आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमजेओ अनुकूल, मान्सून २३ जूनपासून पुन्हा सक्रिय होणार; महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नऊ जूनपासून महाराष्ट्रात मुक्कामी आलेला आणि राज्यावर रुसलेला मान्सून शनिवारपासून (२३ जून) पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवलेल्या अंदाजानुसार, विषुववृत्ताकडून येणारे माेसमी वारे आणि मॅडेन ज्युलियन ऑसिलेशन (एमजेओ) आता अनुकूल होणार असून रखडलेला मान्सून येत्या दोन-तीन दिवसांत सक्रिय होण्याची शक्यता आहे. शनिवारपासून मान्सून देशभरात सक्रिय होण्याची शक्यता त्यामुळे दुणावली आहे. 


यंदा निर्धारित वेळेच्या दोन दिवस २९ मे आधीच केरळात दाखल झालेल्या मान्सूनने नंतर महाराष्ट्रापर्यंत वेगाने वाटचाल केली. तळकोकणात ८ जूनला पोहोचलेल्या मान्सूनने ९ जूनपर्यंत मुंबईसह मराठवाडा, विदर्भ व्यापला. त्यानंतर मात्र मान्सूनची प्रगती रखडली. आठ दिवसांपासून मान्सूनची उत्तर सीमा मुंबई, ठाणे, नगर, बुलडाणा, अमरावती, गोंदिया, तितलागड, कटक, मिदनापूर अशी कायम आहे. या काळात मान्सूनच्या बंगालच्या उपसागरातील शाखेने ईशान्येकडे थोडी प्रगती केली. मात्र, महाराष्ट्रात आठ दिवसांपासून मुक्कामी असलेल्या मान्सूनचा राज्याला फारसा फायदा झालेला नाही. येत्या दोन-तीन दिवसांत मान्सूनला वेग देण्यास अनुकूल स्थिती निर्माण होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. 


मान्सून रखडल्याची चार प्रमुख कारणे 
आयएमडीच्या मते, मान्सूनच्या वाटचालीत अडथळा येण्यामागे चार प्रमुख कारणे आहेत. 
१ विषुववृत्ताकडून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांचा अभाव 
२ वायव्य प्रशांत महासागर भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. बाष्प मोठ्या प्रमाणात तिकडे खेचले गेले. 
३ मॅडेन ज्युलियन ऑसिलेशन सक्रिय (एमजेओ) झाले, मात्र ते मध्य व पूर्व प्रशांत महासागराकडे झुकले, त्यामुळे भारतीय उपखंडातील मान्सूनचा जोर कमी झाला. 
४ विषुववृत्ताजवळील पूर्व प्रवाह मध्य व पूर्व प्रशांत महासागर, पश्चिम गोलार्ध आणि आफ्रिकेकडे झुकलेला असल्याने भारतीय उपखंडातील मान्सूनवर परिणाम झाला. 

 

एमजेओ, विषुववृत्तीय प्रवाह अनुकूल 

भारतीय मान्सूनवर परिणाम करणारे एमजेओ तसेच विषुववृत्तावरून वाहणारे वारे येत्या दोन ते तीन दिवसांत अनुकूल होणार आहेत, त्यामुळे आयएमडीच्या मते २४ जूनपासून मान्सून चांगला सक्रिय होण्याची शक्यता आहे. 


पुणे वेधशाळेचा अंदाज : राज्यात पावसाचा इशारा 
२० जून : दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार, मराठवाडा-विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस. २१ जून : विदर्भ, मराठवाडा, म. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार. २२ जून : कोकण-गोव्यात जाेरदार, मराठवाड्यात तुकळक ठिकाणी मुसळधार. २३ जून : मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस. 


एमजेओमुळे मान्सूनला खोडा 
- १९७१ मध्ये रोनाल्ड मॅडेन आणि पॉल ज्युलियन या अमेरिकन हवामानतज्ज्ञांनी याचा शोध लावला. त्यावरून त्याला हे नाव दिले. 
- साधारणपणे विषुववृत्तानजीकचे ढग, पर्जन्य, वारे आणि दाब यांचे पूर्व दिशेला वहन करणारी नाडी म्हणजे एमजेओ. मान्सूनच्या काळात एमजेओ जर हिंदी महासागरात असेल तर भारतीय उपखंडात चांगला पाऊस पडतो. एमजेओ साधारणपणे ३० ते ६० दिवसांचे एक चक्र असते. 
- भारतीय मान्सूनवर परिणाम करणाऱ्या अल निनो, ला निना, इंडियन ओशन डायपोल (आयओडी ) इतकेच महत्त्व एमजेओला आहे. मान्सूनचा पॅटर्न रिव्हर्स करण्याची ताकद एमजेओमध्ये असते. 

-एमजेओ अर्थात मॅडेन ज्युलियन ऑसोलेशन हा नैऋत्य मान्सूनच्या हालचालीवर परिणाम करणारी सागरी-हवामानविषयक घटना आहे. एमजेओचा परिणाम जागतिक हवामानवर होतो. 

बातम्या आणखी आहेत...