आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलीवूडमधील आयटम साँग सर्वाधिक अश्लील प्रकार, तो थोपवला अन् प्रेक्षकांनीही सहन केला -गोपालकृष्णन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- भारतीय कलांचा वापर बॉलीवूडमध्ये करताना नृत्य दिग्दर्शकांनी अश्लीलता आणली. आयटम साँग हा अलीकडील काळातील सर्वाधिक अश्लील प्रकार आहे. तो प्रेक्षकांवर थोपवला अन् प्रेक्षकांनीही सहन केला. बॉलीवूडला इडियट प्रेक्षक हवे आहेत, अशी टीका ख्यातनाम दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांनी केली. 


जागतिक नृत्य दिनानिमित्त महागामी गुरुकुलाच्या वतीने एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात रविवारी 'पुनरावलोकन' या नृत्यावर आधारित दोनदिवसीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात महागामीच्या संचालिका पार्वती दत्ता आणि नृत्य विश्लेषक कुणाल रे यांनी गोपालकृष्णन यांना बोलते केले. ते म्हणाले, मी नृत्यावर आधारित अनेक चित्रपट केले. चित्रपट आणि नृत्य सादरीकरण हे पूर्णत: वेगळे माध्यम आहे. प्रेक्षकांना ते प्रत्यक्ष कार्यक्रमात असल्याचा अनुभव दिला. चित्रपटात क्लोजअप वापरले जातात. तो प्रयोग मी जाणीवपूर्वक टाळला. चित्रपटाद्वारे संवेदनशीलता वाढवण्याऐवजी आपण ती वेगाने गमावत आहोत. तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदल झाले. मात्र, माझे चित्रपट हँडमेड आहेत. कारण, मी फिल्मला स्पर्श करू शकत होतो, असे ते म्हणाले. या वेळी एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, प्राचार्या डॉ. रेखा शेळके, फिल्म मेकिंगचे शिव कदम, प्रा. डाॅ. आशा देशपांडे-माने आदींची उपस्थिती होती. 

 

दोन तासांच्या मुलाखतीत काय म्हणाले गोपालकृष्णन 
- शालेय शिक्षणात शुद्धतम अभिजात कलांचा स्पर्श मुलांना होत नाही, आपल्या शिक्षण पद्धतीचा हा दोष आहे. 
- सामान्यतः: दिग्दर्शक स्क्रिप्ट घेऊन निर्मात्यांकडे जातात; पण माझ्या दिग्दर्शकांनी कधीच स्क्रिप्टबद्दल शब्दही काढला नाही. 
- मुख्य प्रवाहापासून अतिशय निराळ्या धाटणीचे चित्रपट मी केले. एकाही चित्रपटाने निर्मात्याला निराश केले नाही. 
- तिप्पट पगाराची नोकरी सोडून मी या क्षेत्रात आलो. पहिला चित्रपट करण्यासाठी मला ७ वर्षे लागली. 
- नृत्यावर आधारित चित्रपट करताना ती कला समजावून घेणे, त्याचे माध्यम समजावून घेणे अन् कलावंताचे जीवन समजावून घेणे गरजेचे आहे. 
- कलेमधून पैसा कमावणे याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. येथेच सर्वांची चूक होते. कला आयुष्य समृद्ध करण्यासाठी आहे. पैसा कमावण्यासाठी नाही. 
- मी पुरस्कार परत केले नाहीत. कारण मी ते मागितले नव्हते. माझ्या गुणवत्तेमुळे ते माझ्यापर्यंत आले, असे मी मानतो. 
- एफटीआयचा अध्यक्ष चित्रपटातील व्यक्ती असणे ही हसण्याची नव्हे तर रडण्याची बाब आहे. 

बातम्या आणखी आहेत...