आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक रविवारी येणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कचराकोंडीत अडकलेल्या तमाम औरंगाबादकरांचे लक्ष लागून असलेले नूतन आयुक्त डॉ. निपुण विनायक रविवारी (१३ मे) शहरात येणार आहेत. लवकर पोहोचले तर रविवारीच किंवा सोमवारी ते आयुक्तपदाचा पदभार स्वीकारतील. अजून पदभार स्वीकारला नसला तरी कचराकोंडी संपवण्यासाठी जी कामे करायची आहेत त्यातील यंत्र खरेदी थेट करू नका, निविदा प्रक्रियेद्वारेच करा, अशी सूचना त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना केली आहे. 


१५ मार्चला तत्कालीन आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली झाली. तेव्हाच डॉ. निपुण यांच्याकडे पुढील जबाबदारी असेल असे राज्य शासनाने स्पष्ट केले होते. मात्र, वैयक्तिक काम तसेच विधीची परीक्षा असल्याने मी १० मेनंतरच रुजू होईन, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. कचराकोंडी तीव्र असतानाही शासनाने त्यांची ही अट मान्य केली. कारण डॉ. निपुण हे घनकचरा व्यवस्थापनात 'निपुण' आहेत. त्यांनी आतापर्यंत जेथे काम केले तेथील शहरे कचरामुक्त केली आहेत. ५ मेपर्यंत डॉ. निपुण यांची परीक्षा होती. त्यामुळे महापौर घोडेले यांनी सोमवारी त्यांच्याशी संपर्क साधला. केव्हा येणार हा पहिलाच प्रश्न होता. तेव्हा माझी कामे शनिवारपर्यंत संपत आहेत. 


रविवारी मी औरंगाबादेत येतोय, असे त्यांनी स्पष्ट केले. केवळ आयुक्त नसल्याने तातडीने २७ लाखांची यंत्र खरेदी करणे अशक्य झाल्याचे महापौरांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा यंत्रे निविदा प्रक्रियेद्वारेच खरेदी करा, असे त्यांनी सांगितले. कारण हा निधी शासनाने दिला आहे. शासनाकडून जेव्हा लेखापरीक्षण होईल तेव्हा अडचणी वाढतील, असे त्यांनी स्पष्ट केले. डीपीआरमधील नियमानुसारच त्यातील साहित्य, यंत्रांची खरेदी झाली पाहिजे, असा डॉ. निपुण यांचा आग्रह होता. त्यामुळे लगेच २७ यंत्र खरेदीसाठी तिसऱ्यांदा निविदा जारी करण्यात आल्या. यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात आला असून त्यानंतर एक ठेकेदार जरी आला तरी यंत्रे खरेदी करता येऊ शकतील. 

बातम्या आणखी आहेत...