आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमाने घटली, तरी 182 एकर जागेचे अधिग्रहण! डीएमआयसीसाठी जागा गरजेचीच; तज्ज्ञांचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जगभरात हवाई वाहतूक क्षेत्रात मोठी वाढ होत असतांना औरंगाबादेत ६ वर्षात विमान संख्या ९ वरून ५ वर आली आहे. दुसरीकडे डीएमआयसी नजरेसमोर ठेवून चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ६०० कोटी रुपये खर्चून १८२ एकर जागा (सध्या ५५७ एकर उपलब्ध) अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. १०० कोटी खर्च झालेल्या या विमानतळाच्या आधुनिकीकरणाचे उद््घाटन २१ नोव्हेंबर २००८  रोजी झाले. पहिल्याच दिवशी हज यात्रेकरूंना घेऊन एक विमान जेद्दाहला उडाले. तेव्हा अनेक आंतरराष्ट्रीय शहरे लवकरच औरंगाबादशी जोडली जातील, अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली. 


नाइट पार्किंगला प्रतिसाद नाही

मोठ्या विमानतळावर गर्दी झाल्यावर औरंगाबादसारख्या विमानतळावर रात्रीची पार्किंग होते. त्यासाठी कंपन्या घसघशीत रक्कम देतात. शिवाय पार्किंगसाठी येताना आणि जाताना स्वस्तात प्रवासी आणले जातात. येथील विमानतळावर एका वेळी ४ विमाने पार्क होऊ शकतात. २ ठिकाणी एअरोब्रिज आहेत. नाइट सिक्युरिटी, धावपट्टीवर आणि हँगर्स आहेत. विमानाचे रात्रीतून मेंटेनन्स करण्यासाठी खास वर्कशॉप, इंजिनिअर, मेकॅनिकची व्यवस्था विमान कंपन्यांनी करावी असे प्राधिकरणाला वाटते. मात्र, विमान कंपन्यांना ते मान्य नाही. पार्किंगच्या रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत औरंगाबादेत येण्यासाठी प्रवासी कमी मिळाले तरी पंचतारांकित हॉटेलातच वैमानिक, केबिन क्रूच्या निवासाची सोय करावी लागते. हा खर्च परवडण्याजोगा नसल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.


परिणामी फक्त नुकसान

आहे त्या क्षमतांचा वापर न झाल्याने, अव्वाच्या सव्वा खर्च आणि उत्पन्नाची तोकडी साधने अशा कात्रीत सापडलेल्या विमानतळावर प्राधिकरणाचे १२५ तर अग्निशामक, एटीसी, एअरलाइन्स, सीआयएसएफ, कमर्शियल या विभागात ४०० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. वीज बिलापोटी दरमहा ७५ ते ९० लाख, सीआयएसएफच्या सुरक्षा यंत्रणेसाठी ७५ ते ८० लाख रुपये खर्च येतो. शिवाय देखभाल-दुरुस्ती आदींवर खर्च होतोच. त्यामुळे प्राधिकरणाला वर्षाकाठी तब्बल ३५ ते ३९ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. 


हे आहेत उपाय

सीएमआयए संघटनेचे माजी अध्यक्ष आशिष गर्दे म्हणाले की, विमानतळावर 
रिपेअर्स-मेंटेनन्स-ओव्हरआॅइलिंग सेवा, चार्टर फ्लाइट्स उतरण्यासाठी प्रोत्साहन मिळावे. पायलट ट्रेनिंग, केबिन क्रू, ग्राउंड स्टाफ आणि अन्य कुशल मनष्यबळ पुरवणारी 
प्रशिक्षण संस्था सुरू करावी. एअर शो, फ्लाइंग क्लबसारखे उपक्रम सुरू करावेत.  डीएमआयसीचा भविष्यातील विस्तार लक्षात घेता १८२ एकर जागा अधिग्रहित करणे 
गरचेचेच आहे. 

 

विमान संख्या घटली 
२००८ पूर्वी औरंगाबादेतून दिल्लीसाठी १ तर मुंबईसाठी ४ विमानोड्डाण होते. २०११ मध्ये दिल्लीसाठी दोन तर किंगफिशरने हैदराबाद आणि स्पाईस जेटने त्रिवेंंद्रमपर्यंत सेवा सुरू केल्यामुळे ही संख्या ९ पर्यंत गेली होती. ती आता प्रवाशांअभावी पाचवर आली आहे. ५ विमानातून दररोज सुमारे १ हजार तर वर्षाकाठी ३.५ लाख प्रवासी प्रवास करतात. 

 

 

उडानसाठी प्रतिक्षा 
केंद्राच्या उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात औरंगाबादचा समोवश झाल्यास येथील विमानाची संख्या वाढू शकते. प्रत्यक्षात उडान योजनेलाच अपेक्षीत यश मिळत नसल्याने याचा पुढील टप्पाही लांबला आहे.

 

कार्गो लांबले 
विमानतळावर १ जून २०१५ पासून एअर कार्गाे सेवेला सुरूवात झाली. तर डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय कार्गाे सेवा सुरू होणार होती. अर्धा महिना उलटत आला तरी सेवा सुरू होण्याचे चिन्ह नाही.

बातम्या आणखी आहेत...