असतानाच आंदोलकांचा एक सामाजिक चेहराही पाहायला मिळाला. लातूरच्या पीव्हीआर चौकात एका गटाने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. याठिकाणी अनेक तरूणांनी रक्तदान करून आंदोलनात सहभाग नोंदवला. या उपक्रमाच्या आयोजक वैशाली लोंढे यांनी सांगितले की, आम्ही वेगळ्या पद्धतीने आरक्षणाच्या मागणीसाठीचे आंदोलन करीत अाहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्याचबरोबर शहर आणि जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आंदोलकांनी रूग्णवाहिकांना रस्ता खुला करून दिला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...लातुर शहरासह जिल्ह्यातील मराठा आंदोलनाचे फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...