आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईहून आलेले जेटचे बोइंग विमान धावपट्टीवर जोरात आदळले, १३९ प्रवासी थोडक्यात बचावले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जेट एअरवेजच्या मुंबईहून औरंगाबाद विमानतळावर उतरलेल्या बोइंग विमानातील १३९ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला. विमानाने सोमवारी सायंकाळी धोकादायक लँडिंग केल्याने पुढील चाक धावपट्टीवर जोरात आदळले. जिवाच्या भीतीमुळे विमानातील प्रवासी सैरावैरा झाले. मात्र, काही क्षणांतच विमान सामान्य स्थितीत आल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यानंतर काही प्रवाशांनी जेटच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला, तर काहींनी तक्रारही केली. जेट प्रशासनाने मात्र याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. 


जेट कनेक्टचे बाेइंग ७३७ हे विमान सायंकाळी ४.५० वाजता औरंगाबाद विमानतळावर येते. आज हे विमान तब्बल १४ मिनिटे आधी म्हणजेच ४.३६ वाजता उतरले. मात्र, विमानाने धोकादायक लँडिंग केली. विमानाचे पुढचे चाक धावपट्टीवर जोरात आदळल्याने मोठा आवाज झाला. विमानात गोंधळ उडाला. काहींच्या हातातील सामान पडले. काही जण सीटवरच अाडवे झाले. अनेकांना मुका मार लागला. लगेच विमान सुस्थितीत आले. मग दार उघडले आणि प्रवाशांनी विमानाबाहेर धाव घेतली. 


वैमानिक कॉकपिटमध्येच 
झालेल्या प्रकारामुळे प्रवासी संतप्त झाले. विमान वेळेआधी लँड झाल्याची उद््घोषणा करण्यात आली. मात्र, विमान प्रवाशांना कायमसाठी वर घेऊन जाणार होते, थोडक्यात बचावलो, अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली. त्यांनी चतुर्वेदी नावाच्या पायलटला बाहेर येण्यास सांगितले. मात्र, त्याने येण्याचे टाळले. अन्य कर्मचाऱ्यांनी प्रवाशांची माफी मागून प्रकरण मिटवले. ५.२० ला विमानाने परतीच्या प्रवासासाठी उड्डाण केले. बाेइंगमध्ये १३९ सीटची क्षमता अाहे. 


प्रवाशाने केली ई-मेलने तक्रार 
या विमानात प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने या घटनेनंतर कंबरदुखीचा त्रास सुरू झाल्याचे सांगितले. त्यांनी जेटकडे ई-मेलद्वारे तक्रार केली. हे लँडिंग भयावह होते. हा तांत्रिक बिघाड होता की कौशल्याचा अभाव, असा प्रश्न त्यांनी मेलमध्ये विचारला आहे. त्यास जेटकडून बातमी लिहीपर्यंत उत्तर मिळाले नव्हते. एवढी गंभीर घटना घडल्यावरही जेट प्रशासन याबाबत अनभिज्ञ होते. 


तक्रार आलेली नाही 
गंभीर प्रकार असेल तर प्रवासी तक्रार करतात. आमच्या कार्यालयात अशी एकही तक्रार आलेली नाही. यात नियमित प्रवास करणारे प्रवासीही होते. कोणीच याबाबत बोललेले नाही. यामुळे असा काही प्रकार झाल्याची माहिती नाही. 
- सईद अहमद जलील, एरिया मॅनेजर, जेट एअरवेज. 

बातम्या आणखी आहेत...