आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती माेर्चाला हिंसक वळण; बीडसह परळी, परभणीत दगडफेक, लातुरात १४५ आमदार मृत घोषित केले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड जिल्ह्यात परळी येथे जमावाने फोडलेल्या एसटी महामंडळाच्या दोन बसगाड्या. - Divya Marathi
बीड जिल्ह्यात परळी येथे जमावाने फोडलेल्या एसटी महामंडळाच्या दोन बसगाड्या.

औरंगाबाद- मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठवाड्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाने शुक्रवारी हिंसक वळण घेतले. परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात आंदोलनाला हिंसक वळण लागले. तर बीड जिल्ह्यात अंबाजोगाईसह परळी, माजलगाव, केज या तालुक्यात अज्ञातांनी सहा बसेसवर दगडफेक केली. माजलगाव येथे जमाव हिंसक झाल्याने तो पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करत सौम्य लाठीमार करावा लागला. आंदोलकांनी लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर तुफान दगडफेक केली. नांदेडमध्ये संभाजी ब्रिगेडने स्थानिक पाच आमदारांच्या नावांचे पुतळे जाळले. परभणीत जमावाने एसटी महामंडळाच्या चार बसेस फोडल्या. त्यामुळे सायंकाळपर्यंत बस वाहतूक थांबवण्यात आली होती. 


बीड जिल्ह्यात सहा बसेस फोडल्या 
मराठा क्रांती मोर्चातर्फे परळीत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा ठोक मोर्चाच्या समर्थनार्थ शुक्रवारी माजलगाव शहराजवळील परभणी फाटा येथे सर्वपक्षीयांच्या वतीने तीन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मुंडण करून सरकारचा निषेध केला. 


परळी तालुक्यातील दगडवाडी पुलाजवळील कॅनाॅलवर गुरुवारी सायंकाळी लातूर-परभणी बसवर दगडफेक झाली. तर धर्मापुरी फाट्याजवळ पंढरपूर- गंगाखेड बसच्या समोरील व पाठीमागील काचा फोडल्या. लोखंडी सावरगाव येथे संभाजी चौकाजवळ गुरुवारी २.१५ वाजता सहा जणांनी दगडफेक करून करत अमरावती - पंढरपूर ही बस फोडली. परळी बस स्थानकातून शुक्रवारी धर्मापुरीकडे निघालेली परळी - धर्मापुरी बस कासारवाडी फाट्यावर आली असता अज्ञातांनी दगडफेक केली. तर सिरसाळामार्गे सोनपेठ-पिंपरी ही परळी आगाराची बस कौडगाव पाटीजवळ फोडण्यात आली. अंबाजोगाई - लातूर मार्गावरील बर्दापूर फाटा येथे रस्त्यावर टायर पेटवण्यात आले. केज येथील कानडी चौकात शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता आंदोलकांनी कळंब आगाराच्या बसची समोरील काच फोडली. माजलगाव तालुक्यातील केसापुरी येथे रस्ता रोको दरम्यान कारवर दगडफेक करण्यात आली. 


परभणीत चार बसेसवर जमावाची दगडफेक 
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर परभणीत वसमत रोडवर सकाळी अकरा वाजल्यापासून जोरदार घोषणाबाजी करत एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली. सावली विश्रामगृहासमोर हिंगोली आगाराच्या हिंगोली ते परभणी बसवर (एम.एच.२०-बी.एल.२३१८) वर दगडफेक करत समोरील बाजूच्या काचा फोडल्या. त्या पाठोपाठ शिवशक्ती अपार्टमेंटसमोर एका बसवर दगडफेक करण्यात आली. दुपारी १२ च्या सुमारास शिवाजी महाविद्यालयासमोर वसमत आगाराच्या परभणी ते वसमत बसवर दगडफेक केली. दुपारी एकच्या सुमारास परभणी-जिंतूर बसवर विसावा कॉर्नर येथे दगडफेक केली. 


तुळजापुरात दगडफेक
परळीमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांना समर्थन देण्यासाठी गेलेल्या तरुणांना तुळजापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी तुळजापुरात शुक्रवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. शहर बंद ठेवण्यात आले. यावेळी एका बसवर दगडफेकही झाली. 


नांदेडमध्ये स्थानिक पाच आमदारांचे पुतळे जाळले 
नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारपासून परळीच्या धर्तीवर ठिय्या मोर्चा आंदोलन सुरू करण्यात आले. मराठा आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यँत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. शुक्रवारी शिवाजी पुतळा चौकात संभाजी ब्रिगेडतर्फे स्थानिक आमदार आमदार हेमंत पाटील, डी.पी.सावंत, वसंत चव्हाण, नागेश पाटील आष्टीकर, राम पाटील रातोळीकर आदी आमदारांच्या पुतळ्याचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. 


लातुरात १४५ आमदार मृत घोषित केले 
लातूर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी लातूरच्या तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. काही तरुणांनी सरकारच्या निषेधार्थ मुंडन केले. मराठा समाजाच्या प्रश्नावर आवाज उठवण्याऐवजी १४५ मराठा आमदार मौन पाळत असल्याचा आरोप करीत त्यांना मृत घोषित करून प्रतीकात्मक श्रद्धांजलीही वाहिली. आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. वाहतुकीची कोंडी होत असल्याने आंदोलन स्थळी बॅरिकेड्स लावण्यात आले. त्यास जोरदार विरोध होताच पोलिसांनी हे बॅरिकेड्स हटवले. दरम्यान, आंदोलनस्थळी शुक्रवारी दुपारी एका बसवर दगडफेक करण्यात आली. बसची समोरील काच फुटली. 

बातम्या आणखी आहेत...