आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: २०१३४ विद्यार्थी प्रावीण्य, तर २३७९१ प्रथम श्रेणीत, गेल्या वर्षीपेक्षा यंदा प्रथम श्रेणीतील संख्या कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालातही मुलींनी आपल्या यशाचा डंका कायम राखला असून, औरंगाबाद विभागात ९२.२३ टक्के मुली आणि ८६.२७ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातून ९३.६८ टक्के मुली आणि ८८.६६ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ९०.८५ टक्के आहे. जिल्ह्यातील २०१३४ विद्यार्थी प्राविण्य तर २३७९१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उतीर्ण, ५४१९ विद्यार्थ्यांना कला व क्रीडा गुणांचा फायदा मिळाल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या वर्षी १५८३१ प्राविण्य श्रेणीत, २४२५० प्रथम श्रेणीत तर १५३३१ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांच्या संख्येत ४५९ ने घट झाली आहे. 


दहावीच्या परीक्षेला यंदा औरंगाबाद जिल्ह्यातून ६५५८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६५३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ५९३९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाचा निकाल गेल्या वर्षीपेक्षा चांगला असून, मुलींच्या निकालात मागील वर्षीच्या तुलनेत ५.९६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. औरंगाबाद विभागाच्या निकालात औरंगाबाद जिल्हा टक्केवारीने दुसऱ्या स्थानावर आहे. 


श्रेणीनिहाय निकाल 
प्रावीण्य श्रेणी : २०१३४ 
प्रथम श्रेणी : २३७९१ 
द्वितीय श्रेणी : १३६२६ 
उत्तीर्ण : १८४४ 
एकूण उत्तीर्ण : ५९३९५ 


उत्तीर्ण होण्यासाठी उत्तरपत्रिकेत लिहिले 'व्हाय दिस कोलावरी डी..' गाणे 
'देवा मला पास कर, सर माझी परिस्थिती बिकट आहे. मला पास करा,' अशी विनंती विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेतच केल्याचे आढळून येते. परंतु यंदाच्या द परीक्षेत एका विद्यार्थ्याने चक्क 'मला व्हाय दिस कोलावरी डी... हे गाणे खूप आवडते. परंतु आलेले पेपर पाहूनही मला तेच गाण आठवले' असे नमूद करत हे पूर्ण गाणेच लिहिले आहे. अशा प्रकारे आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्या २३० विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाने राखीव ठेवला. गैरप्रकारांची चौकशीही केली. यात २०९ विद्यार्थ्यांचा समावेश असून या विद्यार्थ्यांना रस्टिकेट केले आहे. यात १ विद्यार्थ्यास एका परीक्षेस, २०२ विद्यार्थ्यांना वन + वन म्हणजेच मंडळाच्या दोन परीक्षांसाठी बंदी घातली आहे, तर एका विद्यार्थ्यास १+२ अशा तीन परीक्षांना बंदी, ५ परीक्षार्थींना वन + फाइव्ह अशा ६ परीक्षांवर बंदी घालण्यात आली आहे. 


यापुढे १०० गुणांची लेखी परीक्षा 
भाषा विषयांच्या तोंडी परीक्षेसाठी २० गुण आणि सामाजिकशास्त्रे विषयासाठी अंतर्गत मूल्यमापनासाठी २० गुण आणि ८० गुणांची लेखी परीक्षा अशा पद्धतीची ही शेवटची परीक्षा होती. या पुढची म्हणजेच फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान वगळता १०० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. 


तज्ज्ञांनी सांगितली निकालाची वैशिष्ट्ये 
> यंदाही उत्तीर्णतेचे प्रमाण वाढले.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल चांगला आहे. कारण कला, क्रीडा गुणांचा समावेश असल्याने हा गुणांचा फुगवटा दिसून येत आहे. तसेच गणित आणि संस्कृत, सामाजिकशास्त्र या विषयातही विद्यार्थी चांगली तयारी करत आहेत. परिणामी उत्तीर्ण होण्याचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. 


>बेस्ट ऑफ फाइव्हचा फायदा 
बेस्ट ऑफ फाइव्हमुळे टक्केवारीचे प्रमाण वाढले आहे. शिवाय गणित, सामाजिकशास्त्र, भाषा विषयातही पैकीच्या पैकी गुण मिळतात. आता तर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत अध्ययन आणि अध्यापन पद्धतीतही बदल करण्यात येत आहेत. शिवाय कलागुणांमुळेही टक्केवारी वाढते आहे. 


> गणिताच्या संकल्पनाच अस्पष्ट 
गणित हा विषय संकल्पना समजून घेण्याचा आहे. या विषयात अॅक्टिव्हिटी बेस लर्निंग होणे आवश्यक आहे. परंतु गणित हा विषयच अवघड आहे, असे विद्यार्थ्यांना सांगितले जाते. तसा गणित हा विषय खरे तर पैकीच्या पैकी गुण देणारा विषय आहे. याचा सराव आणि संकल्पना स्पष्ट नसल्याने या विषयात उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. 

बातम्या आणखी आहेत...