आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉपी करताना पकडल्यानंतर औरंगाबादेत नर्सिंगच्या विद्यार्थ्याने पाचव्या मजल्यावरून मारली उडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एमआयटी नर्सिंग महाविद्यालयातील (बीड बायपास) दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी सचिन सुरेश वाघ (१९, रा. एन-११, नवनाथनगर) याने मंगळवारी (१० एप्रिल) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास महाविद्यालय इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून म्हणजे सुमारे ६० फूट उंचीवरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर कमलनयन बजाज रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. कॉपी करताना पकडला गेल्याने त्याने हा प्रकार केल्याचे महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे आहे. महाविद्यालयातील मानसिक त्रासामुळे त्याने उडी घेतल्याचा त्याच्या मित्रांचा दावा आहे. सातारा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. 


एमआयटीचे महासंचालक प्रा. मुनीश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ९.३० वाजता न्यूट्रिशन बायोकेमिस्ट्री विषयाची प्री-युनिव्हर्सिटी टेस्ट सुरू झाली. पाऊण तासानंतर त्याच्याकडे कॉपी सापडल्याने त्याची उत्तरपत्रिका काढून घेत त्याला प्राचार्यांसमोर उभे करण्यात आले. त्याने दिलेल्या तीन मोबाइल क्रमांकांवर त्याच्या वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, पण तो अयशस्वी झाला. म्हणून त्याच्याकडून घडलेला प्रकार लिहून घेण्यात आला आणि बुधवारी परीक्षेसाठी ये, असे सांगितले. 


मित्रांना कॉल केले : त्यानंतर सचिन महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावर गेला. तेथून त्याने एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या सौरभ रणदिवे व घराजवळील शुभम राठोड नावाच्या मित्राला तीन-चार कॉल केले. सौरभही परीक्षेत, तर शुभम काही कामात व्यग्र असल्याने त्यांनी त्याचा कॉल आधी उचलला नाही. थोड्या वेळाने दोघांनीही कॉल घेतले. तेव्हा त्याने मी आत्महत्या करत असल्याचे सांगितले. 


विद्यार्थी धावले : महाविद्यालयाच्या इमारतीच्या पोर्चजवळील काच फोडून विद्यार्थ्यांनी त्याला बाहेर काढत कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सातारा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एम. आर. बहुरे यांनी त्याच्या प्रकृतीची माहिती घेतली. कॉपी पकडल्यावर घाबरल्यामुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज बहुरे यांनीही व्यक्त केला. 


पाचव्या मजल्यावरून उडी घेत विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न 
 प्रवेशाच्या वेळी सर्वच विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाने लिहून घेतले होते आत्महत्या करणार नसल्याचे शपथपत्र उडी मारण्यापूर्वी मित्राला मेसेज व कॉल करत म्हटले होते : मी सॉरी म्हणालो, पण कॉलेजवाले माझे ऐकत नाहीत... 

 

विद्यार्थ्यांकडून घेतलेले शपथपत्र 
महाविद्यालयीन प्रशासनाने इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सचिनकडूनही मी आत्महत्या करणार नाही. प्राचार्य किंवा आणि व्यवस्थापनाला अशा प्रकारच्या धमक्या देणार नाही, असे बाँडपेपरवर स्पष्ट लिहून घेतले आहे. एकदा प्रवेश घेतला की तो रद्द करता येणार नाही. तसे केल्यास त्याला चार वर्षांचे शुल्क भरावे लागेल. पैसे वेळेवरच भरावे लागतील. तसे न झाल्यास पुढच्या वर्षाकरिता जाता येणार नाही, असे या बाँडपेपरवर लिहिण्यात आले आहे. याशिवाय अगदी छोट्या छोट्या गोष्टी यात लिहिल्या असून त्या मोडल्या तर कडक कारवाई होईल. महाविद्यालयातून काढूनही टाकू, असेही यात लिहिले आहे. याबाबत प्राचार्य हेलन म्हणाल्या की, माझ्या दालनात एकदा काही जण विषारी औषध घेऊन आत्महत्येची धमकी देण्यासाठी आले होते. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्यांचे प्राण वाचवावेत, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे असा विचार विद्यार्थ्यांच्या मनात येऊ नये, असे म्हणून आम्ही लिहून घेतले. 

हुंदके अनावर... 
या हृदयद्रावक घटनेमुळे विद्यार्थी प्रचंड हादरले. तर विद्यार्थिनींना हुंदके अनावर झाले. त्या ओक्साबोक्शी रडू लागल्या होत्या. छाया : मनोज पराती 

बोलणे संपताच उडी घेतली 
दोन्ही मित्रांशी बोलणे होताच सचिनने पाचव्या मजल्यावरील जिन्याच्या जवळ असलेल्या काचेच्या खिडकीतून उडी मारली व तो मुख्य प्रवेशद्वाराच्या पोर्चवर म्हणजे पहिल्या मजल्यावर पडला. 

काही जणांनी व्हिडिओ काढला 
तो खिडकीपाशी उभा असतानाच पोर्चजवळ उभ्या असलेल्या काही विद्यार्थ्यांनी त्याला रोखण्यासाठी आरडाओरड केली, तर काहींनी मोबाइलवर व्हिडिओ काढला. 
 


उडी मारण्यापूर्वी म्हणजे मंगळवारी सकाळी ११ वाजून तीन मिनिटांनी सचिनने एका मित्राला पाठवलेला मेसेज असा.... 
भाऊ चेतन, यार मी खरं खूप स्टडी करत होतो, पण यार माझा फर्स्ट टाइम यार, माझ्या घरच्यांना खूप वाईट वाटेल यार, हे म्हणताय की तू सिक्स मंथ बॅकलॉगमध्ये पेपर दे, मी प्रिन्सिपलला सॉरी पण म्हणालो यार, पण ते माझं ऐकत नाहीये. तर मी आता सुसाइड करतो आहे. सॉरी यार, मला माहिती आहे की तुला हे आवडणार नाही. म्हणून नंतर सौरभला कॉल कर आणि त्याच्याकडून माझ्या घरच्यांचा नंबर घे. बाय. 

मी जिवाच्या आकांताने ओरडलो, पण... 
या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आणि बालमित्र सौरभ या घटनेमुळे गांगरून गेला. तो म्हणाला, माझ्यासमोर माझ्या जिवलग मित्राने उडी मारली, यावर माझा विश्वासच बसत नाही. मी जेव्हा त्याच्या कॉलेजजवळ आलो तेव्हा तो मला पाचव्या मजल्याजवळ खिडकीत दिसला. मी वरती जाऊ की खाली थांबू, हे मला समजत नव्हते. मी जिवाच्या आकांताने ओरडत होतो. सगळी मुले त्याच्या मागे जा, असे सांगत होते. पण मी काही करण्याच्या आतच त्याने उडी मारली. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचा व्हिडिओ आणि फोटो...
बातम्या आणखी आहेत...