आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन, नाफेडची खरेदी 16% पिकाचीच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चांगल्या पावसामुळे यंदा हरभऱ्याचे झालेले विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांना नुकसान देणारे ठरणार आहे. केंद्राने हरभऱ्याला ४४०० रुपये हमीभाव देण्याचे ठरवले असले तरी व्यापारी मात्र ३४०० ते ३६०० रुपयांच्या वर देण्यास तयार नाही. राज्याने नाफेडच्या माध्यमातून एकूण उत्पादनाच्या केवळ १६ टक्के हरभरा विकत घेण्याचे ठरवले आहे. यामुळे एकतर माल पडू देणे किंवा आलेल्या किमतीत हरभरा विकण्याशिवाय व्यापाऱ्यांना पर्याय नाही.  


शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने हरभऱ्यास ४४०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. प्रत्यक्षात औरंगाबादसह विविध कृषी उत्पन्न बाजार समित्या हरभऱ्याला ३४०० ते ३६०० रुपयांचा दर  मिळतोय. औरंगाबादेत ३० जानेवारी रोजी २० क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. त्यास ३४०१ रुपये दर मिळाला, तर १० फेब्रुवारीला ६७ क्विंटल हरभऱ्याची आवक होऊन त्यास ३६३५ रुपयांचा भाव मिळाला. २० फेब्रुवारीला आवक दुपटीने वाढून १२८ क्विंटल झाली. दर मात्र ३६८५ एवढाच राहिला. तर १ मार्च राेजी आवक घटून अवघी ५४ क्विंटल झाली. तर दर ३४११ रुपये होता.  


हरभरा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १ मार्चपासून राज्य सरकारने नाफेडच्या माध्यमातून हमीभावाने हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. येथे ४४०० रुपयांचा दर  मिळण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी बाजारात हरभरा कमी प्रमाणात आणत आहेत. मात्र, ही प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.  


दरम्यान, राज्याने एकूण उत्पादनाच्या  केवळ १६ टक्के हरभरा नाफेडमार्फत खरेदी करण्याची घोषणा केली आहे. मात्र, आकडेवारी बघता देशभरात यंदा हरभरा उत्पादनाचे  क्षेत्र ८ टक्क्यांनी वाढून १०७.६२ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. चांगला पाऊस झाल्याने राज्यातही हरभऱ्याचे  उत्पादन वाढले आहे.  


किमान ५० टक्के पिकाची खरेदी करावी  : एकीकडे ही स्थिती असताना मध्य प्रदेश सरकारने हमीभाव आणि बाजारभावातील रक्कम थेट खात्यावर जमा करण्याची घोषणा केली आहे. यामुळे राज्यात मागणी घटल्याने हरभऱ्याचे दरही कोसळले आहेत. सरकारने किमान ५० टक्के मालाची खरेदी करावी किंवा मध्य प्रदेशप्रमाणे भावांतर योजना लागू करण्याची मागणी राम सोनवणे यांनी केली आहे.

 

ऑनलाइन नोंदणीला सुरुवात  
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात यंदा १९ लाख टन हरभरा उत्पादनाची शक्यता आहे.   गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १० लाख टन हरभरा अधिक उत्पादन होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकार केवळ १६ टक्के म्हणजे ३ लाख टन हरभरा खरेदी करणार असल्याने मोठ्या प्रमाणात हरभरा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...