आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- मराठा आरक्षणाचे सर्वेक्षक बाळासाहेब सराटे यांच्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी शुक्रवारी (१६ मार्च) सुभेदारी विश्रामगृह परिसरात शाई फेकली. सराटे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक असून ते मराठा समाजात फूट फाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना धक्काबुक्कीही केली. मात्र, मी कोणाचाही हस्तक नाही. समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता असल्याचे सराटे म्हणाले.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागास आयोगातर्फे शुक्रवारी औरंगाबाद जिल्ह्याची सुनावणी झाली. त्या वेळी हा प्रकार घडला. सराटेंना घेराव घालत त्यांच्यावर शाई टाकण्यात आली. ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’च्या घोषणांनी परिसर दणाणून टाकला. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. सराटेंना येथून हाकला, असेही कार्यकर्ते म्हणत होते. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ त्यांच्याभोवती कडे करत त्यांना सुभेदारी विश्रामगृहाबाहेर नेले.
मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी म्हणाले, आरक्षणासाठी संपूर्ण समाज एकत्र झाला असताना काही मंडळी त्यात आडकाठी घालत आहेत. सराटेंची आयोगाशी जवळीक वाढली आहे. मराठा समाज आरक्षणाच्या नावाखाली ते अर्ज गहाळ करत आहेत. आता समाजाशी गद्दारी करणाऱ्यांना फिरू देणार नाही, असा इशारा रमेश केरे पाटील, अप्पासाहेब कुढेकर, सुनील कोटकर आदींनी दिला. दरम्यान, सराटे म्हणाले, सर्वेक्षणाचे काम करत असल्याने माझी आयोगाशी जवळीक झाली आहे. त्यातूनच हा प्रकार घडला आहे. शाई फेकल्याने माझे तोंड काळे झाले नसून समाजाला डाग लागला आहे.
सराटे कायम समाज विरोधक
सराटे कायम समाज विरोधक राहिले आहेत. तीन-चार वर्षांपूर्वी राणे आयोगाकडेही त्यांनी आरक्षणविरोधी निवेदन दिले होते. ते संघाचे हस्तक असून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून ते समाजात फूट पाडत असल्यानेच त्यांच्यावर शाई फेकली आहे.
- रमेश केरे पाटील, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... या घटनेचा व्हिडिओ...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.