आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या मेकुनू वादळाचा महाराष्ट्राला इशारा, मान्सूनला धोका नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -  अरबी समुद्रात नैऋत्येला निर्माण झालेले मेकुनू चक्रीवादळ आता येमेन आणि ओमानच्या दिशेने वेगाने सरकत आहे. शनिवारी ते दक्षिण येमेनच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी)वर्तवली आहे. या काळात अरबी समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला   आहे. या वादळाच्या प्रभावामुळे दक्षिण महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा भागात आकाशात ढगांची गर्दी होण्याची शक्यता आहे.


अरबी समुद्रात निर्माण झालेल्या मेकुनू वादळाने पश्चिम-मध्य अरबी समुद्रात १४५ ते १५५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून नैऋत्य अरबी समुद्रात वाऱ्याचा वेग ताशी १७५ िकमी होऊ शकतो. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळच्या मच्छीमारांनी २४ मे ते २६ मे दरम्यान समुद्रात जाऊ नये, असा इशारा आहे. तशी सूचना देणारा २ नंबरचा बावटा या किनाऱ्यांवर लावला आहे. वादळामुळे केरळमध्ये मान्सूनच्या आगमनावर फारसा परिणाम होणार नसल्याचे हवामानतज्ज्ञांनी म्हटले आहे.

 

मेकूनू म्हणजे मासा
मेकुनू हे नाव मालदीव देशाने दिले आहे. तेथील दिवेही भाषेतील हे नाव आहे. समुद्रात सापडणारा मुलेट मासा म्हणजे मेकुनू. मालदीवच्या समुद्रात तो आढळतो. त्यावरून हे नाव या वादळाला दिले. हे या हंगामातील सागर नंतरचे दुसरे वादळ आहे. यानंतर येणाऱ्या वादळाचे नाव डाये असून ते म्यानमारने दिले आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...