आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात पावसाचे असमतोल वितरण; परभणी, हिंगोलीत जोरदार हजेरी, बीडकडे पाठ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यात पावसाचे असमतोल वितरण होत आहे. त्यामुळे काही भागात आनंदाचे तर काही भागात अजूनही चिंतेचे वातावरण आहे. गेल्या आठ दिवसांपासून नांदेड, परभणीसह जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची हजेरी लागलेली असताना बीडसह लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काही ठिकाणीच पावसाने हजेरी लावली आहे. बीड जिल्ह्याकडे तर पावसाने आठ दिवसांपासून पाठ फिरवली आहे. 


यंदाच्या हंगामात परभणी जिल्ह्यात सोमवारी (दि.१६) जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या जोरदार पावसानंतर दररोजच मध्यम स्वरूपात पाऊस हजेरी लावत असून शुक्रवारीही (दि.२०) दुपारी चार वाजता सुरू झालेल्या पावसाने एक तास जोरदार हजेरी लावली. मागील आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता असताना केवळ दररोज ढगाळ वातावरण राहत होते. भुरभुर व रिमझिम स्वरूपात हा पाऊस पडत होता. त्यामुळे वातावरण पावसाळी असले तरी मोठ्या पावसाची जिल्ह्याला प्रतीक्षा होती. त्यादृष्टीने हा चालू आठवडा पावसाच्या आगमनाने सुखावह करणारा ठरला आहे. शुक्रवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. रिमझिम स्वरूपात सुरू झालेला पाऊस काही वेळातच मध्यम स्वरूपात पडण्यास सुरुवात झाली. शहरात ठिकठिकाणी पाणी साचून नाल्यामधून रस्त्यावर पाणी आले. सायंकाळी उशिरापर्यंत हलक्या स्वरूपात पाऊस सुरूच होता. या आठवड्यात पिकांसाठी समाधानकारक पाऊस झाला आहे. 


नांदेडमध्ये दमदार पाऊस

शहरात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला दमदार पावसाने हजेरी लावली. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने वातावरणात उकाडा वाढला होता. त्यानंतर आज दमदार पावसाचे आगमन झाले. सायंकाळच्या सुमाराला सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. जवळपास अर्धा तास दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाचा जोर ओसरला. 


जूनच्या पहिल्या पंधरवड्यात तीन दिवस पाऊस 
६६६.३६ मिमी पावसाची वार्षिक सरासरी असलेल्या बीड जिल्ह्यात १९ जुलैपर्यंत १९३.४४ मिमी इतका म्हणजेच २९ टक्के पाऊस झाला आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ तीन दिवस पाऊस झाला.त्यानंतर २३ व २४ जुलै दरम्यान जिल्ह्यातील काही मंडळात अतिवृष्टी झाली. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवली असून गत आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण राहूनही पाऊस गायब झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत अंबाजोगाई तालुक्यात ३९.७ टक्के, केज तालुक्यात ३९ टक्के, पाटोदा तालुक्यात ३२.१ टक्के असा पाऊस झाला आहे. सर्वात कमी पाऊस गेवराई तालुक्यात झालेला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ २० टक्केच पावसाची नोंद आहे. 


हिंगोलीत रिमझिम पावसाचे आगमन 
हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथे शुक्रवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या लखलखाटासह जोरदार पाऊस पडला. यात अंगावर वीज पडल्याने शशिकला गव्हाले (५५) ही महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे पी. आय.रवींद्र सोनवणे यांनी सांगितले. तीन दिवसांच्या थोड्या फार विश्रांतीनंतर जिल्हाभरात पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली.

बातम्या आणखी आहेत...