आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
श्रीरामपूर- येथील राेहिणी नाडगौडा यांच्या हत्येप्रकरणी संजय भिकाजी कापडे यास जन्मठेपेची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यू. बघेले यांनी शुक्रवारी ठोठावली. सतीश नागरे या आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
नगररचना विभागातील अधिकारी पांडुरंग नाडगौडा खिलारी वस्ती परिसरात रहात होते. त्यांची मुलगी गायत्री शहरातील एका टॅक्स कन्सलटंटकडे नोकरी करत होती. आरोपी संजय कापडे फर्निचरचे काम करत असे. घरातील फर्निचरचे काम करण्यासाठी नाडगौडा यांनी त्याला बोलावले होते. नंतर कापडे काही वेळा त्यांच्या घरी येत असे. ८ मार्च २०१६ रोजी नाडगौडा व त्यांची मुलगी गायत्री नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. सायंकाळी सहा वाजता ते घरी गेले. त्यांनी आवाज देऊनही दरवाजा उघडला नाही. कडी बाहेरून लावल्याचे लक्षात आल्यानंतर ती उघडून ते आत गेले असता पत्नी रोहिणी बेडरूममध्ये मृतावस्थेत आढळली. गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, कपाटातील दागिन व मोबाइल चोरीस गेल्याचे दिसले.
नाडगौडा यांनी याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रारंभी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरी व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी पाळदे यांनी याप्रकरणाचा तपास केला. मोबाइल फोनच्या आयएमईआय क्रमांकावरून गुन्हा उघडकीस आला. चोरीस गेलेला मोबाइल आरोपी कापडे याच्या पत्नीकडे मिळाला. चौकशी केली असता चोरीतील सोने सतीश नागरे याला विकल्याची कबुली कापडे याने दिली.
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश बघेले यांच्यासमोर झाली. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. भानुदास तांबे व अॅड. प्रसन्न गटणे यांनी २२ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने परिस्थितीजन्य पुराव्यांवर खटला चालला. मृताच्या चोरीस गेलेल्या मोबाइलमुळे गुन्ह्याची शृंखला स्पष्ट झाली. चोरलेले सोने सराफ सचिन अहिरराव याला विकले होते. त्याने ते वितळून सोन्याची लगड केल्याचे पोलिसांना सांगितले. रोहिणी यांच्या कानातील टॉप्स त्याने काढून दिले. ते पांडुरंग नाडगौडा व त्यांची मुलगी गायत्री हिने ओळखले.
आरोपी कापडे याला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हा कसा, कधी, कुठे केला, हत्यार कसे उपलब्ध झाले याची घटनास्थळी जाऊन पोलिसांना माहिती दिली. त्याचे व्हीडीओ चित्रीकरण करण्यात आले होते. तो पुरावाही महत्त्वाचा ठरला.
न्यायाधीश बघेले यांनी आरोपी संजय कापडे याला खूनप्रकरणात मरेपर्यंत जन्मठेप व एक लाखाचा दंड, दंड न भरल्यास तीन वर्षे कैद, तसेच जबरी चोरीप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षे शिक्षा अशी शिक्षा सुनावली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.