आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड/अकोला- राज्याच्या बहुतांश भागांत मंगळवारीही पावसाची संततधार सुरू होती. मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नाेंद झाली. दरम्यान, मराठवाडा व विदर्भात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत ८ जणांचा बळी गेला.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात पुरात तवेरा गाडी वाहून गेल्याने पती, पत्नी आणि लहान मुलीचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत एक तरुण वाहून गेला. बरबडा येथील गंगाधर मारिती दिवटे हे मांजरमहून पत्नी पारूबाई व पाच वर्षांच्या अनुसया या मुलीसह तवेरा गाडीतून परतत होते. कोलंबी- नांदेड रोडवरील छोट्या नदीला पूर आला होता. पण पाण्याचा अंदाज न घेता दिवटेंनी गाडी पाण्यात घातली. जोरदार प्रवाहामुळे गाडी वाहून गेली. या तिघांचाही पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दुसऱ्या घटनेत मांजरम येथीलच विनायक बालाजी गायकवाड (२७) हा मित्राच्या बहिणीला रुग्णालयात जेवणाचा डबा देण्यासाठी नायगावला गेला हाेता. तिथून ताे बेंद्रीमार्गे मांजरमकडे येत होता. याच रस्त्यातील नदीला पूर आला होता.नदीच्या पाण्याचा अंदाज घेण्यासाठी तो पाण्यात उतरला आणि प्रवाहात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. रात्री उशिरा त्याचा मृतदेह सापडला. त्याची पत्नीही चारच दिवसांपूर्वीच बाळंत झाली होती.
छत काेसळून ३ ठार
भंडारा जिल्ह्यातील राजे दहेगाव येथे पावसामुळे एका घराचे छत अंगावर काेसळून शेतमजुराच्या कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. सुखरू दामाेदर खंडाते (३२), सारिका सुखरू खंडाते (२८, पत्नी) व सुकन्या सुखरू खंडाते (३) अशी मृतांची नावे अाहेत, तर गाेंदिया जिल्ह्यातील मुरमाडी (ता. तिराेडा) या गावात शेतात काम करणाऱ्या सुदाम टेकाम यांच्या अंगावर वीज काेसळली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी..
मराठवाड्यात मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यत 42 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये 15 तालुक्यात तर 83 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वंधिक 60 मंडळ आणि 12 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात मराठवाड्यात सर्वाधिक 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर औरंगाबाद 35, जालना 31, परभणी 51, हिंगोली 61, बीड 27, लातूर 28, उस्मानाबाद 22 मिमी इतका पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्हात 3, जालना 1, हिंगोली 12 आणि बीड मध्ये एक मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तर हिंगोली जिल्ह्यात 3 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.मराठवाड्यात उमरी तालुक्यात सर्वाधिक 119 मिमी तर हिमायतनगर मंडळात 130 मिमी पाऊस झाला आहे.
परभणी, हिंगोलीतही दमदार पाऊस!
रविवारी रात्रीपासून नांदेड जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने ठाण मांडले. रविवारी रात्री उशिरा विष्णुपुरी बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडण्यात आला. जलाशयातील पाणी पातळी कमी झाल्यानंतर सोमवारी सकाळी 8 वाजता दरवाजा बंद करण्यात आला. पण दुपारी 4 वाजता पुन्हा उघडण्यात आला.
हिंगोली जिल्ह्यात सोमवारी (20 ऑगस्ट) रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत एकूण 13.05 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 65.26 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
लातूर जिल्ह्यात या आठवड्यात सातत्याने रिमझिम पाऊस सुरू आहे. सहा दिवसांच्या पावसामुळे आतापर्यंत जिल्ह्यात पडलेल्या पावसाची सरासरी 422 मिलिमीटरवर पोहोचली. रविवारी परभणी जिल्ह्यातही पावसाने सर्वदूर हजेरी लावली. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात 9.84 मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत 392.75 मिलीमीटर पाऊस झाला.
दोन शेतकरी पुरात वाहून गेले
वडगाव ज. (ता.हिमायतनगर) गावाजवळील पूल पार करताना मारुती संग्राम बिरकुरे (62) हा शेतकरी पुरात वाहून गेला. त्यांचा सायंकाळपर्यंत काही ठावठिकाणा लागला नाही. तर हदगाव तालुक्यातील कवाना येथील भारत हरिभाऊ तोडकर (35) हा शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेला. नाल्याच्या पुराचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.