आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत वृद्धेचा गळा आवळून मंगळसूत्र लुटले; लुटारुंच्या टोळीतील दोन गुन्हेगार गजाआड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-  पाणचक्की, बीड बायपास व समर्थनगरात धुमाकूळ घालत एकाच रात्रीत रिक्षा, दुकान फोडी आणि वृद्धेचा गळा आवळून मंगळसूत्र लुटलेल्या दोघांच्या मुसक्या गुन्हे शाखा, क्रांतीचौक पोलिसांनी आवळल्या.

 

बद्री राजू शिंदे (20, रा.घाटी परिसर) आणि शेख वहीद उर्फ शाहरुख उर्फ चार्ली शेख वसीम (रा.भडकल गेट) अशी त्यांची नावे असून त्यांनी पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे. शिंदेला क्रांती चौक पोलिसांनी तर शेख वहीदला गुन्हे शाखेने पकडले. कोर्टाने दोघांना 13 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

पाणचक्की परिसरातील प्रबुध्दनगरमधील शेख अब्दुल नईम शेख अब्दुल अजीज यांची रिक्षा (एमएच-२0-बीटी-६३९३) लुटारुंनी मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरून नेली. याच रिक्षातून फिरत शेख वहीद व बद्री शिंदेसह साथीदारांनी बीड बायपासवरील पटेल कॉम्प्लेक्समधील जावेद खान शब्बीर खान (३५, रा. सातारा परिसर) यांच्या सह्याद्री गॅस एजन्सीचे पहाटे साडेपाचच्या सुमारास शटर उचकटून गॅस कार्ड आणि स्वाक्षरीचे तीन धनादेश आणि कागदपत्रे लंपास केली. नंतर या  टोळीने रिक्षाने समर्थनगरात जाऊन पावणेसहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या शैलजा शरदकुमार देव (७0) या वृध्देचा गळा दाबून मंगळसूत्र, कर्णफुले आणि मोबाईल हिसकावून पळ काढला. छावणीतील इदगाहजवळ रिक्षा बेवारस सोडून पळ काढला.   

 

सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली होती घटना    

क्रांती चौक पोलिसांनी समर्थनगरातील घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात रिक्षाने आलेल्या लुटारुंचे चेहरे स्पष्टपणे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी रिक्षाच्या क्रमांकावरून मालकाचा शोध घेतला असता रिक्षादेखील चोरीला गेल्याचे समोर आले. नंतर पोलिसांनी तिन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून लुटारुंचा शोध सुरू केला. क्रांती चौक ठाण्याचे उपनिरीक्षक अजय सूर्यवंशी, जमादार गजानन मांटे, राजेश फिरंगे, अनिल इंगोले, संतोष रेड्डी, राजेश चव्हाण, सतीश जाधव, रवी पोळ यांनी बद्री शिंदेला घाटीत पकडले, तर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक योगेश धोंडे, जमादार संतोष सोनवणे, रामदास गायकवाड, बापुराव बावस्कर, आनंद वाहुळ, विकास गायकवाड आणि रितेश जाधव यांनी वहीदला पकडले. अटकेतील शिंदे आणि वहीदने पाच गुन्ह्यांची कबुली दिली.

बातम्या आणखी आहेत...