आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा प्रश्न सोडवण्यापेक्षा खैरेंना राजकीय भवितव्य महत्त्वाचे; हर्षवर्धन जाधव यांची घणाघाती टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहराची कचराकोंडी मी फोडत असल्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा उठला. मी एका तालुक्याचा आमदार असताना शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गायरान जमीन दिली. मात्र तेथेही स्वपक्षातील काही जणांनी जाणूनबुजून राजकारण केले. दुपारनंतर कचरा टाकण्यास विरोध केला. आता खासदार चंद्रकांत खैरे यांनीच जिल्ह्यात गायरान जमीन शोधून तिथे कचऱ्याची विल्हेवाट लावावी, असे आव्हान शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिले आहे. शहरापेक्षा खा. खैरेंना त्यांचे राजकीय भवितव्य महत्त्वाचे वाटते, अशी टीका त्यांनी केली. 


मनपाकडून कन्नड तालुक्यातील कोळंबी येथे कचरा टाकण्यात येणार होता. रविवारी दुपारनंतर अचानक ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केल्यानंतर जाधव यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, कालपर्यंत कचरा टाकण्यासाठी तयार असलेली मनपा दुसऱ्याच दिवशी बॅकफूटवर आली. कन्नड तालुक्यातील माझ्या मतदारसंघात कचरा टाकण्यासाठी कोणीही विरोध केला नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसतानाही माघार घेतली. अधिकाऱ्यांना फोन केले तर ते माझा फोनही घेत नाहीत. महापालिकेवरही राजकीय दबाव आणला असावा असे सांगत ही माघार दुर्दैवी असल्याचे जाधव म्हणाले. 


शहरातील कचरा कन्नडला नेत असल्याचे शिवसेना पक्षप्रमुखांना सांगितल्यानंतर त्यांनी मला या कामाबद्दल शाबासकी दिली. मात्र, कन्नडचे शिवसेना तालुकाप्रमुख केतन काजे यांनी ग्रामस्थांना भडकवत विरोध केल्याचा आरोप जाधव यांनी केला. काजे खासदारांचे समर्थक असल्याचे ते म्हणाले. 


इंधनाच्या खर्चातील काही वाटा मी उचलतो 
शिवसेनेचा एक आमदार शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येतो अन् एक तालुकाप्रमुख विरोध करतो, याचा काय अर्थ काढावा, या प्रश्नावर ते म्हणाले, कचऱ्याचा विषय राजकारण करण्याचा नाही तर तो सोडवण्याचा आहे. मी पुढाकार घेतोय हे काहींना रुचले नाही. खासदारांना शहरापेक्षा त्यांचे राजकीय भवितव्य महत्त्वाचे वाटते. माझ्या मतदारसंघातील गायरान नको तर तुम्ही शोधा. मनपाला इंधन खर्च जास्त वाटत असेल तर काही खर्च मी करतो. कुणी विरोध करत असेल तर माझी गाडी सर्वात पुढे ठेवून कचरा टाकण्यासाठी मदत करेन, असे आ. जाधव म्हणाले. 


चार ग्रामपंचायतींचे नाहरकत असतानाही केला विरोध 
शहरातील कचरा टाकण्यास प्रक्रिया केंद्रावर विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे आ. जाधव यांनी पिशोर ग्रामपंचायतीजवळील कोळंबी येथे कचरा टाकण्यासाठी गायरान जमीन देऊन चार ग्रामपंचायतींचे नाहरकत उपलब्ध केले होते. मात्र रविवारी दुपारी २५ ट्रक कचरा टाकल्यानंतर अचानक नागरिकांकडून विरोध सुरू झाला. आधी कुणीही विरोध करणार नसल्याचे जाधव यांनी सांगितल्याने मनपाने इतक्या लांब कचरा नेण्याचे धाडस केले. मात्र तेथेही विरोध झाल्याने मनपाच्या अनेक गाड्या परत आल्या.

बातम्या आणखी आहेत...