आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडे अध्यासन केंद्राची सरकारकडून अवहेलना; आमदार इम्तियाज जलील यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने औरंगाबादच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गोपीनाथ मुंडे सेंटर फाॅर रुरल डेव्हलपमेंट सुरू करण्याची फडणवीस सरकारने घोषणा झाली होती. मात्र, या अध्यासनाला गेल्या साडेतीन वर्षांत एका रुपयाचाही निधी दिला नाही, असे स्पष्ट करत फडणवीस सरकारने त्यांच्याच पक्षाच्या दिवंगत नेत्याच्या नावे स्थापन केलेल्या सेंटरची घोर उपेक्षा चालवली आहे, असा आरोप एमआयएमचे आैरंगाबाद मध्यचे आमदार इम्तियाज जलील यांनी केला. आमदार जलील मंगळवारी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलत होते.   


जलील म्हणाले, २०१५ मध्ये मुंडे यांच्या स्मरणार्थ गोपीनाथ मुंडे सेंटर फाॅर रुरल डेव्हलपमेंट स्थापण्याचा सरकारने निर्णय केला. २०१६ मध्ये औरंगाबाद येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या वेळी मुंडे सेंटरसाठी १५० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आजपर्यंत प्रत्यक्षात त्यापैकी एक रुपयाचासुद्धा निधी मिळाला नाही. या सेंटरमध्ये एक चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि एक सेवानिवृत्त प्राचार्य असे दोघे कार्यरत असल्याची माहिती अामदार जलील यांनी या वेळी दिली.   


उद्योजकांना साकडे  
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पुढच्या महिन्यात एक जागतिक स्तरावरची परिषद आयोजित करण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी  विद्यापीठाकडे निधी नाही. परिषदेसाठी निधी  गोळा करण्यासाठी विद्यापीठाच्या तीन महिला प्राध्यापकांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. या तीन प्राध्यापिका सध्या औरंगाबादमधील बड्या उद्योजकांकडे जाऊन परिषदेसाठी मदतीची याचना करत आहेत, असा गौप्यस्फोट आमदार जलील यांनी केला.  

 

..तो पैसा कहाँ जा रहा है  ? 

 

एकीकडे सरकार २०१५ मध्ये राज्याची अर्थव्यवस्था १ अब्ज डाॅलरची होणार असल्याचे सांगत आहे,  तर दुसरीकडे कशालाही निधी देत नाही, तो पैसा कहाँ जा रहा है, असा सवाल आमदार इम्तियाज यांनी उपस्थित केला. राज्य सरकारने निधीला कात्री लावण्यासाठी राज्यातील प्राध्यापक भरती थांबवली आहे. मग सेट आणि नेट परीक्षा तरी कशाला घेत आहात, त्याही बंद करा, असे जलील यांनी आपल्या भाषणात सरकारला सुनावले.

बातम्या आणखी आहेत...