आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: प्रोझोन मॉलमधील नीरव मोदीच्या गीतांजली ज्वेलर्सच्या काउंटरवर ईडीकडून छापा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पीएनबी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार नीरव मोदी याच्या गीतांजली ज्वेलर्सच्या प्रोझोन मॉलमधील आऊटलेटवर सोमवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी)  पथकाने छापा मारला. प्रोझोन मॉलमधील शॉपर्स स्टॉपमध्ये गीतांजलीचे हे आऊटलेट आहे.  दिल्ली-मुंबईहून आलेल्या आठ जणांच्या पथकाने गीतांजलीचे आऊटलेट सील केले.  हे पथक ग्राहक बनून गीतांजलीच्या आऊटलेटमध्ये शिरले. या पथकाने तब्बल ९ तास या काउंटरवरील कागदपत्रांची तपासणी करत गीतांजलीचे दोन्ही काउंटर सील केले. याप्रकरणी ईडीने ११ पानांचा पंचनामा तयार केला आहे. शहरातील पाच पंचांसमक्ष ही कारवाई करण्यात आली. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी देशभरातील नीरव मोदीच्या मालकीच्या गीतांजली स्टोअर्सवर गेल्या दोन दिवसांपासून ईडीचे छापासत्र सुरू आहे. 


औरंगाबादेत गीतांजलीचे स्टोअर नसले तरी प्रोझोन मॉलमधील शॉपर्स स्टॉपमध्ये याचे रिटेल काउंटर आहे. येथे गीतांजलीचे जिली, नक्षत्र, अस्मी, संगिनी आणि निर्वाणा या ब्रँडचे हिरे, सोने आणि प्लॅटिनमचे दागिने विकले जातात. सोमवारी सकाळी १० वाजता स्टोअर उघडताच ईडीचे ८ अधिकारी ग्राहक बनून मॉलमध्ये आले. त्यांनी येथील कर्मचाऱ्यांकडून विविध दागिन्यांची माहिती घेतली. बघता बघता त्यांनी कर्मचाऱ्यांना बाजूला करत काउंटरचा ताबा घेतला. हे नेमके काय सुरू आहे हे लक्षात येण्याआधीच ईडीने दोन्ही काउंटरमधील दागिने सील करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी दिवसभरात दागिन्यांशी संबंधित फायली, बिले, इनव्हॉइस तपासले. या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून त्यांनी ५ स्थानिक पंचाच्या साक्षीने ११ पानांचा पंचनामा तयार केला. दागिन्यांच्या बॉक्सला चिठ्ठ्या लावून सील करण्यात आल्या. या वेळी ईडीच्या अधिकाऱ्यांसह पीएनबीचे प्रतिनिधी हजर होते. दरम्यान, या वेळी नेमके किती दागिने सील करण्यात आले हे सांगण्यास  ईडीने नकार दिला. दरम्यान, ईडीच्या धाडीला आपण संपूर्ण सहकार्य केल्याचे प्रोझोनचे सेंटर हेड मोहंमद अर्शद आणि शॉपर्स स्टॉपच्या व्यवस्थापनाने सांगितले. 


गीतांजलीचे मॅनेजर पुण्यात  
सकाळी ग्राहक म्हणून आलेले ८ जण ईडीचे कर्मचारी असल्याचे समजताच शॉपर्स स्टोअरचे व्यवस्थापक धावून आले. मात्र, ईडीने त्यांची मदत नाकारली.  शाॅपर्स स्टॉपमधील गीतांजलीच्या काउंटरचा व्यवस्थापक पुण्यात आहे. दोन्ही काउंटर मिळून ८ जण येथे काम करतात. ईडीच्या छाप्याला नेमका कसा प्रतिसाद द्यायचा यावरून हे कर्मचारी गोंधळून गेले होते. ईडीने या कर्मचाऱ्यांना बाजूला बसण्यास सांगितले. त्यांच्यापैकी एका महिला कर्मचाऱ्याने ईडी अधिकाऱ्यांना कागदपत्रे दाखवली.       


गीतांजलीने प्रोझोनचे भाडे थकवले
प्रोझोन मॉलमध्ये याआधी गीतांजलीचे स्वतंत्र स्टोअर होते. दोन वर्षे हे स्टोअर चालले. मात्र, ते तोट्यात चालल्याने कंपनीने ते अचानक बंद केले. मात्र, स्टोअर बंद  करताना गीतांजलीने प्रोझोनचा दोन वर्षांचा किराया थकवल्याची माहिती प्रोझोनच्या सूत्रांनी दिली. गीतांजलीने ब्रँड अॅम्बेसेडर प्रियंका चोप्राचे मानधनही थकवले आहे.

बातम्या आणखी आहेत...