आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MIMच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या संघटनमंत्र्यांची गाडी फोडली; चालकाला मारहाण, औरंगाबादेत तणाव?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-  देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी या ठरावाला कडाडून विरोध केला. यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या नगरसेवकांनी सय्यद मतीन यांना बेदम मारहाण केली.

 

या घटनेचे पडसाद थोड्याच वेळात शहरात उमटले. एमआयएमच्या काही कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोर भाजप संघटन मंत्री भाऊराव देशमुख यांच्या गाडीची तोडफोड केली. एवढेच नाहीतर चालकालाही मारहाण केली. यामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे.

 

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्यासाठी शुक्रवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र,या प्रस्तावाला एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध केला. त्यांनी विरोध करताच नगरसेवक राज वानखेडे, दिलीप थोरात, प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, उपमहापौर विजय औताडे यांनी मतीन यांच्यावर हल्ला केला. त्यांना बेदम मारहाण केली. नंतर त्यांना सभागृहाबाहेर पिटाळून लावले. सय्यद मतीन यांना कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

 

ही घटना संपूर्ण शहरात वार्‍यासारखी पसरली. घटनेनंतर मतीन यांचे समर्थक महापालिका मुख्यालयासमोर जमा झाले. तसेचभाजपचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमा झाले. भाजप आमदार अतुल सावे यांच्यासह पदाधिकारी पोलिस आयुक्तांना भेटण्यासाठी गेले असता मतीन यांच्या समर्थकांनी भाऊराव देशमुख यांची स्कार्पिओ गाडीवर दगडफेक केली. तसेच चालक विलास काशिनाथ गोराडे यांना बेदम मारहाणही केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून यांची बोराडे यांची टोळक्यातून सुटका केली. या घटनेमुळे शहरात तणाव पसरला आहे. शहरातील चौका-चौकांत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

मतीन यांचा विरोध वैयक्तिक, पक्षाशी संबंध नाही- आमदार इम्तियाज जलील
नगरसेवक सय्यद मतीन यांची वर्तणूक वैयक्तिक असून त्याच्याशी पक्षाचा संबंध नाही. त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...MIMचे नगरसेवक सय्यद म‍तीन यांना झालेल्या मारहाणीचे फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...