Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Monsoon rains likely to take 8 days nationwide, weather forecast

मान्सून अाजपासून देशभरात 8 दिवस ब्रेक घेण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

अजय कुलकर्णी | Update - Jun 12, 2018, 05:19 AM IST

मान्सून १२ जूननंतर आठवडाभराचा ब्रेक घेण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

 • Monsoon rains likely to take 8 days nationwide, weather forecast

  औरंगाबाद - मान्सून १२ जूननंतर आठवडाभराचा ब्रेक घेण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून त्याची उत्तरेकडील सीमा मुंबई, ठाणे, नगर, बुलडाणा, अमरावती व गोंदिया अशी आहे. औरंगाबादसह उत्तर महाराष्ट्रात मान्सून अद्याप दाखल झाला नसून १२ जूनपर्यंत तो पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. १२ जूननंतर मान्सूनमध्ये एक आठवड्याचा ब्रेक लागण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. अरबी समुद्रातील वातावरणीय बदलांमुळे पावसात खंड पडण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.


  भारतीय हवामान खात्यानुसार, सोमवारी मान्सूनने प्रगती करत मराठवाड्याचा आणखी भाग, विदर्भ, छत्तीसगड, वायव्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, आसाम आणि मेघालयाचा काही भाग अशी मजल मारली. महाराष्ट्रात मुंबईसह ठाणे, नगर, बुलडाणा, अमरावती, गोंदिया अशी मान्सूनची उत्तर सीमा आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत मान्सून आणखी पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती अाहे. मात्र, १२ जूननंतर मोसमी वाऱ्यांचा जोर काहीसा कमी होऊन मान्सून एक आठवडा थंडावण्याची शक्यता आहे.

  मान्सून १२ जूननंतर थंडावण्याची शक्यता आहे. यासंदर्भात ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले, समुद्राच्या पाण्याचे तापमान कमी झाल्याने हा खंड पडण्याची शक्यता आहे. विशेषत: अरबी समुद्रातील पाणी काही प्रमाणात थंड झाले आहे. परिणामी मोसमी वाऱ्यातून वाहणारे बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने मान्सून थंडावणार आहे.

  १) काही हवामानतज्ज्ञांच्या मते, उत्तर अरबी समुद्रात प्रत्यावर्त (अँटी सायक्लोन) स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वायव्य दिशेने भारतात मोठ्या प्रमाणात कोरडे वारे येत आहेत. येत्या आठवड्यात ही स्थिती मान्सूनसाठी अडथळा ठरणार आहे.

  २) यंदा उत्तर भारतात आलेले पश्चिमी विक्षोम (वेस्टर्न डिस्टर्बन्स) हेही यासाठी कारणीभूत आहेत. दरवर्षी एप्रिल ते मे या काळात २ ते ४ वेस्टर्न डिस्टर्बन्स येतात. यंदा ही संख्या १३ ते १४ च्या पुढे आहे. त्यामुळेही मान्सूनला अडसर निर्माण होत आहे.

  ३) मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा यामुळे मंदावणार अाहे. त्यामुळे महाराष्ट्रातून उत्तर भारताकडे होणारी मान्सूनची वाटचाल रेंगाळण्याची शक्यता आहे.
  ४) मान्सूनची बंगालच्या उपसागरातील शाखा बऱ्यापैकी सक्रिय राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

  मान्सूनचा खंड कुठे?
  स्कायमेटच्या अंदाजानुसार, पावसातील खंडाचा सर्वात जास्त परिणाम दक्षिण आणि मध्य भारतावर होईल. मध्य भारतात १३ जूनपर्यंत काही ठिकाणी हलका पाऊस व नंतर एक आठवडा कोरडे हवामान राहील. या काळात दक्षिण गुजरातेत काही हलक्या सरी बरसतील. दक्षिण भारतातही अशीच स्थिती राहील. उत्तर आणि ईशान्य भारतात काही प्रमाणात पाऊस होईल.

  पुढील स्‍लाइडवर..मराठवाड्यात २५ मंडळात अतिवृष्टी...

 • Monsoon rains likely to take 8 days nationwide, weather forecast

  नांदेड जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये झाली अतिवृष्टीची नोंद

  मराठवाड्यात सोमवारी पावसाने २५ तालुक्यांत २५ मिमीहून जास्त पाऊस झाला. ४ तालुक्यांसह एकूण २५ मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये वजिराबाद मंडळात सर्वाधिक ९५ मिमी इतका पाऊस झाला. भोकर तालुक्यात ९२ मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात नांदेड  जिल्ह्यात सर्वाधिक ४९, परभणी जिल्ह्यात २८ मिमी पावसाची नोंद झाली.
  मराठवाड्यात सरासरी १०६ मिमी  :
  गेल्या ४ दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आतापर्यंत मराठवाड्यात सरासरी १०६  मिमी इतका पाऊस झाला आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात कमी केवळ १९ मिमी पाऊस झाला असून  नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक सरासरी १७१ मिमी इतका पाऊस झाला आहे.

   

  औरंगाबाद जिल्ह्यात किरकाेळ : औरंगाबाद जिल्ह्यात केवळ १९ मिमी पाऊस झालेला आहे. वैजापूर तालुक्यात ३७, औरंगाबाद ३६, पैठण ३५, फुलंब्री ३१, गंगापूर-खुलताबाद २ मिमी, गंगापूर ६, कन्नड ७, सिल्लोड ०७ आणि सोयगावात १० मिमी पाऊस झालेला आहे.

Trending