आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फार्मसीला प्रवेश नाही; विद्यार्थ्याची, कर्जामुळे शेतकरी तर २ घटनांत २ महिलांची आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- बी.फार्म.ला प्रवेश न मिळाल्याने बीड तालुक्यातील सात्रा येथील मराठा समाजातील २० वर्षीय विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. तर नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. दरम्यान, हिंगोली येथेही दोन ठिकाणी दोन महिलांनी आत्महत्या केली. बीड तालुक्यातील सात्रा येथील राहुल पद्माकर हावळे (२०)  याला औषधनिर्माणशास्त्र विषयाला प्रवेश घ्यायचा होता.  मात्र इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत गुण कमी असल्याने शासकीय कोट्यातून   प्रवेश मिळाला नाही. घरची परिस्थिती बेताची असल्याने व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणे शक्य नव्हते. यामुळे त्याने नैराश्यातून राहत्या घरी विष घेतले होते. त्याला बीड जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. मात्र सोमवारी सकाळी त्याचा  मृत्यू झाला. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळेच राहुलवर आत्महत्येची वेळ आली. आरक्षण मिळावे यासाठी त्याने आत्महत्या केल्याचा दावा करत मराठा आंदोलक व नातेवाइकांनी सोमवारी सकाळी रुग्णालयात ठिय्या मांडला होता.  उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी 
राहुलच्या कुटुंबीयांची भेट घेत १० लाखांची मदत व कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी विशालचा मृतदेह ताब्यात घेतला.  


कर्जबाजारी शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या
परभणी : सततची नापिकी, दुष्काळ व कर्जमाफीतील गोंधळ यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या दहेगाव (ता.जिंतूर) येथील तरुण शेतकऱ्याने रविवारी रात्री राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. अशोक एकनाथ ढोणे (वय ३०) असे या युवकाचे नाव आहे. दहेगाव (ढोणे) येथील अशोक ढोणे यांचा व कुटुंबीयांचा वडिलोपार्जित जमिनीवरच चरितार्थ चालतो. पेरणीसाठी त्यांनी उसनवारी तसेच खासगी कर्ज घेतले. शेतात पेरणी केली. मात्र मागील २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जोमात आलेली पिके सुकू लागली आहेत. त्यातच त्यांच्या आई-वडिलांच्या नावाने स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे शेतीवर घेतलेले कर्ज होते. हे कर्ज माफ होईल व नवीन कर्ज मिळेल या प्रतीक्षेत ते होते. मात्र कर्जमाफी मिळाली नाही.  त्यामुळे नैराश्य येऊन  अशोक यांनी रविवारी रात्री एकच्या सुमारास आपल्या राहत्या घरी फवारणीसाठी आणलेले कीटकनाशक प्राशन केले. त्यांना तत्काळ जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात  दाखल केले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने परभणीला हलवण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील व तीन भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी बामणी  ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.


हिंगोली शहरात दोन महिलांच्या आत्महत्या
हिंगोली : शहरातील कमलानगर आणि मंगळवारा बाजार भागात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या.  पहिल्या घटनेत, संगीता साहेबराव ठोके  (४२, रा. धामणी, हल्ली मुक्काम - कमला नगर, हिंगोली) हिने सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास  घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या पतीचे गेल्या वर्षी आजारामुळे निधन झाले होते. त्यामुळे घरगाडा चालवणे, मुलीचे लग्न,  शेतातील सतत नापिकी आणि पतीच्या आजारपणामुळे झालेले कर्ज आदी कारणांमुळे तिने सोमवारी आत्महत्या केली. तिच्या पश्चात तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. दोन मुलींचे लग्न झाले असून अविवाहित असलेली एक मुलगी सात वर्षांची तर मुलगा पाच वर्षांचा आहे.  तर दुसऱ्या घटनेत शहरातील मंगळवारा भागातील अंकिता अमोल घुगे (१९) या  विवाहितेने आत्महत्या केली.  सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मंगळवारा भागात ही घटना घडली. या विवाहितेने साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

 

बातम्या आणखी आहेत...