आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमएलसीची नोंद आता ऑनलाइन, हॉस्पिटल देणार थेट पोलिस आयुक्तालयाला माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- आतापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद होणारी एमएलसी (मेडिको लीगल केस) आता ऑनलाइन पद्धतीने दवाखान्यातून आयुक्तालयातील सायबर विभागात वर्ग होईल. त्यानंतर ती पोलिस ठाणेनिहाय वाटप होणार आहे. मनुष्यबळ वाचवणे आणि कामात अचूकता आणण्यासाठी शहर पोलिसांनी शुक्रवारपासून हा उपक्रम सुरू केल्याची माहिती आयुक्तालयाच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली. 


१७ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सुमारे ७० पेक्षा अधिक हॉस्पिटल्स आहेत. येथे दररोज अपघात, आत्महत्या, खून, लैंगिक अत्याचार, विषबाधा आदींचे रुग्ण येतात. त्यांची नोंद घेऊन स्थानिक पोलिसांना माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकदा मनुष्यबळाअभावी ही माहिती पोलिस ठाण्यापर्यंत येण्यास उशीर होतो. त्यामुळे कारवाईस विलंब होतो. म्हणून आता पोलिस आयुक्त कार्यालयात असलेल्या सायबर विभागात सर्व हॉस्पिटलचे प्रतिनिधी ई-मेलद्वारे एमएलसी पाठवतील. त्यानंतर हे मेल संबंधित पोलिस ठाण्यांना पाठवण्यात येतील. घाटीतील एमएलसीसाठीही अशीच यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. १७ पोलिस ठाणी आणि घाटी मिळून शहरात रोज किमान १०० एमएलसी नोंदवल्या जातात. 


आतापर्यंत काय होती पद्धत

तपास करण्यासाठी किंवा न्यायालयीन कामकाजात पुरावा म्हणून एमएलसीला खूप महत्त्व आहे. आतापर्यंत घाटीत नोंद होणारी एमएलसी त्याच ठिकाणी असलेल्या पोलिस चौकीत जमा होत होती. तेथील पोलिस फोनद्वारे संबंधित ठाण्याला याची माहिती देत. तर खासगी रुग्णालयात नातेवाईक किंवा हॉस्पिटलचे कर्मचारी पोलिस ठाण्यात कागदपत्रे नेऊन देत असत. अनेकदा ही माहिती पोलिसांपर्यंत उशिरा पोहोचत असे. त्यामुळे जबाब नोंदवण्याच्या प्रक्रियेत विलंब होणे, कधी एमएलसीची नोंदच न होणे असे प्रकार घडत होते. 

 

तत्काळ नोंद होईल 
रुग्णालयात दाखल केल्यानंतर तत्काळ एमएलसी नोंदवणे अपेक्षित आहे. ऑनलाइन सुविधा सुरू झाल्यानंतर कारवाईला गती मिळेल. अनेक घटनांत आम्हाला डॉक्टरांकडून उशिरा माहिती मिळाली, असे पोलिसांकडून सांगण्यात येते होते. आता ही सबब चालणार नाही, अशी माहिती अॅड. अविनाश बांगर यांनी दिली. 


मनुष्यबळावरील ताण कमी 
एमएलसीची नोंद ऑनलाइन झाल्यामुळे हॉस्पिटलच्या मनुष्यबळावरील ताण कमी होईल. शिवाय पोलिसांपर्यंतही लवकर माहिती पोहोचवली जाईल, असे मत हर्सूल येथील आयुष हॉस्पिटलचे डॉ. वैभव बावस्कर यांनी व्यक्त केले. तर ऑनलाइन पोहोच मिळावी, असे सिद्धिविनायक अपघात रुग्णालयाचे डॉ. रमेश शेळके म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...