आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पांना 1 हजार 23 काेटी रुपयांचा निधी, 14 प्रकल्‍पांना मिळेल गती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - महाराष्ट्र शासनाच्या ‘बळीराजा जलसंजीवनी’ योजनेअंतर्गत राज्यातील दुष्काळग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील जलसिंचन प्रकल्पांसाठी केंद्र शासनाकडून १३ हजार ६५१.६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत या सर्व प्रकल्पांचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी नवी दिल्लीत दिली.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कॅबिनेट आर्थिक प्रकरणांच्या समितीने मराठवाडा व विदर्भातील दुष्काळप्रवण भागांतील ८३ लघुसिंचन आणि ८ मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या बैठकीनंतर परिवहन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत  गडकरी यांनी ही माहिती दिली. ‘बळीराजा जलसंजीवनी’ योजनेसाठी केंद्रीय कॅबिनेटने मंजूर केलेल्या निधीपैकी केंद्र शासनाकडून ३ हजार ८३१ कोटी रुपये  केंद्राकडून तर उर्वरित ९ हजार ८२० कोटी रुपये नाबार्डकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, सांगलीचे खासदार  संजयकाका पाटील व भिवंडीचे खासदार कपिल पाटील यावेळी उपस्थित होते.
राज्यात ८ मोठ्या व मध्यम प्रकल्पांसाठी ९,५२१ कोटी  : राज्यातील ८ मोठ्या व मध्यम प्रकल्पांसाठी ९ हजार ५२१ कोटी १३ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. यात सांगली जिल्ह्यातील टेंभू प्रकल्प, सातारा जिल्ह्यातील उर्मोडी, धुळे जिल्ह्यातील सुलवाडे-जांफळ, जळगाव जिल्ह्यातील शेळगाव आणि वरखेड-लोंढे, अकोला जिल्ह्यातील घुंगशी आणि पूर्णा बॅरेज, बुलडाणा जिल्ह्यातील जीगाव या जलसिंचन प्रकल्पांचा समावेश आहे.  

 

४ वर्षांत राज्यातील प्रकल्पांसाठी १ लाख १५ हजार कोटी निधी
- अर्धवट प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी गेल्या ४ वर्षांत केंद्राने १ लाख १५ कोटींचा निधी दिला . राज्यात ११ लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील २६ प्रकल्पांसाठी ४० हजार कोटी, पिंजाळ-दमनगंगा आणि तापी-पार-नर्मदा या नदीजोड प्रकल्पांसाठी ७५ हजार कोटी आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेसाठी १३ हजार ६५१ कोटींचा निधी देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...