आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा गाड्यांची वाट पाहत रात्रभर ताटकळले पोलिस, रात्री २ वाजता थांबले 'ऑपरेशन मिटमिटा'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - खासदार चंद्रकांत खैरे व महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी कचऱ्याच्या प्रश्नावरून हिंसाचार झालेल्या मिटमिटा गावाला गुरुवारी सायंकाळी मिटमिटा गावाला भेट दिली. या हिंसाचारात महिला तसेच लहान मुलांना झालेली मारहाण पाहून दोघेही अवाक् झाले. तुमच्यावर अत्याचार करून आम्हाला येथे कचरा टाकायचा नाही. तुम्ही निश्चिंत राहा, येथे एक टोपलेही कचरा येणार नाही, ग्वाही देऊन हे दोघे रात्री साडेदहा वाजता मिटमिट्यातून परतले.

 

ही जोडी मिटमिट्यात नागरिकांशी चर्चा करत होती तेव्हाच नेमके महापालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांनी पोलिसांना सज्ज होण्यास सांगितले होते. त्यानुसार रात्री ११ वाजता सर्व पोलिस यंत्रणा सज्ज झाली होती. कचऱ्याच्या गाड्याही मिटमिट्याकडे रवाना होणार होत्या. परंतु याची माहिती मिळताच खैरे व घोडेले हे कामाला लागले. मुगळीकर ऐकत नव्हते. मुगळीकरांनी सांगितले तरच पोलिस यंत्रणा मागे घेतली जाईल, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. खा. खैरेंनी नंतर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर आणि रात्री २ वाजता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी संपर्क साधला. त्यानंतर कारवाई थांबली. परंतु या गडबडीत पोलिस उपायुक्तांपासून तर जवानांपर्यंत साडेपाचशे पोलिस छावणी ठाण्यात ताटकळून बसले होते. महापालिकेचे अधिकारीही आळस देत बसूनच होते.

 

मिटमिट्यात विरोध झाला. खदानींच्या ठिकाणीही विरोध झाला तेव्हा आता कचरा टाकायचा कोठे, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. कचरा टाकला जाईल, पण त्यासाठी आमच्याच नागरिकांना मारहाण योग्य नाही, अशी भूमिका खैरे व घोडेलेंची होती. त्यामुळे ते गुरूवारी सायंकाळी मिटमिटा गावात गेले. कचरा टाकू नका, असे नागरिकांनी सांगितले. तेथील महिला व लहान मुलांना पोलिसांनी कशी मारहाण केली. घरात खेळत असलेल्या मुलांनाही त्यांनी कसे सोडले नाही, घरात घुसून टीव्ही तसेच अन्य साहित्यांचे कसे नुकसान केले, याचे कथन केले. महिलांची अवस्था पाहून येथे महापालिका कचरा टाकणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा, कचऱ्याचे एक टोपलेही येथे येणार नाही, असे आश्वासन खैरे-घोडेलेंनी दिले आणि रात्री साडेदहा वाजता परतले.


पावसाच्या शक्यतेने चिंता
आता कचरा वॉर्डांतच जिरवावा लागेल, हे गुरुवारी न्यायालय व म्हैसकर यांनी स्पष्ट केले. वॉर्डांत शास्त्रोक्त पद्धतीने खड्डे खोदण्यासाठी किमान चार दिवस लागतील. त्यात जर पाऊस झाला तर हा कचरा सडून आरोग्य धोक्यात येण्याची भीती महापौरांपासून ते नगरसेवकांनी व्यक्त केली. तेव्हा कचऱ्यावर टाकण्यासाठी औषधे मागवण्याचे आदेश देण्यात आले.

 

बातम्या आणखी आहेत...